ठाण्याच्या या धर्मवीर-२ मुळे मोदी आणि शहांच्या गोंधळलेल्या इमेजला दिसला आशेचा नवा तारा?

एक अनोखे विश्लेषण. . . .

महाराष्ट्रात २०२४च्या लोकसभा निवडणूकीचे(Lok Sabha elections) निकाल हाती आल्यानंतर प्रस्थापित शिंदे-फडणवीस-पवार यांच्या सरकारमध्ये अस्वस्थता वाढली. याचे कारण लोकसभेत सर्वाधिक जागा लढवून सर्वाधिक जागा गमावणारा एक नंबरचा पक्ष म्हणून भाजपा आणि त्यानंतर सर्वात कमी जागा घेवून सर्वात जास्त जागा हरणारापक्ष अजित पवार(Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला फारसे यश लाभले नाही. त्या तुलनेत चतुराईने शेवटच्या क्षणापर्यंत एक एक जागा पदरात पाडून घेत कोकणात पालघरपासून ठाणे, कल्याण, रायगड, मावळ, मुंबई, सिंधुदूर्गापर्यत आणि मराठवाड्यातही ठाकरेंच्या सेनेला चितपट करत एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी सात जागा पदरात पाडून घेत भाजपच्या नऊ जागांच्या स्थानाची बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला होता.

mann-ki-baat

 

त्यानंतर भाजपच्या भविष्यासाठी विधानसभा निवडणूक लढवताना लोकसभेच्या वातावरणाला कलाटणी देणे आवश्यक आहे, हे दिल्लीत बसलेल्या मोदी शहा यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र त्यात पहिल्यापासून तयारीत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मग दिल्लीश्वरांच्या कलाने आणि अनुमतीने ‘आनंद दिघे’ ‘धर्मवीर-२’ च्या धर्तीवर आपली ‘रॉबिनहूड पॉलिटिक्सची ट्रिक’ यशस्वीपणे पटवून दिली आणि राबविली. इतकी की जनतेला देण्यात येणा-या सवलती योजनांना रेवडी म्हणणा-या नरेंद्र मोदींकडूनही आता शिंदे यांच्या ‘लाडक्या बहिणीपासून वयोश्री पर्यंत आणि मुलींना मोफत शिक्षण पासून बेरोजगाराना व्यावसाईक शिक्षणासह स्टायपेंड या योजनांचा प्रचार केला जात आहे.

त्यानंतर या योजनांचे श्रेय घेण्यासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून जाणिवपूर्वक प्रयत्न केले जात असून अजित पवार तर चक्क गुलाबी गाडी गुलाबी स्टेज गुलाबी जॅकेट आणि रांगड्या बोलण्यात विनोदी थाट दाखवत जनसन्मान यात्रा करत राज्यभर बहिणींना भेटण्यासाठी फिरु लागले. तर देवाभाऊ अशी होर्डिंग्स लावत फडणवीसांकडूनही मध्य प्रदेशच्या लाडली बहना योजना भाजपकडूनच महाराष्ट्रात आल्याचे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Monkey-baat

त्यानंतर पूर्वी ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रम करणारे हे त्रिकूट वाद आणि मतभेद नको म्हणून एकत्र ‘लाडक्या बहिणींचा सन्मान’ करण्यासाटी रक्षाबंधनापूर्वी पासून दिवाळी आली तरी कॅटवॉक करत राख्या बांधून घेत राज्यभर फिरत आहेत. मागच्या चार महिन्यांपासून लाखो बहिणींच्या (आणि गुपचूप काही भावांच्या) खात्यांवर योजनेची ओवाळणी जमा झाली आहे. त्यातून अनेक बहिणींनी छोटे रोजगार बचतगटांचे कार्यक्रम सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. तर अगदी ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंपासून दिग्गजांना योजनेच्या प्रचारात आणून १५०० रूपये तेंव्हा असते तर. . किंवा मुख्यमंत्र्याकडूनच  ‘माझ्या आईने पै पै करुन कसे आम्हाला मोठे केले’ अश्या भावनिक शब्दांची पेरणी करून बहिणींना सदगदीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकूण काय तर फ्रि बी योजनांच्या भरवश्यावर राज्यातील सहाकोटीपैकी २ ते ३ कोटी मतदारांचे मन बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे.

त्यात मालवणच्या पुतळा दुर्घटना, बदलापूरच्या बालिका अत्याचार आणि नंतर एनकाउंटर प्रकरणामुळे मूख्यमंत्र्याच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांच्या मुलाच्या हिट अँण्ड रन नंतर बावनकुळेंच्या मुलाच्या हिट अँण्ड रनपर्यंत संकटांनी सरकारची बदनामी, अडचण झाली.

