बोर व्याघ्र प्रकल्पात आढळले तपकिरी रंगाचे दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वल

वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्प (Bor Tiger Reserve)- १३८.१२ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेला महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचा पण तितकाच महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. आकाराने लहान असला तरी जैवविविधता तसेच वाघ,बिबट,अस्वल,रानकुञे,सांभर,चितळ,रोही इत्यादी वन्यप्राण्यांच्या अधिवासामुळे हे व्याघ्र प्रकल्प प्रत्येक पर्यटकांचे आकर्षण बनलेले आहे. बोर मध्ये आढळलेल्या दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वलीने त्यामध्ये आणखी भर टाकलेली आहे.

वन्यप्रेमी कडून मिळालेल्या माहितीनुसार बोर व्याघ्र प्रकल्पात अंदाजे १०० पेक्षाही जास्त काळ्या रंगाच्या अस्वलांचे अधिवास आहे. परंतु दिनांक १९ मे २०२२ रोजी बोर मध्ये फिकट तपकिरी रंगाचे दुर्मिळ “ल्युसिस्टिक स्लॉथ बिअर ” (Leucistic Sloth Bear) आढळुन आलेले आहे. महाराष्ट्रात मेळघाट व्याघ्र प्रकल्पानंतर दुस-यांदा आढळलेले तपकीरी कोट असलेले पहिलेच दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वल असल्याचे सांगितले जात आहे.

बोर व्याघ्र प्रकल्पाअंर्तगत आमगाव तपासणी नाका येथे कार्यरत असलेले मनेशकुमार सज्जन हे वनरक्षक हे १९ मे २०२२ रोजी आमगाव रस्त्यांने मोटारसायकलीवर जात असतांना त्यांना सायंकाळी ५ वाजेचे दरम्यान एक प्राणी जंगलाकडुन निघून डांबरी रस्यावर येताना दिसून आला.

त्यांनी मोटारसायकल थांबवून बारकाईने पाहणी केली असता ते एक अस्वल असल्याचे त्यांच्या लक्षात आले; परंतु ते अस्वल नेहमी आढळणा-या काळ्या रंगाच्या अस्वलीपेक्षा निराळे होते, ते एक फिकट तपकिरी (Pale Brown) रंगाचे दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वल (Leucistic Sloth Bear) होते. त्यांचे छातीवरील फिकट तपकिरी केसांचे मधोमध “V” आकाराचे पांढ-या रंगाचे चिन्ह ठळकपणे दिसत होते. सदर अस्वल “ल्युसिझम” या अत्यंत दुर्मीळ विकाराने ग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे.

वर्ष २०१६ मध्ये तपकिरी कोट असलेले ल्युसिस्टिक अस्वल गुजरात राज्यातील दाहोदच्या जंगलात आढळून आले होते, त्यानंतर महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ३ एप्रिल २०२० मध्ये पांढरे कोट असलेले अडिच ते तीन वर्षाचे ल्युसिस्टिक अस्वल प्रथमत: आढळले .

बोर व्याघ्र प्रकल्पात प्रथमच दुर्मिळ ल्युसिस्टिक वन्यप्राणी अस्वल आढळुन आल्याने वन्यजीव अभ्यासकासह वन्यजीव प्रेमीमध्ये सदर अस्वलीस पाहण्याची ओढ लागलेली आहे.

Social Media