सहृदयी दुकानदार – एक संवाद…

“सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।”

काल, बिघडलेल्या कुकरचं झाकण घेऊन त्याचा व्हाल्व बदलण्यासाठी दुकानात गेलो. तसा कुकर नवीनच आहे. दोन वर्षांपूर्वी घेतलेला. मागच्या महिन्यात त्याचा व्हाल्व उडाला. तो आम्ही दुरुस्त केला. आता पुन्हा तोच व्हाल्व उडाला.

दुपारचे बारा वाजले होते. दुकानात गेलो तेव्हा, दुकानाचे मालक जेवण करीत होते. मी थोडावेळ थांबलो. त्यांचं जेवण झालं. हा बोला भैय्या| हात पुसत दुकानदार समोर आलेत. “अरे, वो कुकरका व्हाल्व उड गया| बहुत जल्दी खराब हुआ जी|” माझा तक्रारीचा सूर. “अच्छा हुआ, भाईसाब, बहोत अच्छा हुआ व्हाल्व उड गया|” त्याच्या या वाक्यांन मीच उडालो. “क्यों भई?”. मी म्हणालो. “भाई जी वो सेफ्टी व्हाल्व है| उसके उडणे से बहुत बडा हादसा टल गया| वर्णा कुकर फट जाता| बहुत बडा एक्सीडेंट हो सकता था|” इति दुकानदार.

कुकरच्या झाकणाचा बिघडलेला व्हाल्व त्यांनी काढला. नवीन लावला. या दरम्यान व्हाल्व उडण्याचं कारण मी त्यांना विचारलं. तर ते म्हणाले, “या तो कुकर मे पाणी कम डाला होगा| नही तो चार से ज्यादा सिटी हो गयी होगी|”.
“ऐसा है क्या? ये तो हमारे घर की महिलाओं को मालूम होना चाहिये| असा सूर लावताच दुकानदार म्हणाले, “हमने महिलाओं की परेशानी समजनी चाहिये भैया| मै तो उनको सलाम करता हु| कितना सहती है वो|
“हां| ये बात तो सही है|”. मला मध्येच टोकत ते म्हणाले, “केवल सही नही जी, एकदम सही है| एक साथ उनको बहुत सारे काम देखने पडते है| कुकर भी हो, सब्जी भी हो, अगर हम “एक कप चाय” के लिए बोले तो वो भी “अभी रखती हुं”, ऐसा ही बोलती है| फिर ऐसेही व्यस्तता मे एखाद बार ऐसा होता है| लेकिन भाई, उनके कार्यशैली को मानना चाहिए| ढेरसारी तकलीफे सहनेके बाद भी खुश रहती है वो| चालीस साल से यह दुकान चलाता हुं| मेरी अक्सर बाते होती रहती है, बहनोंसे| दुखदर्द बाटती है कुछ बहने|

मी स्तब्ध. केवळ ऐकत होतो. मला माहिती नव्हती असं नाही, परंतु एखादा दुकानदार गृहिणीच्या बाबतीत एवढा संवेदनशील असावा, त्याचं मला खूप कौतुक वाटत होतं आणि अभिमानही. माझ्या संमिश्र भावना बघून तो मला म्हणाला, “कुछ गलत तो नही बोला?”. मी त्याला हात जोडून नमस्कार केला. दुरुस्त केलेलं कुकरचं झाकण घेतलं आणि घरी परतलो. मनात विचार हा की सौभाग्यवतीला कुकरमध्ये पुरेसं पाणी घालत जा, खूप शिट्ट्या होऊ देऊ नको वगैरे..सांगावं. घरी आलो झाकण सौ. च्या हाती दिलं. “अरे तो व्हाल्व का उडाला, तुला माहित आहे का? जरा काळजी घेत जा”, मी म्हणालो. ती म्हणाली, “मला माहित आहे का उडाला तो ते. त्या दिवशी शेंगा उकडायला ठेवल्या आणि शिट्ट्या जरा जास्त झाल्यात. कुकर बंद केल्यावर बराच वेळानं व्हाल्व मधून हवा निघून गेली”, इति सौ. अगदी शांतपणे आमच्या माधुरीने उत्तर दिलं. मी पुन्हा स्तब्ध झालो. “अरे, ते पाणी कमी…”. “हो, माहित आहे. कुकरमध्ये पाणी कमी टाकल्यामुळे सुद्धा व्हाल्व उडू शकतो”. म्हणजे तुला माहित आहे तर हे. “हो, आम्हा बायांचं आयुष्य स्वयंपाक घरातच जातं, हे माहीत नसेल का? पण कधी कधी होतं असं..”. मी तिलाही हात जोडून नमस्कार केला. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला घडलेला हा सकारात्मक संवाद, घराघरातील मातृशक्तीला समर्पीत करतो.
या देवी सर्वभूतेषु मातृरूपण संस्थिता| नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तेस्ये नमो नमः||

 

श्रीकांत तिजारे
भंडारा ९४२३३८३९६६

Social Media