डॉ. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे(Serum Institute of India) संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला (Dr. Cyrus Poonawala)यांना यावर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाणार आहे. पूनावाला समूहाच्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या कोव्हिशील्ड लशीने भारतासह जगभरातील कोट्यवधी नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवले.

विविध प्रकारच्या लसनिर्मितीमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘सीरम’ने जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या रक्षणार्थ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या तत्त्वासाठी डॉ. पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली पूनावाला समूहाच्या या कंपनीने मोठी झेप घेतली. ते अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी डॉ. सायरस पूनावाला यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय
पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. १३ आगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठात हा सोहळा होईल. दरवर्षी लोकमान्यांच्या पुण्यतिथीदिनी १ ऑगस्ट रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या विशेष समारंभात पुरस्काराचे वितरण होते.

यंदाचा समारंभ १३ ऑगस्ट रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे यंदाचे ३८ वे वर्ष आहे. १९८३पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यापूर्वी एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन, बाबा कल्याणी यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या वर्षी पुरस्कारासाठी सोनम वांगचुक यांची निवड करण्यात आली.

स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही लोकमान्यांची चतुःसूत्री आजही तितकीच महत्त्वाची आहे.असे नमूद करून डॉ. रोहित टिळक म्हणाले की, कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला. लाखो व्यक्तींचे बळी गेले. कोरोनावर लशीची निर्मिती हाच संकटातून वाचण्याचा मार्ग होता. ऑक्सफर्ड – अॅस्ट्राझेन्काच्या सहकार्याने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अत्यंत कमी कालावधीत कोव्हिशील्डच्या कोट्यवधी डोसचे केलेले उत्पादन संपूर्ण मानवजातीसाठी वरदान ठरले आहे. भारताने कोव्हिशील्ड लस अन्य देशांनाही पुरवली. ‘सीरम’च्या कार्यक्षमतेमागे, सक्षम वाटचालीच्या मागे डॉ. सायरस पूनावाला यांचे द्रष्टे नेतृत्व आहे. सर्वांसाठी आरोग्याचे ध्येय ठेवून डॉ. पूनावाला यांनी ‘सीरम’द्वारे प्रारंभापासूनच परवडणाऱ्या दरातील लशींची निर्मिती केली.

यामध्ये त्यांनी गुणवत्तेशी कधीही तडजोड होऊ दिली नाही. यातूनच आज लस निर्मितीच्या क्षेत्रात ‘सीरम’ इन्स्टिट्यूट जगात अग्रस्थानी आहे, त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.


30 व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मारक संगीत महोत्सवाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन –

30 व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मारक संगीत महोत्सवाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन

Social Media