दिवाळीला लावावा जाणिवेचा स्नेहदीप

दिवाळी म्हणजे चैतन्याचा सण. हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. घरात आणि बाहेर तेलाचे दिवे आणि उंचावर आकाश दिवा. अशा या मनोहर, आनंददायी, सुखकर दिवाळीचा आनंद आपण सारे घेत असतो. अशाच वेळी हा आनंद केवळ आपल्या पुरता मर्यादित न ठेवता आपल्या दुर्लक्षित समाज बांधवांसोबत वाटून घेणारे असतातच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अशा सेवा कार्यात अग्रेसर असतात. म्हणूनच ते आगळे वेगळे असतात.

आज धनत्रयोदशीच्या दिवशी दैनंदिन शाखा आटोपून ही मंडळी गावाशेजारी भटके विमुक्त समाज बांधवांच्या तीन वस्त्यांवर जाऊन पोहचली. तिथे “आकाशदिवे” वाटपाचा उपक्रम पार पडला. बरं, आकाशादिवे तरी विकत घेतले का? अजिबात नाही. आमच्या बाल स्वयंसेवकांनी तयार केलेले सुंदर आकाशदिवे या वस्त्यांवर वाटप करण्यात आलेत. “आपणही समाजाचं देणं लागतो”, हा भाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालांच्या शाखेतून त्यांच्यावर बिंबवले जातात.

“दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा”. दिवाळीची मौज काही औरच असते. नवीन कपडे, परीसर स्वच्छता, फटाके, फराळ यांची घरोघरी रेलचेल असते. अशा वेळी समाजातील शेकडो निराधार, भटके, अनाथ यांची दिवाळी उजळण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेण्याचे ठरविले. दिवाळीच्या आनंदापासून आपला हा समाज बांधव वंचित राहू नये, त्यांची ही दिवाळी साजरी व्हावी, हा मुळ उद्देश. गेली सतरा वर्षे भटके-विमुक्त विकास परिषद या नावाने विदर्भातील भटका समाज बांधवांना मानाचे आणि हक्काचे स्थान मिळावं, म्हणून परिषदेचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे.

सामाजिक जाणिवेतून ही दिवाळी साजरी केली जावी, त्याप्रमाणे समाजबांधवांची यंदाची दिवाळी मंगलमय व्हावी, यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. जिल्ह्यात विखुरलेल्या वस्त्यांवर जावून तेथील भटक्या समाज बांधवांसोबत दिवाळी मिलन तसेच भाऊबीज कार्यक्रम घेतले जाणार आहेत. प्रत्येक शाखेने एकेका वस्त्यांची जबाबदारी स्वीकारून त्या अनुषंगाने भेटी घेतल्या आहेत.

वस्तीतील सर्वांना फराळाचे पदार्थ, साडी चोळी, अशा वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. काही ठिकाणी त्यांच्या गरजेनुसार भेटवस्तू जसे ब्लॅंकेट वगैरे दिले जाणार आहे. हे सारे साहित्य आपल्या समाजाला आवाहन करून एकत्रीत करण्यात आले. दात्यांनी सुद्धा अशा या दीपावली मिलनात सहभागी व्हावे असा आग्रह आहे. या दिवाळीच्या दिवसात आपल्या समाज बांधवांच्या वस्त्यांवर, सुद्धा दिवाळीचा दिवा लागावा, त्यांना आनंद मिळावा, या उद्देशाने स्वयंसेवक बंधू कार्य करताहेत. कोरोना काळात संघाच्या स्वयंसेवकानी अतुलनीय कामगिरी बजावली आहे, हे सर्वविदित आहेच.

दिवसाचा प्रत्येक क्षण जगण्याची नवी उमेद देणारा असतो’. त्यातही “एक घास वाटून खाण्याची” आमची संस्कृती. मग दिवाळीचा हा सण आपण सारे मिळून साजरा करू या. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली.

 

-श्रीकांत तिजारे, भंडारा
9423383966

Social Media