मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज अखेर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे , मानेवरील शस्त्रक्रियेसाठी ते एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल होते.
पाठ आणि मानेवरील असह्य झालेल्या दुखण्यावर त्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती . शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले होते . मात्र काही व्यायाम करणे आवश्यक असल्याने त्यांना रुग्णालयातच बायोबबल वातावरणात ठेवण्यात आले होते आणि बाहेरील कोणासही त्यांना भेटण्याची अनुमती नव्हती.
मुख्यमंत्र्यांच्या या आजारामुळे नागपुरात नियोजित असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता . पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील त्यांना रुग्णालयात जाऊन भेटू शकल्या नव्हत्या तर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कन्याविवाहात ही मुख्यमंत्री जाऊ शकले नव्हते.
आता मुख्यमंत्री ठाकरे यांना घरी सोडले असले तरी पुढील काही दिवस त्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे , यामुळे मुख्यमंत्री मंत्रालयात कधी येतील आणि मुंबईत होणाऱ्या अधिवेशनात उपस्थित राहतील का ते मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.