देशाचे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड(Dhananjay Chandrachud) साहेब न्यायदेवतेचे डोळे उघडे करुन तिच्या हाती संविधानाची प्रत देवून दहा नोव्हेंबर नंतर निवृत्त होत आहेत. त्यापूर्वीच त्यांनी पंतप्रधानांसोबत घरच्या गणपती बाप्पांची अरती करत जशी भक्ती दाखवून दिली तशीच भक्ती त्यांनी आता प्रभू रामचंद्राच्या प्रती दाखवून दिली आहे. पण नकळत त्यांच्या वक्तव्यातून त्यांनीच या देशाची न्याय व्यवस्था आता राम भरोसेच असल्याचे सांगून टाकले आहे हे ही नसे थोडके!
कारण ज्या मराठी मुलूखातून ते येतात तेथे तर न्यायदानाची रामशास्त्री प्रभुणे यांची उज्वल परंपरा आहे, ज्याने सत्ताधाऱ्यांच्या प्रमादाला देखील नि:स्पृहपणे देहांतांची कठोर शिक्षा सुनावण्याचे धैर्य दाखवले आहे. तेवढे नसेल कदाचित पण चंद्रचूड साहेबांनी मात्र राम मंदिराच्या (Ram Temple)जमिनीचा विवाद प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राना साकडे घालून सोडविल्याचे सांगत अनेक निर्णय त्यांनी असेच रामभरोसे दिल्याचे कबूल केले आहे. त्यांच्या या प्रांजळ कथनाची प्रामाणिकपणाची आणि त्याही पेक्षा राम भक्तीची अनोखी कबुली हेच दाखवून देते की कोई नही किसीका, बस राम ही तेरा! तर अश्या या रामभक्त चंद्रचूड साहेबांच्या वक्तव्याने सारा देश त्यांच्या आजवरच्या न्यायालयीन कारकिर्दीच्या इतिहासाकडे कसे पाहणार आहे? असा जो प्रश्न त्यांना अलिकडेच पडला होता, त्याचे उत्तरही ‘रामभरोसे’ असेच नकळत देण्याचा सूचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा की काय ? असे त्यांचे हे वक्तव्य आहे. नाही का? न्यायदेवता देखील आता हिंदू झाल्याचे तर त्यांना सूचवायचे नसावे ना? असे काही जाणकार आता विचारत आहेत. वास्तविक प्रत्येक न्यायाधिश संविधानाची शपथ घेवून आपल्या समोर मांडल्या जाणाऱ्या प्रकरणात तथ्य, पुरावे आणि वास्तविकता काय आहे ते पाहून कुणालाही झुकते माप न देता न्यायदान करण्याची प्रतिज्ञा करत असतो. येथे तर या शपथेचे उल्लंघन केल्याची सरळपणे कबुलीच दिल्याचे संकेत मिळत आहे.
गमतीचा भाग सोडा पण दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात(Maharashtra) दोन पक्ष फोडण्यात आले, त्यांची चिन्ह, पक्षाची नावे बेकायदेशीरपणे निवडणूक आयोगावर दबावतंत्र वापरून परस्पर बंडखोर गटांना देण्यात आली, भरसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण झाले, तश्याच प्रकारे लोकशाही पक्षांतरबंदी कायदा संविधान यांचे वस्त्रहरण झाले, त्यावर मऱ्हाटी गडी असलेल्या चंद्रचूड साहेबांकडून साऱ्या महाराष्ट्राच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. त्यांची इलेक्ट्रोल बॉण्ड(Electrole bond), किंवा चंदिगढ महापौर पदाच्या निवडणूकीच्या खटल्यातील न्यायमूर्तीची भुमिका मात्र या महाराष्ट्राच्या प्रकरणात दिसलीच नाही. उलट महा आरती प्रकरणानंतर ‘आम्ही बिघडलो तुम्ही बिघडना’ या धर्तीवर त्यांनी हरियाणा विधानसभा निवडणूकीत(Haryana Assembly elections) मतदानयंत्रात उघडपणे हेराफेरी झाल्याबाबत याचिका करणाऱ्या वकिलांनाच दटावले आहे म्हणे त्यांनी या प्रकारच्या याचिका वारंवार करण्याला तीव्र हरकत घेत त्या सुनावणीला न घेण्याचे सुनावले आहे म्हणे! त्यामुळे चंद्रचूड यांच्याकडून रामभरोसे असलेल्या न्यायालयांकडून आता फारसे काही न्यायाची अपेक्षा लोकांनी करू नये हेच योग्य म्हणावे लागेल.
चंद्रचूड जे काही बोलले त्यावर निवृत्त न्यायाधिश मार्केंडेय काटजू यांनी मात्र चंद्रचूड जे म्हणाले ते खोटे ठरवले आहे. त्यांनी चंद्रचूड बोलघेवडे न्यायाधिश असल्याचे सांगत फ्रान्सिस बेकन या विचारवंताचे जास्त बोलणारा न्यायाधिश हा बेसुरा बाजा सारखा असतो या उदगारांची आठवण करून दिली आहे. चंद्रचूड हे भाषणबाजी करत फिरतात यालाही त्यांनी आक्षेप घेतला आणि काटजू यानी राममंदिराच्या न्यायदानाची वास्तविकता सांगितली. त्यांनी सांगितले की आपल्याला सरन्यायाधीश पदाच्या महत्वाकांक्षेपायीच रामलल्ला विराजमान च्या बाजुने निकालपत्र देत सत्ताधाऱ्यांना न्यायव्यवस्थेने खूश केल्याचे म्हटले आहे! आणि आता त्यांना निवृत्तीनंतरच्या त्यांच्या नियुक्तीचे वेध लागले असावेत! आता हे रामच म्हणायला हवे की नाही!
किशोर आपटे
(राजकीय विश्लेषक)
सागर किनारे दिल ये पुकारे, ‘तू जो नहीं तो मेरा कोई नहीं’ ! बंडोबांची फडणवीसांना आर्त हाक!