माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना प्रदेश काँग्रेस कार्यालयात श्रद्धांजली.
मुंबई : “पंतप्रधान म्हणून मी कमजोर होतो की कणखर हे इतिहास ठरवेल” असे डॉ. मनमोहनस सिंग(Dr. Manmohan Singh) म्हणाले होते. आज मनमोहन सिंग यांना सर्व जग श्रद्धांजली देत असताना त्याची प्रचिती येत आहे. गरिबीतून सुरुवात करुन बुद्धीमत्तेच्या जोरावर पंतप्रधान होऊन देशाला आर्थिक दिशा व आर्थिक शिस्त लावण्याचे काम डॉ. मनमोहन सिंग यांनी केले ते देश व जग विसरु शकत नाही. असे महान व्यक्तिमत्व आपल्यात नाही याचे दुःख असून देशासाठी त्यांनी केलेले समर्पण देश कधीही विसरणार नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने केवळ काँग्रेस पक्षाचे नाहीतर देशाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय, टिळक भवन येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी आमदार सुभाष चव्हाण, सरचिटणीस राजेश शर्मा, मुनाफ हकीम, प्रदेश प्रवक्ते भरतसिंह, निजामुद्दीन राईन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुष्पहार घालून आदरांजली अर्पण केली.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग हे शेवटच्या माणसापर्यंत विकास कसा पोहचेल याचा विचार करत, आपल्या १० वर्षांच्या काळात त्यांनी देशाला मनरेगा, शिक्षण हक्क, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार कायदा देऊन सर्वसामान्यांचे हितच पाहिले. जगात कच्च्या तेलाचे भाव प्रचंड वाढले असताना त्याची झळ सामान्यांना बसणार नाही यासाठी योग्य नियोजन केले. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर सातत्याने टीका केली गेली पण त्या टीकेची पर्व न करता त्यांनी भारताच्या विकासावर भर दिला. डॉ. महमोहन सिंग यांना कशाचाही गर्व नव्हता, पंतप्रधान असतानाही ते सामान्य व्यक्ती म्हणूनच जगले. सामान्यातून कसे मोठे होता येते हे डॉ. मनमोहन सिंग नवीन पिढीसाठी उत्तम उदाहरण आहेत. डॉ. सिंग हे देशाच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याची क्षमता असलेले नेतृत्व होते. सोनियाजी गांधी यांनी या महान नेत्याची पंतप्रधानपदी निवड करुन देशहितासाठी कोणत्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे हे दाखवून दिले. देशासाठी सर्वकाही ही गांधी कुटुंबाची भुमिका राहिली आहे आणि तीच डॉ. मनमोहनसिंग यांच्या रुपाने देशाने पाहिली.
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व जगाने पाहिले, जगातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख त्यांच्याकडे आदराने पहात, त्यांचा सन्मान करत अशा महान व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सत्ताधारी पक्षाने राजघाटावर जागा दिली नाही. ज्या व्यक्तीने कधीच भेदभाव केला नाही त्यांच्याबाबतीत सत्ताधारी पक्षाने केलेला भेदभाव चुकीचा असून राजघाटावर जागा न देऊन भाजपाने गलिच्छ राजकारण केले आहे, असे पटोले म्हणाले.