मुंबई : अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असून प्रत्येक ठिपका हा राज्याचा मतदारसंघ आहे, हे मतदारसंघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होणार आहे त्यात आपल्याला विकासाचे रंग भरावयाचे आहेत. त्यातूनच विकसित राज्याची सुंदर रांगोळी आपल्याला रेखाटता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा अधिकाधिक लाभ आपापल्या मतदारसंघातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सजग राहून पाठपुरावा केला पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे ‘राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात…’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्य शाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यशाळेला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, संसदीय कार्य राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे सदस्य, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानद सल्लागार हेमंत टकले, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संपूर्ण राज्य हाच आपला मतदारसंघ अतिशय महत्वाच्या विषयावर वि.स. पागे प्रशिक्षण केंद्राने कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करत म्हटले की, कालच राज्यातील शाळा सुरु झाल्या आणि आज आपला इथे वर्ग भरला… आजही आपण विद्यार्थीच आहोत. मी विधानपरिषदेचा आमदार असल्याने संपूर्ण राज्य हाच माझा मतदारसंघ म्हणून मला संपूर्ण राज्याचा विचार करावा लागतो.
विधानमंडळ अधिवेशनावर सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष अर्थसंकल्पातील बाबी ठरल्याप्रमाणे अंमलात आणण्याची तसेच अर्थसंकल्प समजून घेऊन त्यावर नेमकं बोलण्याची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वसामान्य नागरिक हे विधानमंडळाच्या अधिवेशनावर लक्ष ठेवून असतात याची जाणीव उपस्थितांना करून दिली. ठाकरे म्हणाले की, आपण ज्या लोकप्रतिनिधींना मतदान करतो ते मतदार विधानमंडळाच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात. मतदारसंघाचे किती प्रश्न सभागृहात मांडतात याकडे मतदारांचे लक्ष असते. त्यामुळे थोर परंपरा लाभलेल्या या सभागृहात बोलण्याची संधी मिळाली असताना सभागृहाचे कामकाज समजून घेवून आपल्याला मिळालेली ही उच्च परंपरा कशी जपता येईल याची प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.
आपत्तीच्या प्रसंगी धीर देणे महत्वाचे(It is important to be patient in the event of a disaster)
राज्यावर सतत येणाऱ्या आपत्तींचा उल्लेख करून या सर्व आपत्तीकाळात आपण आपत्तीग्रस्तांना तात्काळ वाढीव स्वरूपात मदत करत असलो तरी ही नुकसानभरपाई नाही. कारण आपण त्यांचे नुकसान कधीही भरून देऊ शकत नाही. पण त्यांना धीर देण्याची गरज आहे. या आपत्तींमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताण येत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
प्रार्थनेला प्रयत्नांचे बळ देण्याची गरज(Prayer needs to be strengthened)
यापूर्वी आरोग्य सुविधा आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने कोरोनाची साथ आल्यानंतर सर्वांचीच दाणादाण उडालेली असताना महाराष्ट्राने मात्र अतिशय वेगाने आणि मोठ्याप्रमाणात राज्यात आरोग्य सुविधांची उभारणी केली याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. कोरोनाची तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर प्रार्थनेला प्रयत्नांचे बळ देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. उभ्या केलेल्या आरोग्यसुविधा व्यवस्थितपणे सुरु राहतील याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
अर्थसंकल्प हा साद्या सरळ सोप्या भाषेत मांडता आला पाहिजे. यासाठी अनुभवी विधिमंडळ सदस्यांची समिती गठीत करून अर्थसंकल्प कसा साध्या-सोप्या भाषेत मांडता येईल याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या विचाराधीन आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे माध्यमे वाढली आहेत. लोकांमध्ये जागृती झाली आहे. आपले लोकप्रतिनिधी विधीमंडळात काय बोलतात हे मतदार आणि विरोधक दोन्ही पहात असतात. वाढलेल्या माध्यमांमुळे तात्काळ माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे अभ्यासपूर्ण बोलणे मतदारसंघात विकास कामाचे नियोजन करणे आवश्यक असते. अधिवेशन काळात विधानसभेत, विधानपरिषदेत कसे बोलले पाहिजे, प्रश्न-उत्तरे, लक्षवेधी कशी मांडली पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या मतदारसंघातील विषय त्या विषयाचे महत्व आणि विधानमंडळाचे कामकाज याची योग्य सांगड घालूनच कधी विषय मांडायचा, ही कला आत्मसात केली पाहिजे, असेही विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
अर्थसंकल्पातील निधी मतदारसंघात पोहोचविण्यासाठी नियोजन महत्वाचे – डॉ.नीलम गोऱ्हे
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, अर्थसंकल्प हा ग्रामीण शहरी, वंचित, महिला या सर्व घटकांशी संबंधित असतो. या अर्थसंकल्पातून दिलेला निधी हा प्रत्येक मतदारसंघात पोहोचविण्यासाठी नियोजन करून अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि त्यांच्या मतदारसंघातील विकास योजना यांचा सुयोग्य मेळ साधता आला पाहिजे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून थेट मदत मतदारसंघात पोहोचली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. ही कार्यशाळा सर्व विधिमंडळ सदस्यांना अर्थसंकल्प तरतुदीनुसार विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघात अंमलबजावणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असेही श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
अर्थसंकल्प समजून घेऊन मतदारसंघात विकासकामे करावी- संसदीय कार्यमंत्री अनिल परब
संसदीय कार्यमंत्री परब म्हणाले की, राज्याचा अर्थसंकल्प हा लोकप्रतिनिधीसाठी खूप महत्त्वाचा विषय असतो. ज्या अपेक्षेने मतदाराने आपल्याला विधनमंडळात पाठवलेले असते त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्प समजून घेऊन त्यातून विकासकामे मतदारसंघात करणे आणि त्यातून मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्प महत्वाचा आहे. अर्थसंकल्प सहज समजत नाही तो तांत्रिक विषय आहे. पण आपण सर्वांनी समजून घेऊन आपल्या मतदारसंघासाठी यातला निधी कसा वळवता येईल यासाठी विकासकामाचे नियोजन करणे आवश्यक आहे.
या दोन दिवसीय कार्यशाळेत अ) अर्थसंकल्पाची प्रक्रिया ब) अर्थसंकल्पीय प्रकाशने समजावून घेताना (उदाहरणार्थ आर्थिक पाहणी अहवाल… राज्याच्या प्रगतीचे प्रतिबिंब) क) अर्थसंकल्पावरील चर्चेत सन्माननीय सदस्यांचा सहभाग ड) विधिमंडळ सदस्यांचा स्थानिक विकास निधी व त्याचा सुनियोजित वापर , इ)अर्थसंकल्पातून होणारी विकासकामे, त्यांचे नियोजन आणि पाठपुरावा या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक व्याख्यानानंतर सदस्य यांना प्रश्नोत्तरासाठी वेळ राखून ठेवण्यात आला आहे.
कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.