बाळशास्त्रींचे स्मरण करताना नवमाध्यमक्रांतीच्या विकृतींना कवटाळणे योग्य आहे का?  

६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मुद्रीत वर्तमानपत्र सुरू केले, हा दिवस त्यांचा जन्म दिवसही मानला जातो. त्या निमित्ताने राज्यात आपण हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. अत्यंत थोडक्या वर्षांच्या आयुष्यात दर्पणकारांनी जे कार्य केले ते मराठी तरूणांना प्रेरणा देणारे आहे. ख-या अर्थाने आजच्या माध्यमक्रांतीच्या युगात बाळशास्त्रींच्या कार्यातून प्रेरणा घेताना मुद्रीत माध्यमांना एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या फाय-जी क्रांतीच्या उंबरठ्यावर भविष्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो, त्यावेळी वर्तमानातील आपल्या चेह-याला दर्पण दाखविण्याची नितांत गरज आहे हे लक्षात येते.

नुकत्याच संपलेल्या सन २०२०मध्ये कोविड-१९च्या संक्रमणामुळे आणि त्यानंतरच्या टाळेबंदीसारख्या निर्णयांमुळे सा-या जगात अर्थव्यवस्थेसमोर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. मराठी वृत्तपत्रक्षेत्रातही मुद्रीत माध्यमांसमोर खडबडून जाग यावी अश्या प्रतिकूल स्थितीशी दोन हात करण्याची वेळ आली. अनेक वर्तमान पत्रे बंद झाली, जी काही थोडी तग धरून आहेत त्यांच्या पत्रकार आणि कर्मचा-यांच्या रोजगारावर गंडातर आले. तर अनेक जणांना त्यांच्या आस्थापनांनी निम्म्या किंवा त्यापेक्षा कमी मोबदल्यात काम करण्यास बाध्य केले. कोरोनाचा संसर्ग होतो या भितीने वृत्तपत्रांचे वितरण थांबले कारण लोकांना वृत्तपत्रामुळे कोरोना पसरू शकतो अशी भिती घालण्यात आली. त्यामुळे वितरण साखळीमधील लाखो जणांना रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.  मुद्रीत माध्यमे मुर्छीत अवस्थेत शेवटच्या टप्प्यात जात आहेत की काय? असे वाटावे अशी ही स्थिती आली आहे.

त्याच वेळी मोठ्या नावाजलेल्या मुद्रीत माध्यमांसह अगदी छोट्या साप्ताहिक आणि गावखेड्यातील हौशी पत्रकारीता करणारांच्याही ‘डिजीटल आवृत्ती निघताना दिसत आहेत. दररोज सकाळी त्यांच्या डिजीटल आवृत्ती वॉटसप समूहांमध्ये ‘प्रमोट’ केल्या जात आहेत. त्यांच्यात नकळत एक अहमहिका किंवा स्पर्धा होताना दिसत आहे. त्यातच काही मोठ्या वृत्तपत्रांच्या डिजीटल लिंक लोकांना मोफत वाचण्यासाठी देवू नयेत असाही प्रचार करण्यात आला. तर त्यांचे सब्सक्रिप्शन घेण्यासाठी त्यांच्या प्रचाराचे संदेश दिले जात आहेत. दुसरीकडे ‘डॉट कॉम’ म्हणजे वेबपोर्टलच्या माध्यमातून बातम्या देणारी न्यूजपोर्टल चोविस तास बातम्यांचा आणि कंटेंटचा रतिब घालू लागली आहेत. या शिवाय दूरचित्रवाणीवरून वृत्तवाहिन्या देखील ’टिआरपी’ च्या स्पर्धेत ‘इंडिया वॉन्टस् टू नो’ म्हणत कश्या प्रकारचा गोरखधंदा करून ‘सर्वात आधी आम्हीच’ म्हणत समाजाला प्रतिमांच्या कल्लोळात बातम्यांचा भडिमार करतात ते दिसले आहेच. या सा-या बातम्या स्मार्ट फोनवरून किंवा एन्ड्रॉईडवरून मराठीतून लोकांनी वाचाव्या म्हणून त्यात चटोर मजकूर, उत्तान छायाचित्रे किंवा चलतचित्रे यांचा भडीमार केला जात आहे. लोक ते चविने पाहतीलच असे समजून अश्या सा-या कल्पना संकल्पना राबविल्या जात आहेत. त्यांच्या दिमतीला मध्ये मध्ये जाहीराती पेरल्या जात आहेत. त्या मधील बहुतांश जाहीराती या कामूक माहिती संबधी आणि त्या संबंधीत वस्तू विक्रीसाठीच्या असतात. तर काही फिटनेस आणि दैनंदीन वापराच्या औषधी, सौंदर्यप्रसाधने, आणि नित्य वापराच्या वस्तूंच्या असतात.

