नागपूर/ मुंबई : अखेर अपेक्षेनुसार सीबीआयने रात्री उशीरा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेत त्यांच्या मुंबई आणि नागपूरसह घर आणि कार्यालयाच्या १० ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुखाचे सरकारी निवासस्थान मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यासह रात्री उशिरा सीबीआयने छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाझेच्या डायरीत अनेक नावे (Many names in Waze’s diary)
देशमुख यांच्याबरोबरच त्यांच्या जवळच्या लोकांच्या घरी शोध घेण्यात येत आहे. सीबीआयने नवी दिल्लीत एफआयआर दाखल केला असून त्यानंतर नवी दिल्ली आणि मुंबईच्या सीबीआयच्या १० वेगवेगळ्या टीमने सकाळपासून छापेमारी सुरु केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा तपास करण्याचे काम सीबीआय (CBI) करीत आहे. बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याच्या डायरीमध्ये अनेक नावे आढळून आली होती. त्यापैकी बारमालक महेश शेट्टी याने १ कोटी ५५ लाख रुपये सचिन वाझे याला दिल्याचे सीबीआयला सांगितले आहे. वाझे याच्या डायरीतील नोंदी आणि शेट्टी याचा जबाब हे जुळत असल्याचे सीबीआयचे म्हणणे असल्याने त्यानुसार सीबीआय पुरावा गोळा करण्याच्या दृष्टीने ही छापेमारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कथीत खंडणी वसुली प्रकरण (Kathit Extortion Case)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh)यांच्या वादग्रस्त पत्रात करण्यात आलेल्या कथीत खंडणी वसुली प्रकरणी पीपीई किट्स घालून सीबीआयच्या अधिका-यांनी छापेमारी करत एक काळी बॅग आणि दोन मोठ्या पिवळ्या पिशव्यामधून पुरावे गोळा करण्यास सुरूवात केल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर पहाटेच सीबीआयने छाप मारले आहेत. ही छापेमारी करताना स्थानिक पोलिसांना त्यांची गंधवर्ताही देण्यात आली नव्हती. छापेमारीचे वृत्त कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त वाढवला आहे. अनिल देशमुख हे नागपूरमध्ये होते.
स्वीय सहायकाच्या घरावरही छापे (Raids on personal assistant’s house too)
त्यांच्या नागपूर सिव्हिल लाईन परिसरातील निवासस्थानीही सीबीआयने धाड मारली आहे. पीपीई किट्स घालून काही लोक घरात झाडाझडती घेताना दिसत आहेत. तब्बल सात ते आठ अधिकारी देशमुखांच्या घरी आले. देशमुख यांच्यांशी काही सीबीआयच्या कर्मचा-यांनी चर्चाही केली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या हातात एक काळी बॅग आणि दोन पिवळ्या पिशव्या होत्या. या पिशव्यांमध्ये महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे सांगितले जात आहे. सीबीआयचा छापा पडण्यापूर्वी अनिल देशमुख नुकतेच मॉर्निंग वॉकला जाऊन आले होते. देशमुख यांच्या स्वीय सहायकाच्या घरावरही सीबीआयने छापे मारले असून त्यांच्याकडूनही सीबीआय माहिती घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला (Home Minister visits CM)
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापे मारण्यात आल्याने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. या घटनाक्रमांबाबत महत्वाची चर्चा केली त्या नंतर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे देखील या ठिकाणी हजर झाले. पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांकडून मुख्यमंत्र्यानी माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या त्वरीत प्रतिक्रिया :
सत्तेचा दुरुपयोग करून सरकारच्या बदनामीचे राजकारण : नवाब मलिक
केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
सीबीआयला संशय असेल तर चौकशी किंवा धाडी टाकू शकतात शिवाय गुन्हा दाखल करु शकते परंतु पहिल्या दिवसापासून ज्यापध्दतीने हे प्रकरण तयार करण्यात आले आहे यावरुन हे राजकारणच सुरू असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देऊन अहवाल सादर करायला सांगितले होते. परंतु ज्यापध्दतीने आज सीबीआयने धाडसत्र सुरू केले आहे त्यावरुन मुंबई उच्च न्यायालयासमोर सीबीआयने प्राथमिक अहवाल ठेवला का? कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय किंवा आदेश दिला आहे का? याबाबतची माहिती समोर आलेली नाही किंवा आमच्याकडे उपलब्ध नाही असे नवाब मलिक म्हणाले.
कायद्यापुढे कुणीही मोठा नाही. अनिल देशमुख यांनी सुरूवातीपासून सीबीआय चौकशीला सहकार्य केले आहे. घटना ही अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या बॉम्बची आहे. त्यामध्ये आजपर्यंत सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून काम करत होता. याबाबतचा NIA ने खुलासा केलेला नाही. याशिवाय यामध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांची भूमिका काय होती? त्यांच्या पत्रावरून कारवाई होतेय हे राजकारण सुरू आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
ही तर सोची समझी चाल; हसन मुश्रीफांची टीका
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देशमुखांवरील कारवाई ही सोची समझी चाल आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी लवकरच दूध का दूध आणि पानी का पानी होईलच, असे मुश्रीफ म्हणाले. एका पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? असा सवाल करतानाच हे अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला.
निर्दोष बाहेर येतील
माझ्यासह अन्य नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली होती. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. केवळ मानसिक त्रास देऊन बदनाम करण्याचा हा प्रकार होता. तोच प्रकार देशमुखांच्या बाबतीत होत आहे. त्यामुळे लवकरच दूध का दूध, पानी का पानी होईल आणि देशमुख या प्रकरणातून निर्दोष बाहेर पडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बदनामीच्या या धाडसत्राचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध : जयंत पाटील
न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप करतानाच या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही असेही जयंत पाटील म्हणाले.
ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे
‘काही सुपात, काही जात्यात’ : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील.
शिवसेना नेते अनिल परब यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. अनिल परब यांच्यावरही अनिल देशमुखांइतकाच गंभीर आरोप आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ऑन पेपर त्यांच्यावर हा आरोप केला आहे. याशिवाय, संजय घोडावत यांचीही केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी झाली पाहिजे. सचिन वाझेच्या पत्रात संजय घोडावत आणि अजित पवार यांचा उल्लेख आहे. मला थेट अजित पवार यांचं नाव घ्यायचे नाही. मी केवळ अनिल परब आणि संजय घोडावत यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, एवढेच म्हणत आहे. काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात असल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले