भंडारा : भंडारा आणि गोंदिया(Bhandara and Gondia) जिल्ह्यांमध्ये शीत लहर सुरू असून नागरिकांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार भंडारा जिल्ह्याचे तापमान 7 अंश सेल्सिअस एवढा असून विदर्भात सर्वाधिक कमी तापमान हे भंडारा जिल्ह्याचे आहे. तसेच गोंदिया जिल्हाचे किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. विदर्भातील सर्वाधिक कमी तापमान असलेल्या जिल्ह्यापैकी भंडारा पहिला नंतर नागपूर त्यानंतर गोंदिया जिल्हा आहे. तसेच गोंदिया जिल्ह्याचे कमाल तापमान 23.8 अंश सेल्सिअस एवढा असून विदर्भात कमाल तापमानामध्ये गोंदियाचे तापमान सर्वात कमी आहे.
मागील तीन दिवसांपासून शीत लहर आल्याने नागरिकांचे बाहेर पडणे कठीण झाले आहे. सूर्य अस्ताला गेल्यानंतर नागरिक घरी किंवा परिसरात शेकोटी पेटवून या थंडीपासून स्वतःचा बचाव करीत आहेत सकाळी अकरा वाजेपर्यंत या बोचऱ्या थंडीचा चांगलाच प्रभाव पाहायला मिळतो आहे. वाढत्या थंडीमुळे सर्दी,खोकला व तापाच्या रुग्ण संख्येत वाढ झालेली दिसून येत असून ही थंडीची लाट पुढे काही दिवस कायम राहणार असल्याने हवामान खात्याने सांगितले आहे. सध्या कोरोनाची तिसरी लाट वाढत्या क्रमावर सुरू असल्याने नागरिकांनी गरम कापडयाचा वापराण्यांचे तसेच सकाळी ,आणि सायंकाळी आवश्यक काम असेल तर बाहेर पडण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.