मुंबई विद्यापीठातील जैवविविधता पार्क खुले

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या सयुंक्त विद्यमाने कलिना संकुलात तयार करण्यात आलेले जैवविविधता पार्क आजपासून खुले करण्यात आले. मियावाकी सिटी फॉरेस्ट, फुलपाखरू उद्यान आणि नक्षत्र उद्यान अशी तीन सुंदर उद्याने खूली करण्यात आली आहेत.

मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. शैलेंद्र देवळाणकर, कुलसचिव सुधीर पुराणिक, एचडीएफसी एएमसी’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  नवनीत मुनोत, रोटरी क्लबचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर संदीप अगरवाला, रोटरी क्लबचे अध्यक्ष  विनीत भटनागर यांच्या उपस्थित आजचा उदघाटन सोहळा पार पडला.

मियावाकी जंगल, सेन्सरी पार्क, पक्षी निवारा, फुलपाखरांचे गार्डन आदी नाविन्यपूर्ण संकल्पनांमधून एकराहून अधिक जागेवर हे जैवविविधतेचे अनोखे रुप साकारले आहे. त्याचबरोबर तलावाचे सौंदर्यकरणही करण्यात आले आहे. या प्रकल्पाला रोटरी क्लबच्या माध्यमातून एचडीएफसी एएमसीचे अर्थसहाय्य लाभले आहे.

“पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करायचे असेल तर जैवविविधता ही आजची आणि उद्याचीही महत्त्वाची गरज आहे. जैवविविधता हे निसर्गाने कोणत्याही आपत्तीविरोधात आपल्याला दिलेले सुरक्षाकवच आहे. या विविधतेमध्ये पृथ्वीवरील सर्व स्तरावरील विविध प्रकार सामावलेले असतात आणि त्यातून जीवनाला सार्थ ठरविणाऱ्या पर्यावरणीय आणि सांस्कृतिक प्रक्रिया घडत जातात. त्याचमुळे पर्यावरणाचे संरक्षण हा केवळ भावनिक वा सौंदर्यात्मक मुद्दा नाही तर मानवाला आणि संपूर्ण परीसंस्थेसाठी तो कळीचा मुद्दा आहे,” असे उद्गार रोटरी इंटरनॅशनल डीस्ट्रीक्ट ३१४१ चे गव्हर्नर संदीप अगरवाला म्हणाले.

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे (आरसीबी)ने मुंबई विद्यापीठाबरोबर १० वर्षांचा सामंजस्य करार केला असून त्याद्वारे एक एकरहून अधिक जमिनीवर असलेले हे पार्क सांभाळले जाणार आहे. त्यासाठी मेगा स्केप इंडिया (एमजीएस)ला तांत्रिक तज्ज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापन भागीदार नेमले असून त्यातून हे पार्क उभे राहिले आहे. एमजीएसमध्ये अनेक पर्यावरणतज्ज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प राबविले जातात. अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने हे पार्क त्यांनी साकारले आहे.

 

Social Media