मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढील दोन तीन दिवस रूग्णालयात दाखल; जनतेला उद्देशून छोटेखानी पत्रवजा संदेश!

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला उद्देशून छोटेखानी पत्रवजा संदेश दिला असून त्यात त्यांनी पाठ आणि मानेच्या त्रासामुळे पुढील दोन तीन दिवस रूग्णालयात दाखल व्हावे लागत असल्याचे म्हटले आहे. यावेळी आपण लवकरच बरे होवून पुन्हा कामाला लागू असे सांगत मुख्यमंत्र्यानी जनतेला कोविड लशीच्या दहा कोटीचा टप्पा गाठल्याबद्दल शूभेच्छा दिल्या आहेत. सर्वाना दुस-या डोसच्या मात्र घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मानेच्या दुखण्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं

आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, माझ्या बंधू, भगिनींनो आणि मातांनो जय महाराष्ट्र! गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच ! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.

आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे. या निमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो.

Social Media