मुक्त व्यापार करार वाटाघाटींचा भाग म्हणून उद्योगमंत्री पियुष गोयल यांची उद्योग जगताशी चर्चा

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत उद्योग क्षेत्रातल्या विविध हितधारकांशी कॅनडा, ब्रिटन आणि युरोपीय संघासोबत सध्या सुरु असलेल्या मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चा केली. स्वयंचलित वाहन उद्योग, रत्ने आणि आभूषण, वस्त्रोद्योग, पोलाद, तांबे आणि ऍल्युमिनियम क्षेत्रातील प्रतिनिधींशी गोयल यांनी वेगवेगळ्या बैठकांमध्ये चर्चा केली. उद्योग क्षेत्रातील प्रमुख उद्योगपती आणि उद्योग संघटना यांच्याशी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने चर्चा करण्यात आली.

सध्या वाटाघाटी सुरू असलेल्या करारामुळे, संबंधित भागीदार देशांसोबत एकंदर आर्थिक आणि व्यापारी संबंध कशा प्रकारे वृद्धिंगत होतील आणि त्यामुळे द्विपक्षीय व्यापाराला फायदा होईलच त्याच बरोबर  नवे रोजगार निर्माण होतील आणि व्यापक सामाजिक आणि आर्थिक संधी निर्माण होतील, याची माहिती मंत्र्यांनी या बैठकांमध्ये उपस्थितांना दिली. थेट आर्थिक फायदे आणि त्यातूनच निर्माण होणारी गुंतवणूक वाढ, रोजगार निर्मिती आणि रोजगार संधी यांच्यासह इतर पूरक आर्थिक फायदे अशा दोन्ही प्रकारच्या आर्थिक फायद्यांवर गोयल यांनी भर दिला.

परिस्थितीला समजून घेत पुढे जाण्याच्या या उद्योगक्षेत्राच्या वृत्तीचं यावेळी मंत्र्यांनी कौतुक केलं. या उद्योगक्षेत्राचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रत्येकानं व्यापक राष्ट्रहिताचा विचार करत, देशातील बहुक्षेत्रीय आर्थिक मूल्यसाखळ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावण्यासाठी अशाच परिस्थिला अनुसरून वाटचाल करायच्या दृष्टीकोनातूनच व्यापारविषयक वाटाघाटीना सहाय्य  करत रहावे  असं आवाहनही त्यांनी केलं.

भारतानं संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांसोबत मुक्त व्यापार करार केल्याबद्दल (FTA ) यावेळी उपस्थित असलेल्या  उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी मंत्र्यांचे आभार मानले. या करारासाठीच्या प्रक्रिया वेगाने आणि अनेकांचे  दीर्घकाळाचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दलही या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केलं.यावेळी मंत्र्यांनी भारतीय उद्योगक्षेत्रासमोरच्या समस्या समजून घेतल्याबद्दल, तसंच बाजारपेठविषयक संधीची  उपलब्धता आणि स्थानिकतेत समतोल राखला जाईल, अशारितीनं  या समस्यांबाबत ठोस उपाययोजना केल्या जातील असं आश्वस्त केल्याबद्दलही सर्व प्रतिनिधींनी मंत्र्यांचे आभार मानले.

Social Media