बर्ड फ्ल्यूमुळे माणसांना कोणताही धोका नाही मात्र काळजी घेणे आवश्यक 

मुंबई : राज्यात बर्ड फ्ल्यूमुळे भीतीचे वातावरण असून . मुंबईत गेल्या २४ तासांत १८२ तर गेल्या ९ दिवसांत १ हजार ६६० कावळे, कबुतरांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी महापालिका आपात्कालीन व्यवस्थापन विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर नोंद झाल्या आहेत. मुंबईत बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांच्या मृत्यूच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली असून बर्ड फ्ल्यू मुले माणसांना काहीही धोका नसून काळजी घेणे आवश्यक असल्याचे पालिका आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी केले आहे . .

राज्यात बर्ड फ्ल्यूच्या तक्रारी आल्यानंतर मुंबई महापालिकेने ५ डिसेंबर पासून पक्षी मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. १० जानेवारीच्या सकाळी ७ वाजल्या पासून १९ जानेवारीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत सात दिवसात १ हजार ६६० कावळे, कबुतर आणि चिमण्या या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. तर रविवार १८ जानेवारीच्या सकाळी ७ ते सोमवार १९ जानेवारीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत २४ तासात १८२ कावळे, कबुतर आणि चिमण्या या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. मृत पक्ष्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे कावळा आणि कबुतरांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत.

बर्ड फ्ल्यूने महाराष्ट्रात शिरकाव केल्यानंतर राज्य आणि मुंबई महापालिका सतर्क झाले असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग मृत पक्ष्यांच्या अवशेषांचे शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जात आहे. मुंबईत पोल्ट्रीशी संबंधित मोठे व्यवसाय नाही. त्यामुळे इतर शहरांप्रमाणे मुंबईला बर्ड फ्ल्यूचा धोका नाही. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृत पक्षी आढळले तर अशा पक्ष्यांचे नमुने विशिष्ट टीमकडून गोळा केले जातात. कारण त्यात बर्ड फ्ल्यूचा संशय असतो. त्यांची वेगळया ठिकाणी विशिष्ट पध्दतीने विल्हेवाट लावली जाते. मात्र, संख्या कमी असली तरीही खबरदारी घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईत मृत पक्षी आढळून येत आहेत. मृत पक्षी आढळून आल्यास महापालिकेच्या आपात्कालीन विभागातील हेल्पलाईन क्रमांक 1916 या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा. तसेच शासनाने नियुक्त केलेल्या रॅपिड रेस्पॉन्स टीममधील डॉ. हर्षल भोईर : 9987280921 आणि डॉ. अजय कांबळे : 9987404343 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

बर्डफ्ल्यूमुळे माणसांना काहीही धोका नाही, तरीही काळजी घेणे आवश्यक आहे. एखादा पक्षी किंवा प्राणी मरून पडला असल्यास त्याला हात लावू नये. त्याची माहिती पालिकेच्या विभाग कार्यालय किंवा आपात्कालीन व्यवस्थापन विभागाला द्यावी. कच्चा मांसाहार करू नये. मटण, चिकन, अंडी चांगले शिजवून खाणे आवश्यक आहे. असे आवाहन मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले.

Tag-Bird flu/threat to humans/care must be taken

Social Media