मात्र त्यातूनही पुढे जात आता जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणांच्या(Maratha reservation) धोबीपछाड डावाला मात देत सामाजिक ध्रुवीकरणासाठी भाजपच्या जुन्या माधव पॅटर्नला मजबूत करणारे निर्णय धडाकेबाज पध्दतीने मागील दोन आठवड्यात घेण्यात आले. त्यात ब्राम्हण समाजापासून, अठरापगड बारा बलुतेदार जातींच्या अस्मितांना फुंकर घालत १९ समाजांची आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा धडाका सुरू आहे. त्यात अगदी पत्रकारांना आणि वृत्तपत्र विक्रेत्यांनाही वेगळे महामंडळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे कसे ‘जो जे वांछील तो ते लाभो!’

Maratha-Reservation

एकीकडे ३५ टक्के मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील(Jarange Patil) अनेक महिने रस्त्यावर आहे, त्यांच्यासाठी देखील प्रमाणपत्रे देण्यासाठी कायदेशीर सर्कस करायची, त्यानंतर विरोध करणाऱ्या ओबीसींची(OBC) फोड करत त्यांच्या नव्या जातींना आरक्षणाच्या यादीत घ्यायचे, सवलतीसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवून द्यायची, आर्थिक विकास महामंडळे द्यायची. शिवाय धनगरांना देखील आरक्षण देण्यासाठी शासन निर्णयांची घोषणा करायची त्यानंतर विरोध करणा-या आदिवासींना मानधन तत्वावर पेसाच्या मुद्दंयावर तात्पुरत्या नेमणुका देण्यास मान्यता द्यायची अशी सर्वेसंतू निरायम: भुमिका मुख्यमंत्र्यांकडून घेतली जात आहे.

इतकेच नाही आता दहिहंडी, गणपती, नवरात्री, दसरा, दिवाळीमध्ये गोरगरीबांना भेटवस्तू, देणग्या, घरापासून नोकरी,  शिक्षणासाठी कर्ज- उसनवारीचे पैसे, आजारपणासाठी मदत, अश्या ‘रॉबिनहूड पध्दतीने लूटीच्या वातावरणाने’ भारून टाकले आहे. मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघापासून त्यांच्या समर्थकांच्या मतदारसंघापर्यंत आणि शासकीय विभाग महामंडळापासून अगदी शिवसेना शाखा स्तरापर्यंत हा माहौल तयार केला जात आहे.

लोकांच्या मनात असलेल्या नकारात्मक भावना, विचार आणि समस्तांना काही काळासाठी का होईना विसरायला लावण्यासाठी शासकीय तिजोरीपासून अगदी व्यक्तिगत पातळीवर हात सैल सोडल्याने लोकांच्या मनातील राग चिंता काही काळ बाजुला जात आहेत. असे चित्र आहे प्रत्यक्ष मतदानापर्यत हे माहौल अगदी टिपेला जाणार असून त्यात हात धुवून घेणारे महाभागही आहेत. मात्र जे होईल ते नंतर पाहू आधी निवडणुका जिंकू हा मंत्र या रॉबिनहूड राजकीय तंत्रामागे आहे.

Modi-Eknath-Shinde

मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?’ असे प्रश्न विचारणारे देखील ‘आता शिंदेच व्हायला हवेत’ कारण त्यांच्यात दानत आहे असे उघडपणे सांगू लागले आहेत! यातच इथे काय वर्णन केले त्याचे सार आहे. मंत्रालयात, महाराष्ट्रात, ठाण्यात शिंदेच्या या ‘देना बँक’ पध्दतीच्या वर्तनावर समाजाचा बराच मोठा वर्ग मनातून किंवा उघडपणे खूश आहे हे नक्की! त्यात अधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार यांचा क्रमांक अव्वल आहे हे वेगळे सांगायला नको मात्र ठाण्याच्या या धर्मवीर-२ मुळे मोदी आणि शहा यांच्या लोकसभा निवडणुकीनंतर गोंधळात सापडलेल्या इमेजला देखील आशेचा तारा दिसला असेल तर नवल ते कुठले! दिघे साहेब धर्मवीर तर एकनाथ शिंदे कर्मवीर ठरतील आणि हरियाणापेक्षा वेगळ्यापध्दतीने महाराष्ट्रात पुन्हा महायुतीला बहुमताचा आकडा गाठणे शक्य होण्याची शक्यता असल्याचे सर्वेक्षण त्यामुळे सुरू झाले आहे! आहे की नाही गंमत!

 

लेखक व ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

किशोर आपटे

९८६९३९७२५५

मंकी बात…

मंकी बात…

मंकी बात…

Social Media