‘जाणीव उद्याची, स्त्री मनाची’ कार्यक्रमाने महिलांना दिली नवी उमेद

मुंबई : संपादिका व पत्रकार सोनल खानोलकर(Sonal Khanolkar) आयोजित मनातली जाणीव दिवाळी अंक व निनाद प्रकाशनातर्फे रविवारी महिला दिनानिमित्त ‘जाणीव उद्याची, स्त्री मनाची’ विशेष कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी मंदिर, दादर येथे मोठ्या उत्साहात झाला. सोनलने वडिल स्व. सुरेश खानोलकर यांचं नाव जपण्यासाठी वयाच्या १६ व्या वर्षी ‘खतरनाक’ दिवाळी अंकाच्या संपादकपदाची धुरा स्वीकारली. जाणीव चे १४ वर्षे सातत्याने काम करताना समाजातील इतर महिलांना नवी उमेद देण्याच्या उद्देशाने हा सोहळा होतो. यावेळी निर्माती व अभिनेत्री जीजा नांदगावकर, ज्येष्ठ पत्रकार मनिषा रेगे, बिट्स एण्ड बाईट्स विद्या बारसकर, क्राईम रिपोर्टर मनिषा म्हात्रे, उद्योजिका मंजिरी निरगुडकर-राव यांचा सत्कार करण्यात आला. तुमच्या आयुष्यातील प्रभाव टाकणारी ‘ ती’ या विषयावरील परिसंवादात दिग्दर्शक केदार शिंदे, माईंड रीडर केदार परूळेकर, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ अभिनेता ह्रषिकेश शेलार, अभिनेत्री व निर्माती शर्मिष्ठा राऊत-देसाई, स्त्रीरोग तज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर, शेफ स्मिता देव, सरोज स्वीटस संचालिका मनिषा मराठे यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाची सुरुवात ‘केतकी स्वर’ केतकी भावे, स्वरा जोशी यांचा सांगितिक कार्यक्रम झाला. मनोगत व्यक्त करताना सोनल म्हणाली, ” माझ्या वडिलांचं नाव कायम रहावे असं वाटायचं.‌ ३२ वर्षांपूर्वी‌ वडिल गेले आणि ३१ वर्षे ‘खतरनाक’ चं काम माझ्याकडे आलं. समाजातील झटणा-या महिलांना उमेद देण्यासाठी हा सोहळा मी सातत्याने करते. परिसंवादातून विचारांची देवाणघेवाण होते त्यामुळे हे एक वैचारिक व्यासपीठ आहे. दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, ‘अग बाई अरेच्चा’ आणि ‘बाईपण भारी देवा’ या स्त्रीप्रधान चित्रपटांमुळे मला त्यांच्या अडचणी अधिक तीव्रतेने जाणवल्या. बेलाशी लग्न झालं आणि पहिल्यांदा राज्य नाट्याचं पुरस्कार मला मिळाला. माझी मुलगी सना हे आमच्यातला महत्वाचा दुवा आहे. डॉ.नंदिता पालशेतकर यांनी सासूबाईंचा उल्लेख करत त्यांनी घरची जबाबदारी सांभाळली त्यामुळे मला अभ्यास आणि व्यवसाय करता आला अशी आठवण सांगितली. ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी म्हणाले, “सोनलने जाणीव मध्ये उणीव ठेवलेली नाही. नाती हळुवार जपली की ती टिकतात. जगणं सुंदर असतं मरणही सुंदर पण मरणानंतर उरणं त्याहून सुंदर असतं.” केदार परूळेकर यांनी प्रेक्षकांतील एका व्यक्तीला बोलावून त्यांच्या मनातले अचूक नाव ओळखून उपस्थितांना थक्क केले. अभिनेता ह्रषिकेश यांनी ‘अधिपती’ चे संवाद ऐकवून उपस्थितांचे मनोरंजन केले. शेफ स्मिता देव यांनी सासूकडून पाककलेचे धडे गिरवले. आई, सासू, मुलगा या तिघांनी मला फार जपलं. मला पाककलेच्या क्षेत्रात आणण्यात भरपूर पाठिंबा दिला हे आवर्जून सांगितलं.

साहित्यिका डॉ. विजया वाड यांचे मार्गदर्शन लाभले. स्मिता गवाणकर यांनी बहारदार सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली. शिवसेना नेत्या यामिनी जाधव यांनी कविता सादर केली. यावेळी १० महिलांना लकी ड्रॉ द्वारे कुबल मसाले, ज्योवीस वेलनेस, निरगुडकर फार्मतर्फे भेट देण्यात आली.

Social Media