नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपेक्षेप्रमाणे मोठा विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत ५४९ मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, रवींद्र भोयर यांना १, मंगेश देशमुख यांना १८६ मते प्राप्त झाली. त्यामुळे बावनकुळे मोठ्या फरकाने विजयी झाले.
या निवडणुकीत काँग्रेसने भाजपा च्या डॉ रवींद्र उर्फ बच्चू भोयर यांना आपल्याकडे वळवून ही निवडणूक चुरशीची केली अशी सुरुवातीला वाटले होते मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री नितीन राऊत, सुनील केदार यांच्यातील विसंवादामुळे आयत्यावेळी भोयर यांनी माघार घेतली, काँग्रेसला शेवटच्या क्षणी अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा द्यावा लागल्याने चांगलीच नामुष्की ओढवली होती, त्याचा परिणाम या निकालात दिसून आला 318 मते असलेल्या भाजपा च्या पारड्यात 362 मते पडली याचा सरळ अर्थ महाविकास आघाडीची मते फुटली असाच झाला.