कोविड-19 च्या रुग्णांवरील उपचारासाठी केईएम रुग्णालयावर आतापर्यंत 3 कोटी 88 लाखांचा खर्च

मुंबई :  केईएम रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ३ कोटी ८८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. केईएममधील ४ वॉर्डमध्ये  करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कक्षांची उभारणी करण्याकता ६ कंपन्यांची मदत घेण्यात आली. एकाच कंपनीला दोन ते तीन कामे देत त्यांच्याकडून कामे करून घेण्यात आली आहेत.

मुंबई करोनाच्या रुग्णांसाठी कस्तुरबा रुग्णालयासहित प्रारंभी नायर, राजावाडी रुग्णालयांसह इतर महापालिका रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केईएम रुग्णालयात करोना उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वाढू लागली. त्यामुळे केईएम रुग्णालयात डायलेसिसची आवश्यकता असलेल्या करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कक्षाची स्थापना करण्यात आली.

केईएम रुग्णालयात यासाठी अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांना दिलेल्या अधिकाराच्या अधीन राहून महापालिकेने निविदा न मागवता काही कंत्राटदारांच्या नेमणूक करत त्यांच्याकडून कामे करून घेतली. केईएम रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २, ६ आणि १० मध्ये तसेच इएमएस ऑपथल वॉर्ड क्रमांक १३ मेन  पॅसेजमध्ये कोविड १९ विलगीकरण कक्ष बनण्यात आला. तसेच यासाठी अतिरिक्त ऑक्सिजन  टँक बनवण्यासाठी लक्ष्मी एंटरप्रायझेस या कंपनीला काम देण्यात आले. तर विद्युत कामांसाठी डिजिटल टेलि सिस्टीम कंपनीवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच इतर कामांसाठी अन्य कंपनींची निवड करण्यात आली. या विविध कामांसाठी ३ कोटी ८८ लाख ४ हजार ५०६ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

केईएम रुग्णालयांत सर्वसाधारण रुग्णांवरील उपचार करण्यात येत असल्याने याठिकाणी कोविड कक्ष सुरु न करण्याचा निर्धार प्रशासनाने केला होता. परंतु या कालावधीत सर्वसाधारण रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने याठिकाणी कोविड रुग्णांसाठी डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. केईएम ऐवजी महात्मा गांधी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची पडताळणी करत प्रशासनाने त्यादृष्टीकोनातून पाऊल उचलले होते.

Social Media