मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
विधानसभेताल काँग्रेसच्या उपनेतेपदी आ. अमीन पटेल यांची, मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची, सचिव पदी आ. डॉ. विश्वजीत कदम यांची आणि प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विधानपरिषदेत गटनेतेपदी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्य प्रतोदपदी आ. अभिजीत वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
“विधिमंडळात काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाली असली तरी उत्साह व ऊर्जा कायम असून जनतेच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल. सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी पक्षाचे नवे शिलेदार महत्वाची भूमिका बजावतील” असे सांगून प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.