महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस प्रदेशाध्यांकडून अभिवादन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व संविधानच देशाला तारु शकेल.

मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर( Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे जाऊन महामानवास अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे,माजी खासदार हुसेन दलवाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर, महाराष्ट्र प्रदेश एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, प्रा. प्रकाश सोनावणे आदी उपस्थित होते.

“शेकडो वर्षे गुलामगिरीत जगणाऱ्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा संघर्ष केला व त्यात त्यांना यश आले. शिक्षणाचे महत्व ओळखून बहुजन समाजाला त्यांनी ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा,’ असा मंत्र दिला, आधुनिक राष्ट्र उभारणीतही बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन माणसाला माणसासारखे जगण्याचे स्वातंत्र्य व हक्क दिले. सामान्य माणसाला मतांचा अधिकार दिला. संविधानामुळे सामान्य माणूसही समाजाचा मुख्य प्रवाहात आला व वेगवेगळ्या क्षेत्रात दबदबाही निर्माण केला. संविधानामुळेच मागास, वंचित, पीडित समाजातील लोकांना ताठ मानेने जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले पण मागील ८ वर्षात डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला धाब्यावर बसवून हुकूमशाही पद्धतीने सरकार काम करत आहे. संविधानाला न मानणारे लोक सत्तेत असून त्यांना संविधान संपुष्टात आणायचे आहे परंतु संविधान वाचवणे आपल्या सर्वांची जबाबदारी असून डॉ. आंबेडकर यांचे विचार व संविधानच देशाला तारु शकेल.” असे नाना पटोले म्हणाले.

प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या दादर टिळक भवन कार्यालयातही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रदेशाध्यक्षांनी अभिवादन केले. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, मा. खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, मुनाफ हकीम, प्रा. प्रकाश सोनावणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Social Media