महापालिका अर्थसंकल्पाच्या सभा प्रत्यक्षच घ्याव्यात : भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांची मागणी

मुंबई : भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्प २०२१-२०२२ (Budget 2021-2022)वरील सर्व सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न घेता प्रत्यक्ष घ्याव्यात, त्यासाठी आवश्यक असल्यास मोठे सभागृह आरक्षित करून कोविडच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करत प्रत्यक्ष सभा घ्याव्यात असे लेखी पत्र महापौरांना (Written letter given to the mayor)दिले आहे.

कोरोना महामारीमुळे गेले ११ महिने महापालिका सभा प्रत्यक्ष पार पडलेल्या नाहीत. त्यामुळे नगरसेवकांना प्रभागात नागरिकांच्या समस्या तसेच कोविड-१९ संकटाचा सामना करताना नागरी कामांबाबत विविध प्रश्नांना वाचा फोडताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्व नगरसेवकांना महापालिकेसंबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे.

मार्च महिन्याच्या महापालिका सभांमध्ये अर्थसंकल्पावर चर्चा होते. सदर सभा अत्यंत महत्वाच्या असतात. त्यामुळे या सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न घेता प्रत्यक्ष सभागृहात घेणे आवश्यक आहे. तरी याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. जर महापालिका सभागृहात सभा प्रत्यक्ष घेणे शक्य नसेल तर कुठल्याही परिस्थितीत अर्थसंकल्पासारख्या महत्वाच्या विषयावरील सभा आभासी (व्हिडीओ कॉन्फरंसिंग) पद्धतीने घेऊ नयेत अशी मागणी लेखी पत्राद्वारे भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौरांकडे केली आहे.

Social Media