महिला व बालविकास विभागात २०२५ मध्ये पदभरती(Department-of-Women-and-Child- Development)
मुंबई : राज्य सरकारने नुकताच ७० हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारे ५,६३९ अंगणवाडी सेविका आणि १३,२४३ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १८,८८२ पदांची भरती होणार आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे(Aditi Tatkare) यांनी दिली.
मुख्य सेविका पदासाठी १४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ या कालावधीत सरळ सेवेद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाईल. ही प्रक्रिया पारदर्शक आणि योग्य पद्धतीने होण्यासाठी तटकरे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यासंबंधी मंत्रालयात त्यांनी एक बैठकही घेतली. या बैठकीला विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
तटकरे यांनी राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळातील रिक्त पदांसाठीही लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.
विभागाची स्थापना आणि उद्दिष्टे
महाराष्ट्र सरकारने १९ जून १९९३ रोजी महिला व बालविकास विभागाची स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणून स्थापना केली. या विभागाचा मुख्य उद्देश महिलांचे आणि बालकांचे जीवन, सुरक्षा, विकास आणि समाजातील सहभाग यावर लक्ष केंद्रित करणे आहे. धोरणे तयार करणे, कार्यक्रम आणि योजना आखणे, विकास योजनांची अंमलबजावणी करणे तसेच सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधणे ही या विभागाची प्रमुख दायित्वे आहेत.
महाराष्ट्रातील लोकसंख्या
महाराष्ट्र हे देशातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. येथे सुमारे ११.२ कोटी लोक राहतात. यातील महिलांची संख्या ५.४१ कोटी (४८%) आहे, तर ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या १.३३ कोटी (१२%) आहे. या वयोगटातील लिंग गुणोत्तर ८९४ आहे.
या भरतीमुळे विभागाला बळकटी मिळेल आणि महिला व बालकांच्या कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे काम करता येईल, अशी अपेक्षा आहे.