नागपूर दि १८ : (किशोर आपटे) : नागपूरचे हिवाळी अधिवेशन(Nagpur Winter Session) हे नेहमीच थंडीत होत असले तरी राजकीय हवामान येथे नेहमीच गरम राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. यावेळी तर नव्या सरकारचा शपथविधी देखील नागपूरात झाल्याने आणि नव्या सरकारकडे प्रचंड बहुमत असल्याने जोश उत्साहात आणि वेगवान अधिवेशन व्हावे अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली असून सुरूवातीचे दोन दिवस तर कमालीची मरगळ पहायला मिळत आहे. त्या उलट इवीएम घोटाळा(EVM Scam) आणि आंदोलनाची तयारी करण्यासाठी आक्रमक विरोधकांमध्येच जास्त उत्साहाने अधिवेशनात भाग घेण्याची स्पर्धा पहायला मिळाली आहे. त्यामुळे नव्या मंत्र्याची स्थिती ना खाता ना बही वो (मुख्यमंत्री) बोले वो सही! अशी झाली आहे.
मंगळवारी तर हा उत्साह ओसंडून वाहिला कारण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)नागपूर विधानभवनात आले होते. त्यांनी सभागृहात हजेरी लावलीच शिवाय अचानक मुख्यमंत्र्याच्या दालनाकडे जावून त्यांनी गुफ्तगू देखील केले. नेमके त्याचवेळी विधानभवनात दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र हजर नव्हते. राष्ट्रवादीचे अजित पवार नेमके कुठे गेले यावर गूढ चर्चा कुजबूज सुरू होती. कुणाच्या मते नागपूरच्या गुलाबी थंडीने त्यांना ‘थ्रोट इन्फेक्शन’ झाल्याने ते आराम करत आहेत. तर काहीनी ते नाराजांना मनविण्यासाठी बाहेर गेले आहेत असे सांगण्यात येत होते. काहीच्या मते ते खातेवाटपा बाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले होते. तर दुसरे उपमुख्यमंत्री देखील सभागृहात आपल्याच कामात मग्न होते. मात्र शपथविधी होवून चार दिवस झाले तरी सारे मंत्री बिनखात्याचे असूनही खातेवाटप झाल्यासारखे कामकाज करत होते. ते ज्या विभागांच्या विधेयकांचे कामकाज करत होते ते खाते त्यांना मिळाल्याचा मग अंदाज व्यक्त केला जात होता.
मात्र उदय सामंत यांनी पुरवणी मागण्या विधानसभेत मांडल्या तेंव्हा सारे बुचकळ्यात पडले कारण ते वित्त मंत्री होतील असे कयास लावले जात होते. दुस-या दिवशी त्यांनी नगरविकास विभागाचे विधेयक मांडले त्यानंतर त्यांच्याकडे नगरविकास खाते जाणार का? मग एकनाथ शिंदेकडे कोणते खाते जाणार ? अश्या चर्चा सुरू होत्या. नव्यानेच मंत्री झालेल्यांना मात्र आता लोकांच्या अभिनंदनापासून बचाव करण्याची कसरत करावी लागत आहे. कारण स्वागत अभिनंदन करताना सहजपणे दुसरा प्रश्न मग कोणते खाते? असा होत असल्याने नको ते अभिनंदन असा त्यांचा चेहरा बोलताना दिसत आहे!
पुन्हा मुख्यमंत्र्याकडून शपथविधीनंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की अडीच वर्षांचा फॉर्म्युला असला तरी अडीच महिन्यानंतर देखील मंत्री बदलण्यात येवू शकतील. त्यामुळे नव्या मंत्र्याना पहिल्या दिवसांपासून धाक असल्याचे जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे त्यामुळे मंत्रीपद हे संगीत खु्र्ची तर ठरणार नाही ना अशी अनामिक भिती व्यक्त केली जात आहे. नवख्या आमदारांना हे अधिवेशन म्हणजे गावची जत्रा किंवा ऊरूस असल्याचा भास व्हावा असे वातावरण आहे. कारण सभागृहात खातेवाटप नसल्याने कोणत्या मंत्र्याकडे काही काम घेवून जाता येत नाही. किंवा सभागृहात जावून त्यावर आवाज उठवता येत नाही. आणि सभागृहात फारसे कामकाजही नाही प्रश्नोत्तरे लक्षवेधी नाहीत एका दिवसांत सात विधेयके सरकारने मंजूर केली आहेत आता सत्ताधारी विरोधकांच्या चर्चा आणि अभिभाषण आभार प्रस्तावाचे उत्तर तसेच पुरवणी मागण्या ऐवढेच वैधानिक कामकाज उरले आहे. एकूण प्रचंड बहुमताच्या सरकारची मरगळ दिसली आहे. तर कमी संख्येच्या विरोधकांचा मात्र प्रचंड उत्साह दिसत आहे.
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
अधिवेशन विशेष… सावध ऐका पुढल्या हाका! : भाजपच्या नव्या मंत्रिमंडळाचा पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी!?
nice