त्यांच्या किंमती देखील कमालीच्या आकर्षक असतात किंवा त्यावर अश्या काही सूट आणि सवलती असल्याचा प्रचार केला जातो की पाहणा-याला त्या घेण्याचा मोह व्हावा. त्यामुळे अनेकदा खरेदीनंतर लोकांना वाईट अनुभव येतात किंवा फसवणूक झाल्याचे लक्षात येते. आणि या सा-या गोष्टी ऑनलाईन मराठी वेबसाईट इंटरनेटच्या माध्यमातील नव्या प्रकारातील न्यूजपोर्टलवरून होताना दिसत आहेत. त्यासाठी कुठल्यातरी कोप-यात एक डिस्क्लेमर अगदी वाचता येणार नाही इतक्या बारीक टायपात देवून स्वत:ची कायदेशीर सुटका केल्याचे समाधान देखील या पोर्टल आणि नेटकरी माध्यमांच्या संचालकांकडून केले जात आहे. या भुलथापा, प्रमोशन आणि विकृत जाहीरातबाजीला मराठी वृत्तमाध्यमे अनाठायी बळी पडत जाणार का? हा खरा प्रश्न आपण आज विचारला पाहीजे. पण तसे न होता बाळशास्त्रीचे नाव घ्यायचे आणि नव्याने आलेल्या विकृतींना ‘कालाय तस्मै नम:’ म्हणून कवटाळायचे का? यांचे भान जागविण्यासाठी ही बाळशास्त्रीच्या जन्मदिनाची पर्वणी साधायला हवी नाही का?

ज्या काळात चवथा स्तंभ म्हणून मराठी वृत्तपत्रातून लोकमान्य टिळकांनी जुलूमी ब्रिटीश सरकारला ‘डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न ठणकावून विचारला होता. त्यावेळी पारतंत्र्यातही ज्यांच्या सत्तेचा सूर्य कधी ढळत नाही अश्या राज्यकर्त्यांनाही ‘रास्त असेल ते बोलणार आणि योग्य असेल तेच छापणार’ असे करारीपणे सांगणारे लोकमान्य टिळक नावाचे निर्भिड संपादक या मुद्रीत माध्यमांत होवून गेले आहेत. त्यांच्या ‘शहाणे करावे सकल जन’ या वारश्याला नव्या युगात प्रवेश करताना साजेसे काही व्हावे असे सध्याच्या संचालक, संपादकाकडून व्हावे अशी किमान अपेक्षा केली तर काही हरकत नसावी नाही कां?

‘माझीया मराटीचे बोलू कवतिके अमृता तेही पैजा जिंके’ असा सार्थ अभिमान ज्या भाषेबाबत संत ज्ञानेश्वरांनी व्यक्त केला, त्या मायबोली मराठीच्या मुद्रीत माध्यमांना मरगळ का आली आहे? कारण आपण किंकर्तव्यमूढ झालो आहोत. आपण आत्मभान विसरून आत्मग्लानी अवस्थेत गेलो आहोत का? याचा विचार ज्यानी त्यानी केलाच पाहीजे. या मराठी सारस्वताच्या गाभा-यात आपण आपले तेज हरवून बसलो आहोत का? की केवळ वृत्तपत्र व्यवसाय किंवा शुध्द भाषेत धंदा म्हणून या कडे आपण पाहत आहोत यांचे भान राहावे यासाठी हा दर्पण दिन साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी समाजाचा आरसा म्हणून काम करणा-या पत्रकार संचालक, संपादकांनी स्वत:च्या सध्याच्या कामाचे अवलोकन करावे, आपला चेहरा सुध्दा त्या आरश्यात पहावा आणि त्यात काही चुकीचे वावगे दिसले, जाणवले किंवा दिशा चुकली असे वाटणारे असेल तर त्यावर योग्य तो उपाय करावा असा या दिवसाच्या प्रयोजनाचा मानस असावा.

