मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरसच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. तिच्यावर योग्य उपचारही केले नाहीत. अखेर त्या पीडितेचे निधन झाले. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून सर्वांची मान शरमेनं खाली घालायला लावणारी आहे. उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी व तिला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते एशियाटिक लायब्ररी असा ‘संवेदना कँडल मार्च’ काढण्यात आला होता. या मार्चमध्ये थोरात यांच्याबरोबर महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, आमदार भाई जगताप, माजी आमदार मोहन जोशी, अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक रवींद्र दळवी, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे, सरचिटणीस राजेश शर्मा, प्रकाश सोनावणे, सचिव राजाराम देशमुख यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सुरक्षित अंतर पाळून या संवेदना कँडल मार्चमध्ये सहभागी झाले होते. कँडल मार्च एशियाटीक लायब्ररी येथे पोहोचल्यावर पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हाथरस येथील या अमानवी घटनेचा निषेध करून थोरात म्हणाले की, उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे राज्य नसून जंगलराज सुरु आहे. योगी आदित्यनाथांच्या कार्यकाळात गुन्हेगार मोकाट फिरत आहेत व आया बहिणींच्या अब्रूचे लचके तोडत आहेत. हाथरसच्या मुलीवर अत्याचार झाल्यावर पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. पीडितेला वेळेत उपचारही मिळाले नाहीत. पोलिसांनी यापुढे जात पीडितेच्या कुटुंबाला अंत्यसंस्कारही करु दिले नाहीत. रात्रीच्या अंधारात 2.30 वाजता मोठ्या पोलीस फौज फाट्यासह पोलिसांनीच अंत्यसंस्कार उरकले. पीडितेचे कुटुंब अंत्यस्कारासाठी गयावया करत होते पण त्यांचा हा हक्कही निर्दयी पोलीसांनी हिरावून घेतला. उत्तर प्रदेश पोलीस आणि योगी सरकारने मानवतेची हत्या केली आहे. योगी सरकार या प्रकारणात काय दडवत आहे? कोणाला वाचवण्यासाठी हा आटापिटा सुरु आहे? योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत हेच हाथरसच्या घटनेने दाखवून दिले आहे.
हाथरसची घटना योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे व अमानवी पद्धतीने हाताळली त्याबद्दल त्यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. भाजपाशासित राज्यात महिला, दलित व अल्पसंख्याक समाजावर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. नुकतेच उत्तर प्रदेश मध्ये एका दलित सरपंचाला गोळ्या घालून ठार करण्यात आले. याआधी एका पोलिस अधिकाऱ्याची पोलिस स्टेशनमध्ये जमावाने गोळ्या घालून हत्या केली. योगी आदित्यनाथ यांचा गुन्हेगारांवर वचक नसून उत्तर प्रदेशातील परिस्थिती गंभीर व चिंताजनक आहे. स्वतःच्या राज्यात कायदा व सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही आणि योगी आदित्यनाथ दुसऱ्या राज्याला कायदा सुव्यवस्था राखण्याचे अनाहुत सल्ले देत असतात हे अत्यंत दुर्देवी आहे, असेही थोरात म्हणाले.