नवी दिल्ली : तामिळनाडू मध्ये सुलूर इथल्या विमानतळावरून उड्डाण केलेले वायुदलाचे एम आय 17 हेलिकॉप्टर निलगिरी पर्वतरांगेत कोसळून झालेल्या भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 13 जण मृत्युमुखी पडले आहेत , याच हेलिकॉप्टर मधून प्रवास करणाऱ्या तिन्ही सेना दलांचे प्रमुख असणाऱ्या जनरल बिपिन रावत हेदेखील आपल्या पत्नीसह या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत , सायंकाळी उशिरा वायुदलाने हे जाहीर केले.
कुनुर जिल्ह्यात आज दुपारी साडेबारा च्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला असून त्यात रावत आणि त्यांच्या पत्नीसह 14 जण प्रवास करत होते. अपघात झालेल्या हेलिकॉप्टर ला आग लागल्याने त्यात 14 पैकी 13 जण मृत्युमुखी पडल्याचे भारतीय वायुदलाने स्पष्ट केले आहे , रावत हे वायुदलाच्या प्रशिक्षणार्थी सैनिकांना संबोधित करण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली.
अपघात स्थळी जळणाऱ्या हेलिकॉप्टरमधून स्थानिक लोकांनी पोलीसांच्या सहकार्याने बाहेर काढले , त्यातील एक गंभीर जखमी अवस्थेत असून त्याच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत , काही मृतदेह वाईट रीतीने जळलेल्या अवस्थेत अस्ताव्यस्त पडलेले होते. या मृतदेहांची डी एन ए चाचणी केल्याशिवाय त्यांची ओळख पटवणे मुश्कील असल्याचे सांगण्यात आले आहे , यामुळेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत यावर कोणतेही वक्तव्य केले नाही , ते उद्या होण्याची शक्यता आहे . दरम्यान राजनाथसिंह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी बिपीन रावत यांच्या शासकीय निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली.
आज सायंकाळी उशिरा देशाच्या संरक्षण विषयक कॅबिनेट समितीची तातडीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होत असून त्यात सद्य स्थिती वर चर्चा करण्यात येईल, दरम्यान या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे वायुदलाने जाहीर केले असून वायुदलप्रमुख घटनास्थळी भेट देणार आहेत .