बाळासाहेब ठाकरेंच्या(Bal Thackeray) शिवसेनेतून एक पिल्लू पळवून नेणे सोपे होते मात्र आता तेच पिल्लू दोन वर्षांनी आपल्यावर गुरगुरायला लागले आहे. केला तुका अन झाला माका अशी कोकणात म्हण आहे, भाजपने जे राजकारण मागच्या दोन वर्षात केले त्याचे सध्याचे रूप या म्हणीनुसार झाले आहे!
लोकसभा २०२४(Lok Sabha 2024)मध्ये महाराष्ट्रात भाजपची सापशिडी २३वरून आठवर येवून थांबली आहे, सर्वाधिक २२ जागा हट्टाने लढवल्यानंतर भाजपची ही घसरगुंडी झाली आहे. तर महायुतीचा दुसरा घटकपक्ष राष्ट्रवादी अजित यांचा पक्ष चार जागा लढून जेमतेम एक राखू शकला आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मात्र गुजरातच्या वाघाच्या जबड्यात घालून हात आठ जागांवरून एक एक करत स्वत:कडे १५ जागा मिळवल्या आणि त्यातून सात जागा जिंकून आज ते केंद्रातील एनडीए(NDA) सरकारच्या महत्वाच्या घटकपक्षात सातव्या क्रमांकाचे महत्वाचे मित्र झाले आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणूकीत थकलेल्या गुजराती वाघाला त्यांनी जास्तीच्या जागांची मागणी केल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र त्याला स्वत: थेट उत्तर न देता शिंदे यांचे ‘काय झाडी काय डोंगर’ वाले आमदार शहाजीबापू यांनी ‘इशारो इशारो’मे उत्तर दिले आहे. भाजपला सत्ता आमच्या त्यागामुळे मिळाली आम्ही सत्तेवर असूनही गुवाहाटीला जायला तयार झालो त्यामुळे भाजप सत्तेत आली असा सोलापूरी डायलॉग बापूंनी हाणला आहे. थोडक्यात काय? तर या अजित पवारचे करायचे काय? असे म्हणता म्हणता आता दिल्लीश्वरांना कळून चुकले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून एक पिल्लू पळवून नेणे सोपे होते मात्र आता तेच पिल्लू दोन वर्षांनी आपल्यावर गुरगुरायला लागले आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर भाजपला कमी जागा लोकसभेप्रमाणे मिळाल्या तर मुख्यमंत्रीपद तर गेलेच शिवाय संख्याबळ कमी झाले तर विरोधीपक्षनेतेपद देखील हातून जाणार आहे. त्यामुळे भाजपचा प्रयत्न आहे की शिंदे आणि पवार यांच्यापेक्षा दुप्पट जागा आपल्यापक्षाने लढल्यातरच काही निभाव लागण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी समोर भाजपची स्पर्धा तर आहेच मात्र त्यापेक्षा जास्त सत्तालोलूप गुजरात लॉबीला चिंता आहे ती सोबत घेतलेल्या दोन कुबड्यां कायमच्या कश्या दूर करून स्वत:च्या पायावर चालता येईल याची. पण शिंदे यांना बाजुला करणे भाजपला आता तितके सोपेही नाही याची दुसरीकडे जाणीव आहे. कारण केंद्रातील नितीश नायडू(Nitish Naidu) यांनी पांठिंबा दिल्यानंतर चिराग पासवान(Chirag Paswan) आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे दोन त्याखालोखाल मोठी खासदार संख्या असणारे पक्ष आहेत ज्यांच्या पांठिब्यावर केंद्रात सत्ता टिकणार आहे. त्यामुळे किमान १२५ जागा देण्याचा शिंदे यांचा हट्ट आहे आणि अमित शहा(Amit Shah) यांना तो ‘नाही नाही’ म्हणत पूरा करावा लागणार आहे. त्यामुळे ३७ आमदार घेवून शिवसेनेतून फरार होणा-या एकेकाळच्या शिंदे यांचा वरचष्मा मात्र आता वाढण्याची शक्यता आहे. कारण महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा दुसऱ्यांदा दावेदार होण्यासाठी जास्त जागांवर विजय हा निकष पुन्हा शिंदे यांच्या पक्षाने पूर्ण केला तर त्यांना मुख्यमंत्री करावेच लागणार आहे.
मात्र अपेक्षीत संख्याबळ मिळाले नाही तर आणि भाजप महायुती विरोधीबाकांवर गेली तर जास्त जागा शिंदेच्या असतील तरी विरोधीपक्षनेतेपद शिंदेना द्यावेच लागणार आहे. म्हणजे भाजपने हौस म्हणून गळ्यात सरी तर दोन वर्षापूर्वी घालून मिरवली पण आता तीची दोरी होवून राजकीय फास लागण्याची नामुष्की येण्याची शक्यता आहे. हे न ओळखण्या इतके ‘गुजराती चाणक्य’ दुधखूळे नाहीत. त्यामुळे त्यांनी मग ‘तमे तो गांडा छे’ च्या गुजराती शैलीने गोडीगुलाबीच्या पध्दतीने शिंदे यांना १२० नाही पण ७०-८० पर्यंत जागा देण्याची तयारी दाखवली आहे.
