मुंबई : भाजपा संविधान(constitution) बदलणार असा खोटा प्रचार करणाऱ्या काँग्रेसनेच आणीबाणीच्या काळात घटनादुरुस्ती करत संविधानात अनेक बदल केले.अनेक नवीन कायदे करत काँग्रेसनेच दलितांचे सर्वाधिक नुकसान केले.त्यामुळे भाजपा संविधान बदलणार आणि आरक्षण(reservation) हिसकावणार या काँग्रेसच्या अपप्रचाराला यावेळी बळी पडू नका, असे आवाहन उत्तर प्रदेशचे निवृत्त पोलिस महासंचालक आणि भाजप राज्यसभा सदस्य ब्रज लाल यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले.त्याचवेळी संविधानाचे सर्वात मोठे रक्षक भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हेच असल्याचा दावाही लाल यांनी केला.
”मी स्वत: दलित आहे ” असे सांगून खा. लाल म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar) हेच संविधानाचे निर्माते आहेत.पण काँग्रेस आणि उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीसह विरोधी पक्षांनी दलितांना प्रभावित करण्यासाठी संविधान बदलले जाणार, आरक्षण हिसकावले जाईल असा अपप्रचार लोकसभा निवडणुकीत चालवला.मात्र संविधान सदन असे नाव दिलेल्या जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनात जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: हातात संविधानाची प्रत घेऊन गेले आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठोपाठ होतो.पण त्यावेळी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस सहभागी झाले नव्हते, याकडेही खा.लाल यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
संविधानाचे सर्वात मोठे नुकसान कोणी केले असेल तर ते काँग्रेसने केले आहे. कारण प्रशिक्षणाच्या काळातच आम्हाला शिकवले जात होते की संविधानात बदल केला जाऊ शकत नाही,मौलिक अधिकार हिसकावले जाऊ शकत नाही.मात्र आणीबाणी लागू करत काँग्रेसने नागरिकांचे मूलभूत अधिकार तर हिसकावलेच पण आणीबाणीच्या काळात संविधानाची मोडतोड करत त्यात समाजवादी आणि सेक्युलर हे शब्द घुसवण्याचे काम काँग्रेसनेच केल्याने संविधानाचा मूळ आत्माच हरपला.तरीही हेच काँग्रेसवाले आणि विरोधक आता भाजपा संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार करत असल्याचा गंभीर आरोपही खा.लाल यांनी केला.
जवाहरलाल नेहरू यांनी त्याकाळात देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते की आम्हाला आरक्षण नको आहे, याचीही खा.लाल यांनी आठवण करून दिली.ते म्हणाले की,संविधानाने लागू केलेले आरक्षण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय देऊनही अलिगढ विद्यापीठाने आजतागायत दिलेले नाही. कारण काँग्रेसने याच अलिगढ विद्यापीठासाठी कायदा बदलून दलितांना आरक्षणापासून वंचित ठेवले. आणि आजही अलिगढ विद्यापीठाचे आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे नमूद केले. हेही वाचा -शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर,
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदे तयार करून दलितांना न्याय दिला.नागरिकत्व सुधारणा कायद्याचा (सीएए) सर्वाधिक फायदा दलितांनाच झाला.त्यातही फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेल्या आणि तेथे अत्याचार झाल्यानंतर भारतात परतलेल्या दलितांना या कायद्यामुळे भारताचे नागरिकत्व मिळाले.पण इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न मिळाले मात्र संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेबांना भारतरत्न दिले गेले नाही.ते १९९० मध्ये भाजपाच्या पाठींब्याने व्ही.पी.सिंह सरकारने डॉ. बाबासाहेबांना भारतरत्न दिल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
खा.लाल यांनी सांगितले की,काँग्रेस सरकारच्या काळात मुंबईसह देशभरात शेकडो ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्यामागे कुणाचा हात आहे हे माहीत असतानाही काँग्रेसने भगवा दहशतवाद असल्याचे चित्र निर्माण केले. दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे आढळलेल्यांनाही कायम संरक्षण देण्याचेच काम काँग्रेसने केले. २६ /११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेच्या आधी मुंबईतील गोरेगाव येथील लष्कर – ए – तोयबाचा कमांडर फाईम अन्सारी याला आम्ही पकडले असता त्याच्याकडे मुंबई हल्ल्यासाठीचा नकाशा सापडला होता. ते आम्ही मुंबई पोलिसांना कळवले. त्यांनी त्यावेळी दक्षता घेतली असती तर हल्ला रोखता आला असता पण काँग्रेस सरकारने त्यावेळी काहीच केले नाही. उलट हुतात्मा पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूला भगवा दहशतवाद कारणीभूत असल्याचा अपप्रचार काँग्रेसने केल्याच्याच आरोपाचा पुनरुच्चारही खा.लाल यांनी केला.असाच अपप्रचार करणारे तेव्हाचे एक कॅबिनेट मंत्री नंतर दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून तुरुंगात गेले. काँग्रेसच्या याच गोबेल्स नितीपासून सर्वांनीच सावध राहणे आवश्यक असल्याचे आवाहनही खा.लाल यांनी केले.यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयभाई गिरकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे मुंबई अध्यक्ष शरद कांबळे उपस्थित होते.