संधीसाधु राज्यकर्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वात तरी स्वा. सावरकरांच्या विचारांची, बलिदानाची उपेक्षा थांबवतील का?

किशोर  आपटे

 

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांचे असामान्य योगदान राहिले आहे अश्या महान स्वातंत्र्यविरांमध्ये स्वा विनायक दामोदर सावरकर यांचे नांव अग्रणी राहिले आहे. आणि तरी देखील या देशाच्या इतिहासात ज्यांच्या देशभक्तीबद्दल, त्यांच्या त्याग आणि बलिदानाबद्दल आजही उपेक्षा केली जाते. त्यांचे विचार, त्यांचे समर्पण  आणि त्यांच्या देशासाठीच्या जाज्वल्य विचारांचा अंगार राजकीय सोयीच्या अंगाने काही लोक स्विकारताना दिसतात. तर काही लोक चक्क त्यांचा धिक्कार करताना त्यांच्यावर लांछनास्पद टिका टिपण्याही करताना दिसतात. या देशात स्वातंत्र्य आणि लोकशाही आहे. असेही या मागचे समर्थन केले जाते. तर स्वा सावरकरांचे हिंदुत्व, त्यांचे हिंदु समाजाबद्दलचे विचार आणि प्रखर वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा त्यांचे हिंदु समाजाच्या सामाजिक सुधारणांचे कार्य याबद्दल बोलताना आजही ब-याच लोकांना अडखळायला का होते हे समजण्यापलिकडचे आहे.

भारतरत्न पुरस्कार का नाही?

स्वा. सावरकर यांच्या माफीनाम्या बद्दल किंवा त्यांच्या गांधी हत्या प्रकरणातील कथित सहभागाबद्दलही न्यायालयातील निवाडे झाल्यानंतरही दुष्प्रचार केला जातो. त्यांचे मार्सिलिसच्या खाडीतील उडी मागचे मातृभुमी प्रेम देखील संशयाने ग्रासले जाते. ज्या देशासाठी ज्या देशातील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी त्यानी उभे आयुष्य खर्ची घातले त्या देशात आजही स्वा. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची हिंमत स्वत:ला ज्वलंत हिंदूत्वाचे पहारेकरी म्हणवणा-या पक्षाच्या नेत्यांना होत नाही, यापेक्षा एखाद्या क्रांतीकारकांची आणखी उपेक्षा ती काय म्हणावी?

ख-या अर्थाने अस्पर्श क्रांतीसूर्य

गेली अनेक वर्ष असे सांगण्यात येत होते की पटेल, गांधी नेहरू,  आंबेडकर, जिना या देशातील त्या काळातील आघाडीचे नेते असलेल्या बँरिस्टरांमध्ये गांधी आणि नेहरू यांचे राजकीय वर्चस्व होते. त्यात पटेल आणि आंबेडकर अनेक मतभेद असुनही देशाच्या जडण घडणीच्या कामात गांधी आणि नेहरू नंतर सहभागी झाले आणि त्यामुळे आपण एकसंध सुशाषित भारताचा नकाशा पाहू शकतो आहोत. या देशात संविधानाच्या माध्यमातून देशाचे शासन आणि प्रशासन चालविताना दिसत आहोत. मात्र स्वा सावरकर मात्र या सर्व नेत्यांमध्ये उपेक्षित राहिले कारण ते ख-या अर्थाने अस्पर्श क्रांतीसूर्य होते. त्यांचे विचार स्पष्ट आणि बुध्दीप्रामाण्यवादी असल्याने सहजपणे स्विकारार्ह नव्हते. जसे ते आज स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे देखील काही भाग वगळून सोईस्कर तेवढेच स्विकारताना दिसतात.

उपेक्षा मोदी शहाचे सरकार संपविणार का?

त्यामुळे या देशाच्या क्रांतीच्या इतिहासात स्वा सावरकरांचा नेहमी परहेज असल्याचे सांगण्यात येते. येथे राज्यकर्ते कोणीहि असले तरी स्वा सावरकर जसेच्या तसे त्यांच्या पचनी पडत नाहीत. देशाला लढवय्या आणि विज्ञाननिष्ठ शिस्तीचा देश बनविण्याचा त्यांचा संकल्प मात्र आजही अपूर्ण राहिला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रमाणेच स्वा सावरकरांसारख्या महान द्रष्ट्या नेत्याच्या ज्ञान विचार आणि देशसेवेचा उपयोग स्वतंत्र भारतात आपण करुन घेवू शकलो नाही ही खंत मनात बाळगुन त्या तेजस्वी क्रांतीसूर्याला त्यांच्या विचारांना नतमस्तक होवून आदरांजली वाहुया. वीर सावरकर अमर है, वीर सावरकर अमर रहे. असे म्हणून त्यांच्या पवित्र स्मृतीना अभिवादन करूया. स्वातंत्र्यसंग्रामाच्या अमृत महोत्सवी पर्वात तरी या महान क्रांती कारकाची उपेक्षा मोदी शहा यांचे सरकार संपविणार का? हा प्रश्न मात्र यावेळी विचारला नाही तर तो कृतघ्नपणा ठरेल.
पूर्ण

Social Media