मुंबई : देशासह राज्यातील काही भागात घडलेल्या अप्रिय घटनेच्या पार्श्वभूमीवर धार्मिक भावना भडकविण्याऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट , खोटया बातम्या प्रसारीत करणारे ऑडिओ , व्हिडीओ आणि संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. अशाप्रकारच्या पोस्ट ऑडिओ , व्हिडीओ फॉरवर्ड करू नये असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे. त्रिपुरातील हिंसाचारांच्या घटनेचा निषेध शुक्रवारी देशभरासह राज्यातील काही भागात मुस्लिम बांधवांनी आंदोलन केले.या आंदोलना दरम्यान काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी हे आवाहन केले. धार्मिक भावना भडकविण्याऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट, खोटया बातम्या प्रसारीत करणारे ऑडिओ , व्हिडीओ आणि संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
अशा आक्षेपार्ह पोस्ट प्राप्त झाल्यास त्या – त्या समाज माध्यमांवर रिपोर्ट करावे
कारण सामाजिक शांतता भंग करणारे , समाजविघातक व्हिडीओ , पोस्ट , संदेश , सोशल मिडीयावर व्हायरल करणे कायद्याने गुन्हा आहे . अशा प्रकारच्या पोस्ट , व्हिडीओवर लक्ष ठेवण्याबाबत फेसबुक , इंस्टाग्राम , ट्विटर , व्हॉट्सअप इत्यादी सर्व सार्वजनिक माध्यमांना कळविण्यात आले आहे . सोशल मिडीया व इंटरनेटच्या माध्यमातुन पोस्ट करताना सामाजिक भान ठेवत माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० ( I.T. ACT 2000 ) मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे . व्हॉट्सअप वापरणारे ग्रुप मध्ये असणारे सर्व सदस्य विशेषतः ग्रुप अॅडमिन्सनी आपल्या ग्रुपमध्ये अशा प्रकारचे पोस्ट किंवा व्हिडीओ प्रसारीत होणार नाहीत याची विशेष दक्षता घ्यावी . कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये . तसेच अशा प्रकारचे धार्मिक भावना भडकविणारे व खोटया बातम्या प्रसारीत करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करून नये . तसेच अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करताना कोणीही आढळुन आल्यास त्याची माहिती त्वरीत जवळच्या पोलीस ठाण्यास द्यावी असे आवाहनही पोलिसांनी केलं.