अभिमान वाटावा अशी पद्मश्री : डॉ. धनजंय सगदेव

मुंबई : एकेकाळचा आपला सहकारी स्वयंसेवक मित्र पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्हावा यासारखी आनंदाची गोष्ट नाही. १९७० च्या दशकातील गांधीनगर सायम् शाखेचा नियमित स्वयंसेवक व पुढे यशवंत नगरला शाखा नव्याने सुरु करून मुख्यशिक्षकाचे दायित्व स्वीकारलेला आपला सहकारी मित्र.. धनंजय उर्फ अजय यास त्याच्या सेवाभावी वृत्तीचे व सातत्यपूर्ण परिश्रमाचे फलित म्हणून यावर्षीचा “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वाभाविकपणेच तत्कालीन व आजच्याही स्वयंसेवकांना अभिमान वाटावा असा हा मौलिक क्षण आहे.

नागपूरहून MBBS उत्तीर्ण झाल्यानंतर १९८० मध्ये प. पू. बाळासाहेब देवरस ह्यांच्या प्रेरणेतून अजय संघाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता अर्थात् प्रचारक म्हणून बाहेर पडला. केरळ प्रांतामधील वायनाड जिल्यातील अतिदुर्गम परिसरातील मुट्टील (Muttil) या स्थानी अजयची वैद्यकीय सेवेसाठी नेमणूक झाली. एकदम नवीन प्रांत.. भाषा, खानपान इत्यादी अशा सर्वच दैनिक बाबी पूर्णतः भिन्न असूनही अजय तेथील वातावरणाशी समरस झाला. भाषा उत्तमप्रकारे अवगत केली. लगेच त्याने “स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन” अंतर्गत आपल्या वनवासी बंधूंकरिता धर्मार्थ दवाखाना सुरु केला. आज तेथे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे ३५ बेड्चे रुग्णालय उभे आहे. पर्वतीय परिघातील अगम्य ६ उपकेंद्रात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. वनवासी क्षेत्रात अनेक सेवाभावी कार्यकर्ते उभे करून त्यांना प्रशिक्षित केले. आज १२५ “स्वास्थमित्र” संपूर्ण परिसरात “सिकल सेल” या गंभीर आजारावर उपचार करीत आहेत. दर आठवड्यातील ३-४ दिवस आरोग्य शिबिरांचे आयोजन अतिदुर्गम भागात करून आरोग्य रक्षणाबाबत जागरूकता निर्माण करतात.

आदिवासी मुलांकरिता १०० एकल विद्यालयाचे संचालन करून विद्यार्थ्यांना निःशुल्क भोजन, शिक्षण साहित्य व यातायातची सुविधा देखील प्राप्त करून देतात. या सर्व कामात त्यांची सुविद्य पत्नी पूर्णवेळ असते. इतकेच नव्हे तर, नुकतेच MBBS उत्तीर्ण झालेल्या मुलीनेही स्वतःला या सेवाकार्यात झोकून दिले आहे.

डॉ. धनजंय सगदेव उर्फ अजयचे हार्दिक अभिनंदन.. तसेच उज्ज्वल भविष्याच्या अनंत शुभेच्छा..!

Social Media