कोरोना स्थिती गंभीर; रत्नागिरीतील जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री उदय सामंत पंढरपूर वारीत दंग

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना स्थिती क्षणाक्षणाला गंभीर होत चाललेली आहे. मात्र कोरोना विरोधात लढणाऱ्या प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणेचे मॉनिटरिंग न करता, जनतेला वाऱ्यावर सोडून येथील मंत्री उदय सामंत हे पंढरपूरच्या वारीत दंग आहेत. रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता, तसा हा भयंकर प्रकार असल्याची जळजळीत प्रतिक्रिया रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने यांनी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केली आहे.

मंत्री समंतांचे वागणे हे रोम जळत असताना निरोने फिडेल वाजविण्या सारखे

रत्नागिरी तालुका तसेच पूर्ण जिल्ह्यातच कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. १ ते १२ एप्रिल या १२ दिवसात जिल्ह्यात तब्बल १९३१ रुग्ण सापडले आहेत. रुग्णांना तातडीने उपचार मिळू शकत नाहीत, हे रत्नागिरीतील कोतवडेसह अनेक ठिकाणी दिसून आले आहे. पुरेशा सुविधा नसल्याने वैद्यकीय यंत्रणाही भांबावून गेली आहे. अशावेळी या भागातील मंत्री म्हणून उदय सामंत यांची काही जबाबदारी आहे की नाही, असा संतप्त सवालही  माने यांनी केला आहे. वेळेत रुग्णवाहिका न येणे, उपचार न मिळणे आणि अपुऱ्या सुविधांमुळे कोरोना रुग्णांचे हाल सुरुच आहेत. याला मंत्री उदय सामंत हेच जबाबदार असल्याचा आरोप माने यांनी केला आहे.

माजी आमदार बाळासाहेब माने यांचा सामंत यांच्यावर हल्लाबोल

बाळ माने म्हणाले, रत्नागिरीच्या ग्रामीण भागातील अनेक कोरोना बाधित रुग्ण हे रुग्णालये, आणि आरोग्य केंद्राच्या दारात उपचारासाठी तळमळत आणि तडफडत असताना त्यांना रुग्णवाहिकासुद्धा वेळेत उपलब्ध होऊ नये, ही मोठी शोकांतिका आहे. कोतवडे आरोग्य केंद्रात सोमवारी सकाळी ११ वाजता कोरोना पोझीटिव ३ रुग्ण होते. तेथील डॉक्टरनी त्या रुग्णांना उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यासाठी १०८ ला कळवूनही रुग्णवाहिका आली नाही. त्यानंतर आणखी ३ रुग्ण पोझीटिव मिळाले. तरीही रुग्णवाहिकेचा पत्ताच नव्हता.

सकाळी ११ वाजल्यापासून आरोग्य केंद्राच्या दारात उपचाराची प्रतीक्षा करणाऱ्या या रुग्णांना अखेर सायंकाळी ७.३० वाजल्यानंतर रुग्णवाहिका मिळाली. त्यानंतर त्यांना रत्नागिरीत नेण्यात आले. अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असताना त्याबाबत कोणालाच काही देणे घेणे नाही. याला पंढरपूरची वारी करणारे मंत्री सामंत हे प्रामुख्याने जबाबदार आहेत. आधी रत्नागिरीच्या रुग्णांच्या जीविताची काळजी घेण्याची जबाबदारी असताना पंढरपूरच्या रुग्णांसाठी वाऱ्या कशासाठी, असा खडा सवाल  माने यांनी उपस्थित केला आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांना फोन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रीचेबल होते, असेही माने यांनी सांगितले.

तब्बल साडेसात तास उशीर

कोतवडे आरोग्य केंद्रातून माहिती घेतली असता कोरोना बाधित ३ रुग्ण सकाळी ११ वाजता आणि दुपारनंतर आणखी ३ बाधित रुग्ण आढळले होते. तसेच सकाळी मागवलेली १०८ ची रुग्णवाहिका सायंकाळी ७.३० वाजता आली. याबाबत स्थानिक माजी उपसरपंच स्वप्नील मयेकर यांनीही तीव्र संताप व्यक्त केला असून या प्रकरणी वरिष्ठ स्तरावर तक्रार करणार असल्याचे सांगितले.

बाळासाहेब माने म्हणाले…

प्रशासनाला हाताशी धरून सोमवार ते शुक्रवारपर्यंत लॉकडाऊन सदृश स्थिती निर्माण केली जात आहे. त्यातच शनिवार, रविवारी पुन्हा अधिकृत लॉकडाऊन केले जात आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचेही हाल सुरू आहेत. त्यांना वाली कोण आहे? रत्नागिरी बाजारपेठेचे आर्थिक कंबरडे जाणून बुजून मोडण्याचा घाट घातला गेला आहे.

मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ रत्नागिरीत यावे.जिल्हा टास्क फोर्स तयार करून शहरी आणि ग्रामीण भागात आरोग्याच्या सर्व सुविधा बहाल काराव्या. भाजप म्हणून आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन सहकार्य करण्यास तयार आहोत. रत्नागिरी नगर परिषदेच्यावतीने वेगळे कोविड सेंटर पुढील चार महिन्यांसाठी सुरू करावे.

Social Media