मुंबई : येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबविला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
येत्या स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे “ई-पीक पाहणी” प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण इलेक्ट्रॉनिक कळ दाबून करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ऑनलाईन पध्दतीने कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, मुख्य सचिव सीतराम कुंटे, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जमाबंदी आयुक्त व संचालक निरंजन सुधांशू, टाटा ट्रस्टचे मुख्य सल्लागार जयंतकुमार बांठिया, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ नरसिंहन, ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप, यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, काही वर्षांपूर्वी शेतकऱ्याला स्वत:चा सातबारा पहायला मिळण्यासाठी खूप कष्ट करावे लागत असे, पण आज शेतकऱ्यांना आपला सातबारा मोबाईलमध्ये पाहणे शक्य झाले आहे.काळाप्रमाणे बदलणे हा प्रकृतीचा नियम आहे असे आपण म्हणतो मग बदलत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण नवनवीन प्रयोग करुन शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याबरोबरच त्यांना सोप्या आणि सुलभ पध्दतीने आवश्यक असणारी कागदपत्रे मिळवून देणे, पीकांची माहिती मिळवून देणे यावर भर देत आहोत याचा आनंद वाटतो.कोणताही नवीन प्रयोग करताना यश तेव्हाच मिळते जेव्हा आपण सर्वजण सांघिक प्रयत्न करतो. आपण सर्वांनी सांघिक प्रयत्न केल्यानेच आता आपल्या शेतकरी बांधवांचे कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे.
हमीभाव नाही तर हमखास भाव मिळेल यावर भर
The emphasis is on getting a price if not a guarantee.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आज दररोज हवामानात बदल होतो आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी येतात कारण त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे.ई पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्याचे आयुष्य अधिक सोपे आणि सहज करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचा आनंद आहे. विकेल ते पिकेल ही संकल्पना राज्यभरात राबवित असताना आपापल्या जिल्हयाचे वैशिष्टय ओळखून एक जिल्हा एक पीक असा ब्रँड तयार करणे आवश्यक आहे तरच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळेल. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाजी पाला अधिक दिवस कसा टिकवता येईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी शेतीमध्ये काळाच्या पुढे जाणारे प्रयत्न केले तसेच आताही शेतकऱ्यांना नवीन गोष्टी आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यांचे जीवन सोपे आणि सुलभ करण्यावर भर देणे आवश्यक आहे.
ई पीक पाहणी प्रकल्प प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा- बाळासाहेब थोरात
E-Crop Inspection Project Connected to Every Family – Balasaheb Thorat
महसूलमंत्री थोरात म्हणाले की, महाराष्ट्रात राबविण्यात येणारा हा पथदर्शी प्रकल्प असून आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. ई पीक पाहणी प्रकल्प हा प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा प्रकल्प आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे स्वरुप जरी मर्यादित स्वरुपातले तरी याचा होणारा परिणाम हा व्यापक स्वरुपातील आहे.टाटा ट्रस्ट मार्फत सुरुवातीला हा प्रकल्प अवघ्या दोन जिल्हयात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरु करण्यात आला होता मात्र आता हा प्रकल्प राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असून यापुढील काळातही हा विभाग लोकाभिमुख करताना सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहील. आज लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पाची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणार आहे. तसेच पुढील 15 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पीकाची नोंद ॲपवर कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.ऑनलाईन सातबारामध्ये सुलभता आणण्याबरोरबच आता 8 अ सुध्दा ऑनलाईन करण्यात आला आहे.
कृषी मंत्री भुसे म्हणाले की, ई- पीक पाहणी प्रकल्प महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात राबविण्यात येणार असून विकेल ते पिकेल या अभियानाद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प असणार आहे. शेतकऱ्याला स्वत: पिकांची नोंद करता येणार असून शेतीसाठी पीक कर्ज आणि पीक विमा सुलभरित्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
महसूल राज्यमंत्री सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतातील पिकांची सात बारामध्ये स्वत: नोंद करता येणार असल्याने पीक पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीचा अंदाज करता येणार आहे. ई पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजणारआहे.
“ई-पीक पाहणी” प्रकल्पाचा राज्यव्यापी प्रत्यक्ष वापराचा शुभारंभ कार्यक्रम फेसबुक, यूटयूब आणि ट्विटर या समाजमाध्यमांवर लाईव्ह प्रसारीत करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान या प्रकल्पासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.
महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानले.