मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन कटीबद्ध : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे,दि.२८(जिमाका) : कवी कुसुमाग्रजांनी (Poet Kusumagraj)मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या “रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी..!! रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर..! येथे अहम् ता द्रवली, झाले वसुधेचे घर..!” या पंक्ती अत्यंत समर्पक असून मराठी भाषेला वैश्विक बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मराठी भाषा संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आज नवी मुंबई येथे केले. नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी आयोजित विश्व मराठी संमेलन-२०२४ च्या दुसऱ्या दिवसाच्या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मराठी भाषा व शालेय शिक्षण तथा मुंबई (शहर) पालकमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar), आमदार गणेश नाईक(Ganesh Naik),आमदार मंदा म्हात्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर, मराठी आंतरराष्ट्रीय मंच चे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे आदि मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस (Fadnavis))पुढे म्हणाले, मराठी मातीत वैश्विकता आहे. संत ज्ञानेश्वर(Saint Dnyaneshwar) माऊलींनी सांगितलेला धर्म म्हणजेच महाराष्ट्र धर्म. पसायदानाच्या माध्यमातून सर्वांच्या कल्याणाचा विचार त्यांनी मांडला. हा वैश्विक कल्याणाचा विचार हाच आपला खरा महाराष्ट्र आणि यासोबतच आपली मराठी भाषा आणि संस्कृतीही जोडली गेली आहे. हिंदू हा केवळ धर्मवाचक शब्द नाही तर ती एक जीवन पद्धती आहे. महाराष्ट्राने(Maharashtra) ही जीवन पद्धती अनादी काळापासून स्वीकारलेली आहे.

महाराष्ट्र(Maharashtra) म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, वारकरी संप्रदाय परंपरा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, बहिणाबाई चौधरी, वीर सावरकर, या व यांच्यासारख्या अनेक महान व्यक्तींनी विविध क्षेत्रात केलेले काम हाच महाराष्ट्र धर्म होय. हाच धर्म घेऊन जगणारा मराठी माणूस या वैश्विक गुणामुळे जगाच्या पाठीवर सर्वत्र दिसतो. म्हणूनच महाराष्ट्र सर्व जगात दिसतो, असे सांगून  फडणवीस यांनी रशिया, जपान मॉरिशस या देशांमध्ये गेल्यानंतर मराठमोळ्या पद्धतीने झालेल्या त्यांच्या स्वागताची आठवण आवर्जून सांगितली.

मराठी भाषा सनातनी आहे, शाश्वत आहे. अलीकडेच सुरू झालेल्या मराठी भाषा विद्यापीठाशी मराठी भाषा विषयाशी संबंधित काम करणाऱ्या जगभरातील सर्व संस्थांनी जोडले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, मराठी भाषा जगातील एक समृद्ध भाषा आहे. या भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या भाषेकडे पूर्वजांचा हजारो वर्षांचा विचारांचा ठेवा आहे आणि हा ठेवा पुढच्या पिढीला देणे, ही काळाची गरज आहे. इंग्रजी व्यवहार भाषा असली तरी आपण आपल्या मुलांशी मात्र मराठीतच बोलायला हवे. प्रमाण भाषा महत्वाची तर आहेच परंतु याचबरोबर बोली भाषेचा गोडवाही जपायला हवा.
उपमुख्यमंत्री म्हणाले की, ज्ञान आकलन मातृभाषेतून होणे, ही एक महत्त्वाची बाब आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा तर आहेच परंतु तरीही आजच्या काळातील ज्ञानभाषा म्हणून ती परिवर्तित व्हायला हवी. जर्मन, चीन यासारखे देश मातृभाषेचा आग्रह धरीत, त्यांच्या भाषेचा अभिमान बाळगीत त्यांच्या देशातील तज्ञ घडवतात. आपल्याकडेही तसे होणे आवश्यक आहे. जगात सर्वत्र मराठी लोक दिसतात परंतु आपले अधिराज्य नाही. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. याविषयी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आखले असून आता या नव्या शैक्षणिक धोरणानुसार कोणतेही शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले जाईल, हा निर्णय घेण्यात आला आहे.

मॉरिशस(Mauritius) मध्ये मराठी भाषा भवन(Marathi Bhasha Bhavan) निर्माण होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना सर्व स्तरातून पाठबळ मिळणे गरजेचे आहे. भारतातील आणि भारताबाहेर महाराष्ट्राची शान म्हणून जी मराठी मानके आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा जो ठेवा आहे, त्या सर्व मानकांच्या संवर्धनासाठी हे शासन संपूर्ण क्षमतेने उभे राहील. आणि आपण सर्वांनी मिळून हा ठेवा जपण्याचे कर्तव्य करायला हवे. मराठी भाषा वैश्विक होण्यासाठी मराठीचा स्वाभिमान जपला पाहिजे,त्यातून आपला इतिहास जपला पाहिजे,ही त्यामागची भूमिका आहे.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आपल्या राज्यातही लवकरच “मराठी भाषा भवना” ची निर्मिती होणार आहे. यासाठी शासनाने 260 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे. मराठी भाषा भावनाच्या निर्मितीनंतर मराठी भाषा संवर्धनाशी संबंधित असलेली सर्व कार्यालये, मंडळे ही एकाच इमारतीत येणार आहेत. त्यामुळे मराठी भाषा संवर्धनाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता व गती येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी आखलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल आवर्जून उल्लेख करीत  केसरकर म्हणाले की,मातृभाषेतून शिक्षण ही बाब काळाची गरज आहे. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे की, ज्याने इंजिनिअरिंगचे शिक्षणही मातृभाषा मराठीतून शिकविण्याचे धोरण स्वीकारले. प्रत्येक जिल्ह्याला मराठी भाषेचे काम करण्यासाठी निधीची तरतूद करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध उपक्रम/कार्यक्रमांमधून मराठी भाषा संवर्धनाचे काम जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न मराठी भाषा विभागाकडून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेवटी उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी मराठी भाषा विभागाचे काम अतिशय तडफेने आणि उत्तमरित्या करीत असल्याबद्दल मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आणि मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांचे दिलखुलासपणे कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रस्तावना करताना मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव यांनी मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनासाठी होत असलेली विविध कामे,उपक्रम तसेच या विश्व मराठी संमेलनात आयोजित विविध कार्यक्रम व उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे काम करणारे मुख्य समन्वयक डॉ.ज्ञानेश्वर मुळे व विविध देशातील उपसमन्वयकांचा गौरव उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका समिधा गुरू यांनी केले.

Social Media