बाळशास्त्रीनी त्या काळातही समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून ६ जानेवारी १८३२ या दिवसाला महाराष्ट्रात “मराठी पत्रकार दिन” म्हणून संबोधीत केले जाते. ज्याकाळात सामान्य मराठी माणसांना शिक्षणाची दारे खुली झाली नव्हती, सामान्यपणे मोठा वाचकवर्ग असण्याची किंवा वृत्तपत्रांचा मोठा खप होण्याची सूतराम शक्यता नव्हती, असा तो काळ होता. नगरसेवक, आमदार, खासदार किंवा शासकीय जाहीराती अथवा उद्योग व्यवसायांच्या जाहिराती हा विषयची नव्हता अथवा अशी पुसटही कल्पना नव्हती त्या काळात केवळ ब्रिटिश राज्यकर्त्यांना ‘लोकांच्या वेदना कळाव्या’ म्हणून दर्पणचा एक स्तंभ मराठीत व एक स्तंभ इंग्रजीत लिहिला जात असे.

या वृत्तपत्राने समता आणि व्यक्तिस्वातंत्र्य या तत्त्वांवर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला. वृत्तपत्रातील मजकूर अर्धा इंग्रजी आणि अर्धा मराठी असे. सुरुवातीला हे पाक्षिक म्हणून चालविले जात होते. भारतीयांना ‘देश-काळ-परिस्थिती’चे आणि ‘परदेशी राजव्यवहारा’चे ज्ञान मिळण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी हे वृत्तपत्र सुरू केले. हे वृत्तपत्र सुरू करताना जांभेकरांनी वृत्तपत्र सुरू करणे मागचा उद्देश स्पष्ट करताना लिहिले होते की, ‘लोकांचे प्रबोधन करणे आणि मनोरंजन करणे या उद्देशाने दर्पण हे वृत्तपत्र सुरू करत आहोत.
आज मराठी भाषेत एकूण १५६१ पेक्षा जास्त वृत्तपत्रे आहेत. यांत २२५पेक्षा जास्त दैनिके आहेत. मात्र यातील किती जणांना छातीठोकपणे आपण दर्पणचा वारसा चालवत आहोत असे सांगता येते? कोरोनाच्या काळात आणि देशात अति उजव्या विचारांच्या फँसिस्ट वृत्तीच्या शक्तींचा उदय होत असताना एका अनामिक भय, दहशतीच्या वातावरणात सध्या मराठी वृत्तपत्रसृष्टी मार्गक्रमण करत आहे. मात्र त्या काळात जेंव्हा दर्पण चालविले जात होते तेंव्हा देखील या पेक्षा वेगळी स्थिती नव्हती, असे इतिहासाचा मगोवा किंवा धांडोळा घेता लक्षात येते. तरीही दर्पण या वृत्तपत्राने मराठी वृत्तसृष्टीत नवे पर्व सुरू केले, बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या “दर्पण” मध्ये समता आणि व्यक्ती स्वातंत्र्य तत्वावर समाजाची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केला,जांभेकरांनी या पत्रातून नवे पर्व निर्माण केले. हे पत्र साडे आठ वर्ष चालले, २६ जानेवारी १८४० रोजी दर्पणचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला. पहिल्या वर्ष अखेरीस तीनशे वर्गणीदार होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना व्यवसाय म्हणून वृत्तपत्र चालविणे ही संकल्पना नसताना केवळ प्रबोधनाचे विचार प्रवर्तनाचे साधन म्हणून पदराला खार लावून दर्पण वृत्तपत्र चालविण्यात आले.

मुद्रीत माध्यमांना आज जुनी आणि कालबाह्य समजण्याचे कारण नाही. आजच्या काळातही बातम्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत ‘ब्रेकिंग न्यूज’ माध्यमांपेक्षाही मुद्रीत माध्यमांची विश्वासार्हताच कायम राहिल्याचे दिसून येत आहे. त्यामागे काही शतकांच्या या पुण्याईचे बळ आहे. चटोर, सवंगपणाला थारा न देता ‘आसिधाराव्रत’ म्हणून मुद्रीत माध्यमांतून रात्रीचा दिवस करत अनेक संपादक खपले आणि त्यांनी समाजाला दिशा देणारे, विचारांना सत्प्रवृत्त करणारे लेखन केले. त्यासाठी अनेकदा ‘स्व’ चा त्याग करत समाजाच्या भल्याच्या हिताच्या दृष्टीकोनाचा विचार करून पदरी दोष येणार हे माहिती असतानाही आपले कर्तव्य चोख बजावले आहे. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे मेरूमणी दर्पणकार बाळशास्त्रींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करताना आपण सारे सारस्वताच्या पालखीचे भोई ज्ञानपीठ विजेत्या कवि कुसूमाग्रजांच्या शब्दांत एक शपथ घ्यायची आहे! भिंत खचली चूल विझली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. ‘मोडून पडला संसार सारा, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!

Social Media