आज आषाढी अमावस्या(Ashadhi Amavasya) म्हणजेच दीप अमावस्या. हिलाच दिवली अमावस्या किंवा दिव्यांची आवस असंही म्हणतात. दीप हे ज्ञानाचं प्रतिक. जीवनातला अंध:कार दूर करणाऱ्या दिव्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आपल्या भारतीय संस्कृतीत, पूजा पद्धती सांगितली आहे. या पूजा पद्धतीत सर्व प्रथम शंख, घंटा पूजन आणि दीप पूजन केल्यानंतर पुढील पूजा विधी केला जातो. “भो दीप ब्रह्मरूपस्तवं ज्योतिषां प्रभुरव्यय:|” असा दीप पूजनाचा श्लोक आहे.
हा इवलासा दिवा रात्रीच्या अंधारात लावला की अंधाराला झाकून टाकतो आणि प्रकाश पसरवितो.
आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीपपूजा. दीप अमावस्येनंतर श्रावण(Shravan) मासाला सुरूवात होते. श्रावण(Shravan) मास म्हणजे व्रत वैकल्यांचा महिना. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी, पोळा हे सण समारंभ साजरे केले जातात. अशा या श्रावण महिन्याची शुभसुरवात करण्यासाठी दीपप्रज्वलन.
परोपकारी असणारा, हा दिवा, स्वतः मात्र जळत असतो, कुठलीही अपेक्षा न ठेवता. अत्यंत विपरीत परिस्थितीत न घाबरता, न डगमगता, येणाऱ्या संकटांवर यशस्वी मात करू, असा विश्वास जागविणारा, संशया ऐवजी संयमाचा वारसा जपणारा आणि निराशेच्या अंधारा ऐवजी प्रकाशाची वाट दाखविणाऱ्या या दिव्याला आपल्या भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे.
आजही, अनेक कुटुंबात दिवेलावणीला “शुभम करोति कल्याणम, आरोग्यं, सुख संपदा, शत्रू बुद्धी, विनाशाय, दीप ज्योती नमोस्तुते” असा परोचा म्हटला जातो.
“थांब लक्ष्मी कुंकू लावते..” या चित्रपटातील शुभंकरोती म्हणा हे गीत आजही घराघरातून आवडीने गायीलं जाते. “जेथे ज्योती, तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी|”. या ओळी दिव्याची महती गावून जातात. तिथेच, “या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा” असं म्हटलेलं आहे.
आज देशात अस्मानी रुपात आलेली आपदा, संकट, दूर होऊन, जनजीवन सुरळीत व्हावं, आरोग्य टिकून राहावं, तसेच आपल्या समाज मनात परस्परांबद्दल वाढत चाललेला धर्म आणि जाती-पातीचा दुरावा कायमचा नाहीसा होवून समाजात सद्भाव आणि प्रेमाचे वातावरण निर्माण व्हावे अशीच मागणी, आपल्या देशबांधवांसाठी आपण आजच्या दिवशी करु यात| ज्योत से ज्योत जगाते चलो…
देशात घोंगावणाऱ्या शैतानी वादळात, संस्कृतीचा, संयमाचा, दिवा लावून, तो अधिक तेजोमय करण्यासाठी, दीप पूजन करून, स्नेहप्रकाश फुलवू या|
वंदनिय तुकडोजी महाराज ग्रामगीतेतील २७ व्या अध्यायात म्हणतात…
सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय !
लोक सुधारणेचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना !!
भाग्योदय घडविणाऱ्या या दीप पूजनाचे दिवशी, घरा घरात लक्ष्मीचा निरंतर वास असू द्यावा, आणि “ज्योतीने तेजाची आरती..” हा भाव प्रत्येकाच्या मनात कायम रुजू देत, अशी त्या दीप देवतेस, अमुची ही सामुदायिक प्रार्थना..
श्रीकांत भास्कर तिजारे
९४२३३८३९६६