देवांशी आणि साहीलचा उपग्रह घेणार भरारी

मुंबई : नवी मुंबई येथील डी. ए. व्ही. पब्लिक स्कूलमधील देवांशी विठ्ठल फणसेकर आणि उल्हासनगर येथील सेंट पॉल कनिष्ठ व पदवी महाविद्यालयातील साहील सुधीर वराडकर ‘स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज 2021’ मध्ये सहभागी होऊन इतर विद्यार्थ्यांसोबत 100 उपग्रह तयार करणार असून हे उपग्रह 7 फेब्रुवारी 2021 रोजी आकाशात भरारी घेणार आहेत.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन व स्पेस रिसर्च इंडियातर्फे ‘स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज 2021’चे आयोजन करण्यात आले आहे. कु. देवांशी इयत्ता 5 वी; तर कु. साहील इयत्ता 12 वीत शिकत आहे. देशभरातील विविध विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. 10 विद्यार्थी मिळून एक उपग्रह बनविण्यात येत आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विविध विद्यार्थ्यांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षणदेखील घेण्यात आले आहे. त्यांनी पुणे येथील केंद्रावर 19 जानेवारी 2021 रोजी उपग्रह बनविला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले सगळे उपग्रह 7 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम येथून प्रक्षेपित केले जाणार आहेत.

भारतात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत आहे. जगातील सर्वात कमी वजनाचे हे उपग्रह 35 हजार ते 38 हजार मीटर ऊंचीवर प्रस्तापित केले जातील. हाय अल्टिट्यूड सायंटिफिक बलूनद्वारे ते प्रक्षेपित केले जातील. या उपक्रमाची ‘गिनीज बूक ऑफ वल्ड रेकॉर्ड’, ‘आशिया विक्रम’ आणि ‘इंडिया विक्रमा’त नोंद होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवकाश संशोधनाची आवड निर्माण होण्यास मदत होईल. भविष्यात करिअरच्याही संधी उपलब्ध होऊ शकतील. हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि गौरवाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया देवांशी आणि साहीलच्या पालकांनी व्यक्त केली आहे.

Tag-Devanshi/Sahil

Social Media