मुंबई : महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या सरकारी निवासस्थानी काँग्रेसने आज थेट धडक मारली. काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरले. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचे आंदोलन तात्परते मागे घेत आहे मात्र नरेंद्र मोदी महाराष्ट्राची माफी मागेपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी संसदेत बोलताना महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला असा आरोप करुन शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान केला. मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला असून माफी मागावी यासाठी राज्यभर आंदोलन सुरु असून औरंगाबाद, नागपूर व भिवंडी येथे भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी आज आंदोलन केले. नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला. पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा अडवला पण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जेथे अडवले तेथेच त्यांनी आंदोलन केले तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनाही पोलिसांनी अडवले तेथेच आंदोलन केले. प्रदेश सरचिटणीस अतुल लोंढे यांनी फडणवीसांच्या बांगल्यावर गनिमी काव्याने धडक देऊन महाराष्ट्रद्रोही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांचा निषेध केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मोदींचा निषेध करण्यासाठी वारकरी परिषदेचे विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारकरी टाळ मृदुंगासह मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
भाजपाच्या गुंडगिरीने मुंबईकरांना वेठीस धरल्याने मुंबईतील आंदोलन तात्पुरते स्थगित !
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांच्या विचारांचा अपमान केला असून भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आहे, आम्ही त्याचा निषेध करतो. मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितलीच पाहिजे ही आमची मागणी आहे. यासाठी आम्ही आज मुंबईत आंदोलन केले. काँग्रेस अहिंसावादी आहे, हिंसावादी नाही, आमचे आंदोलन झाले आहे. आम्हालाही गुंडगिरी करता येते पण ही आमची संस्कृती नाही. आम्हाला संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला. परंतु भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाऱाष्ट्राला दाखवला. मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल पण मोदींचे समर्थन करु अशी भाजपाची वृत्ती आहे. भाजपासाठी नरेंद्र मोदी देशापेक्षा मोठे असतील आणि देवेंद्र फडणवीस त्यांना महाराष्ट्रापेक्षा मोठे वाटत असतील पण आमच्यासाठी देश, महाराष्ट्र व महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे. भाजपानेच लोकांना रस्त्यावर आणून भाडोत्री लोकं उतरवली, त्यांनीच रस्ता जाम केला, त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागला. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचे आंदोलन आम्ही तात्पुरते मागे घेत आहोत पण हे आंदोलन सुरुच ठेवण्याची आमची भूमिका कायम आहे.
अतुल लोंढेंची फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर गनिमी काव्याने धडक.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी खालच्या पातळीची भाषा वापरत फडणवीसांच्या बंगल्यावर येऊन दाखवा असे आव्हान दिले होते. ते स्वीकारून काँग्रेस सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गनिमी कावा करत फडणवीस यांचे सरकारी निवासस्थान ‘सागर’वर थेट धडक मारली. पोलिसांनी मुस्कटबाजी करण्याचा प्रयत्न केला तरिही त्यांनी एकदा नाही तर अनेकदा महाराष्ट्रद्रोह्यांचा निषेध केला. अतुल लोंढे यांनी सागर बंगल्यावर थेट धडक मारली व परतही आले पण त्यांना आव्हान देणारे प्रसाद लाड मात्र कुठेही त्यांचा प्रतिकार करायला आले नाहीत किंवा दिसलेही नाहीत.
आजच्या आंदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे, संजय राठोड, प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, राजेश शर्मा, प्रदेश काँग्रेसच्या व्हिजेएनटी सेलचे अध्यक्ष मदन जाधव, एनएसयुआयचे संदीप पांडे, राकेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमरावतीत नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक, सत्तारूढ पुन्हा सत्तेत
शिवभोजन केंद्रावरील गैर प्रकार खपवून घेणार नाही : मंत्री छगन भुजबळ