सीडीएससीओ संस्थेने यापूर्वीच कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींची साठवण मुदत अनुक्रमे 12 आणि 9 महिन्यांपर्यंत वाढविली आहे
नवी दिल्ली, 3 जानेवारी 2022 : राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत भारतातील नागरिकांना मुदत संपलेल्या लसींच्या मात्रा दिल्या जात आहेत असा आरोप करणाऱ्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. या बातम्या चुकीच्या आणि लोकांची दिशाभूल करणाऱ्या आहेत.
मे. भारत बायोटेक आंतरराष्ट्रीय मर्या. या कंपनीच्या BBIL/RA/21/567 क्रमांकाच्या पत्राला प्रतिसाद देत सीडीएससीओ अर्थात केंद्रीय औषध मानके नियंत्रण संघटनेने 25 ऑक्टोबर 2021 रोजी, कोवॅक्सिन या लसीची साठवण मुदत मर्यादा 9 महिन्यांवरून वाढवून 12 महिने केली होती. त्याच प्रकारे सीडीएससीओने 22 फेब्रुवारी 2021 रोजी कोव्हिशिल्ड लसीची साठवण मुदत मर्यादा 6 महिन्यांवरून वाढवून 9 महिने केली होती.
दोन्ही लसींच्या कार्यक्षमता स्थिरतेच्या अभ्यासाविषयी लस निर्मात्यांनी दिलेल्या माहितीचे परीक्षण तसेच समावेशक विश्लेषण यांच्या आधारेच राष्ट्रीय नियामक संस्थेने या लसींची साठवण मुदत मर्यादा वाढविली आहे.