कोविड-19 लसीकरणाचा भंडारा जिल्ह्यात थाटात शुभारंभ; लसीचा पहिला मान डॉ. पीयुष जक्कल यांना

भंडारा : बहुप्रतिक्षित कोविड लसीकरणाचा शुभारंभ 16 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील तीन केंद्रावर होणार थाटात पार पडला असून लसीकरणासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. सिरम इन्स्टिट्यूट पुणे निर्मित कोविशिल्ड लस घेण्याचा पहिला मान सामान्य रुग्णालयातील डॉ. पीयुष जक्कल यांना तर महिलांमध्ये डॉ. वंदना कुकडे, उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे डॉ. सचिन बालबूध्दे व ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे डॉ. योगेश गिऱ्हेपुंजे यांना मिळाला. सकाळी 10.30 वाजता जगातील सर्वात मोठया लसीकरणाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथील लसीकरण केंद्राला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी भेट दिली व केंद्राची पाहणी केली.

येथील सामान्य रुग्णालयात आयोजित कार्यक्रमास खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, कार्यक्रम समन्वयक डॉ. माधुरी माथूरकर व डॉ. निखिल डोकरिमारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मोटघरे यावेळी उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील लसीकरण केंद्रावर जिल्हास्तरीय लसीकरणाचा शुभारंभ सकाळी 10.30 वाजता करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थित डॉ. जक्कल यांना कोविशिल्डची पहिली लस देण्यात आली. लसीकरण केंद्रावर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.

कोविड-19 ची लस घेण्यासाठी जिल्ह्यातील डॉक्टर व हेल्थ वर्कर्सनी सकाळपासूनच केंद्रासमोर रांगा लावल्या होत्या. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर लस घेण्यासाठीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. लस घेतांना डॉक्टरांचा उत्साह व प्रतिसाद वाखाण्याजोगा होता. लस घेतल्यानंतर डॉक्टरांनी अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मनात कुठलीही शंका न ठेवता नागरीकांनी येत्या काळात लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लस घेतल्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता.

शनिवार 16 जानेवारीला जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर व ग्रामीण रुग्णालय लाखनी येथील लसीकरण केंद्रावर कोविड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. लसीकरणाची सर्व तयारी आरोग्य विभागाने केली होती. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरिक्षण कक्ष उभारण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर म्हणजे आरोग्य सेवा देणाऱ्यांना लस देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांची यादी यापूर्वीच कोविन अँपवर अपलोड करण्यात आली होती.

सिरम इन्स्टिट्यूट पुणे द्वारा निर्मित कोविशिल्ड लसीचे 9500 डोज आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. प्रत्येकी दोन याप्रमाणे 4750 लाभार्थ्यांना ही लस स्नायूमध्ये पॉईंट पाच एमएल द्यावयाची असून एक व्हायलमध्ये दहा लाभार्थी कव्हर होणार आहेत. याच लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोज घ्यावयाचा आहे. कोविशिल्ड लसीचे दोन डोज घेतल्यानंतर पुढच्या 14 दिवसानंतर लस घेणाऱ्याच्या शरिरात अँटिबॉडी तयार व्हायला सुरुवात होईल. कोरोनाची लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे व सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे अशा मार्गदर्शक सूचना यावेळी लस घेणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यात आल्या. लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर मेसेज देण्यात आले होते. लाभार्थी केंद्रावर आल्यानंतर त्यांना प्रतीक्षा कक्षात बसवून समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर लाभार्थीना लसीकरण कक्षात नेवून प्रत्यक्ष लस देण्यात आली.

लसीकरण कक्षात त्यांना  आपणास कोरोनाची लस देण्यात आली आहे व ही लस आपले कारोना आजारापासून संरक्षण करेल, लस घेतल्यानंतरही कोरोना आजारापासून सुरक्षित राहण्याच्या पध्दती जसे की, मास्क लावणे, वारंवार हात धुणे आणि सहा फुटाचे सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. लसीकरणानंतर आपणास काही त्रास जाणवल्यास आपण आपल्या एएनएम-आशा कार्यकर्ती, जवळच्या आरोग्य किंवा कंट्रोलरुमशी संपर्क साधावा व पुढील डोजची तारीख, वेळ आणि ठिकाण आपणास आपल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, असे चार संदेश समजावून सांगून लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर लाभार्थ्यास अर्धा तास निरिक्षण कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात येवून व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना घरी जाण्यास सांगितले. शुभारंभाच्या दिवशी तीन केंद्रावर 300 लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. यापुढेही आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार व गुरुवारला नियमितपणे लसीकरण सुरू राहणार आहे.
Tag-Covid-19 vaccination launched/Bhandara district

Social Media