मुंबई : मध्यावधी निवडणुका कधी घ्यायच्या हे निवडणूक आयुक्त ठरवतात, चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवडणूक आयोगाने एखादी जबाबदारी दिली असेल तर माहित नाही, असा टोला खा. संजय राऊत यांनी चंद्रकांत दादांना लगावला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष पूर्ण करणार, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या फडणवीसांशी नुकत्याच झालेल्या पंचतारांकीत भेटीमुळे सुरू झालेली नव्या राजकीय समीकरणांची चर्चा थंडावेल असे मानले जात आहे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर राज्यात सत्ताबदलाच्या चर्चेला ऊत आला होता.
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी म्हटले आहे की, राजकीय पक्षात संवाद असला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ज्या अर्थाने बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. त्यावरून राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांचे कार्य वाढत आहे. राज्यापुढे अनेक प्रश्न असतात, अशावेळी राजकीय पक्षात संवाद असला पाहिजे, असा हा संवाद होता, या भेटीनंतर कुणीही नाराज होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. बिहार निवडणुकीबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. बिहारमध्ये शिवसेना कायम काही जागा लढवत असते, तेथील शिवसेना उमेदवारांना चांगला प्रतिसाद उमेदवारांचा मिळत असेल, तर ते योग्य आहे, कारण अनेक कार्य़कर्ते वर्षानुवर्ष तेथे शिवसेनेसाठी काम करतात असे राऊत म्हणाले.
कंगना प्रकरणाबाबत बोलाताना ते म्हणाले, महाराष्ट्र अस्मितेसाठी लढणारा सामान्य कार्यकर्ता हे बाळकडू आमच्या नेत्यांकडून आम्हाला मिळाले आहे, आणि आम्ही लढणार, महाराष्ट्राची बदनामी आम्ही सहन करणार नाहीत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.