महाराष्ट्रातील बोलींना प्राधान्य देणारी,८ व्या वर्षीची ”बोलीभाषा एकांकिका स्पर्धा”

३ ते ५ जानेवारीला प्राथमिक फेरी होणार!
मुंबई : मराठी नाट्यवर्तुळातल्या महत्त्वाच्या आणि विशेष एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या सुप्रिया प्रॉडक्शन्स आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा’ जानेवारी २०२५ मध्ये होत असून *३ ते ५ जानेवारी २०२५ रोजी प्राथमिक फेरी तर १४ जानेवारीला नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार(Gopinath Sahukar) यांच्या स्मरणदिनी अंतिम फेरी होणार आहे.* स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे.
प्रसिध्द नाटककार गंगाराम गवाणकर यांची संकल्पना आणि प्रसिध्द नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी घेतलेला पुढाकार यामुळे २०१६ पासून महाराष्ट्रातील ही आगळीवेगळी स्पर्धा सुरु झाली. गेल्या सात वर्षांमध्ये महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या बोलींमधून २८५ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. मराठी रंगभूमीवरील अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राहीलेले आहेत. या स्पर्धेची पारितोषिके मराठी रंगभूमीवर आपल्या अजरामर प्रतिभेने स्वत:चा ठसा उमटवलेल्या ज्येष्ठ-श्रेष्ठ कलावंत, लेखक, तंत्रज्ञांच्या नावाने देण्यात येतात, हे या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरुप असून प्रथम चार सांघिक विजेत्यांसाठी अनुक्रमे २५०००, २००००, १५००० व ५०००अशी पारितोषिके आहेत. प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला ‘नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार असून हे पारितोषिक प्रख्यात अभिनेते अशोक सराफ व त्यांचे बंधू सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केले आहे. अन्य पारितोषिकांमध्ये लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, विनोदी लेखन, विनोदी अभिनय, वाचिक अभिनय, व्यवस्थापन या सर्वच घटकांसाठी पारितोषिके आहेत. तसेच प्राथमिक फेरीमध्ये १० जणांना अभिनय सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येते.
स्पर्धेचे नियम व प्रवेश अर्ज २५ सप्टेंबरपासून www.supriyaproduction.com या वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९९३०४६६९२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संघांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा’’ २०२५ : वैशिष्ट्यपूर्ण पारितोषिके :

 

सांघिक : ●प्रथम : नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्कार;● द्वितीय : सुगंधा रामचंद्र कोंडेकर पुरस्कार; ●तृतीय : नाट्यनिर्माते अनंत काणे पुरस्कार; ●लक्षवेधी : संगीतकार राजू पोतदार पुरस्कार; ●सर्वोत्कृष्ट अभिनेता : ●प्रथम : विनय आपटे पुरस्कार; ●द्वितीय : सतीश तारे पुरस्कार; ●सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : ●प्रथम : आशालता वाबगावकर पुरस्कार; ●द्वितीय : प्रियांका शाह पुरस्कार; ●सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : कुलदीप पवार पुरस्कार; ●सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री : याज्ञसेना देशपांडे पुरस्कार;
●सर्वोत्कृष्ट विनोदी लेखन : रमेश पवार पुरस्कार; ●सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : ●प्रथम : राघू बंगेरा पुरस्कार; ●द्वितीय : उमेश मुळीक पुरस्कार;
●सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : प्रथम व ●द्वितीय : अरुण कानविंदे पुरस्कार; ●सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन : गोविंद चव्हाण पुरस्कार;
●सर्वोत्कृष्ट लेखक : गंगाराम गवाणकर पुरस्कृत – प्रथम  व  द्वितीय;
 ●सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : चेतन दातार पुरस्कार – प्रथम  व  द्वितीय; ●सर्वोत्कृष्ट नेपथ्य :● प्रथम : सखाराम भावे पुरस्कार; ●द्वितीय : रघुवीर तळाशीलकर पुरस्कार; ●सर्वोत्कृष्ट वेशभूषा : ●प्रथम  : सनईवादक सीताराम जिव्या सावर्डेकर पुरस्कार; ●द्वितीय  : रंगनाथ वामन कुलकर्णी पुरस्कार; सर्वोत्कृष्ट रंगभूषा : ●प्रथम : रंगमहर्षी कृष्णा बोरकर पुरस्कार; ●द्वितीय : अभिषेक शरद सावंत पुरस्कार; ●सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय : डॉ. उत्कर्षा बिर्जे पुरस्कार
Social Media