शिंदे यांना जितक्या जागा महायुती देते त्याच्या किमान दहा पंधरा जास्त जागा उध्दव ठाकरेंना महाविकास आघाडीत द्याव्याच लागणार आहेत. कारण हे जुळ्यांचे दुखणे आहे. एका शिवसेनेला संपविण्याच्या नादात राज्यात आता दोन शिवसेना तयार झाल्या आहेत आणि येत्या काळात राजकारणात या दोन्ही शिवसेना त्यांच्या त्यांच्या गटामध्ये वरचढ होण्याच्या स्पर्धेत खटकण्याची शक्यता आहे. ही गोष्ट महाराष्ट्राच्या जाणत्या राजाने सर्वात आधी हेरली आहे, आणि म्हणोन. . (मुख्यमंत्र्याचे बरे का?) पवार यांनी मुख्यमंत्र्याना वारंवार भेटून आपल्या भविष्यातील राजकारणाची साखरपेरणी आधीच करून ठेवली आहे. कसे तर काकांच्या राजकारणात पुतण्याने खो घातल्यानंतर ताकही फूंकून पिणाऱ्या काकांनी आता ‘सावध ऐका पुढल्या हाका’ म्हणत पुढल्या राजकीय खेळींचा अभ्यास आताच केला आहे. म्हणूनच तर ते उध्दवला दाखवून देण्यासाठी निवडणूक होण्या आधीपासून शिंदेची सलगी करताना दिसत आहेत. नाहीतर काकांनी कुठलेही काम फोन करून सांगितले तरी शिंदे करू शकतात, मग त्या दोघांना वारंवार भेटून अश्या कुठल्या गुफ्तगू करायच्या असाव्यात? हे ‘अडाण्या’ला देखील समजण्यासारखे नाही का?महाविकास आघाडीमध्ये सत्तास्थापनेला जर काही जागा कमी पडल्या तर काकांना अजित पवारांची गरज लागू नये असाही दुसरा हेतू आहे, शिंदे यांच्याकडे महायुतीमध्ये तीनही पक्षांच्या तुलनेत बऱ्यापैकी जागा येतील तर त्यांचा उपयोग करून येन केन प्रकारेण सत्ता मिळवायचीच असाही होरा ठेवून काकांनी आताच दोर टाकून ठेवले असावेत, असेही जाणकार सांगतात.
आता उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) सारखे चेहरा जाहीर करा का सांगत आहेत ते समजते का ते पहा?! उद्या जर महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये त्रिशंकू स्थिती (केंद्रात झाली तशी) आलीच तर शरद पवारांना महायुतीमधून भाजप आणि अजित पवार यांच्यापेक्षा जवळचे शिंदेच ठरणार आहेत. त्यावेळी ठाकरेंचे महत्व कमी होणार आहे. शिंदेचा गट महाविकास आघाडी सोबत आला तर ते अटीतटीच्या शर्ती घेवून येतील त्यात मुख्यमंत्रीपद हा कळीचा मुद्दा असेल किंवा शिवसेना ठाकरे यांच्या मनातील जागा पदे नेमके शिंदेही मागू शकतात त्यामुळे ठाकरेंना आतापासूनच मुख्यमंत्री कोण होणार? याची चिंता लागून राहिली आहे.
ठाकरेंच्या निवडणुकीत किमान ३५-४० जागा जिंकतील असे सर्वेक्षणे सांगत आहेत. पण शिंदे यांनी देखील ७०-८० जागा मिळवून निम्या जागा जिंकून सत्तेवर असल्याचा फायदा करून घेत त्या जवळपासची मजल मारतील, तर ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन्ही शिवसेनांची राजकीय मुल्य सारखीच होण्याची शक्यता आहे. अश्या वेळी भाजपचे पुरेसे संख्याबळ नसेल तर शिंदे अन्यत्र कुठून मुख्यमंत्रीपद टिकवता येते का? ते अजमावतीलच अश्यावेळी ज्या दोन्ही कॉंग्रेसला जसे २०१९मध्ये ठाकरे मान्य झाले तसेच त्यांना शिंदेची राजकीय साथ सत्तेसाठी घेण्यास काहीच प्रत्यवाय राहणार नाही, त्यामुळे ठाकरेंनाही चिंता आहे ती शिंदे यांचीच! कारण भाजप आता पुन्हा शिंदेना मुख्यमंत्री करण्याची शक्यता नाही, तर शिंदे हाच गेम कमजोर झालेल्या भाजपवर करतील आणि महाआघाडीतून ठाकरेंसारखे मुख्यमंत्रीपद पटकावू शकतील.
या शक्यता राजकारणाला ३६०च्या कोनात फिरवणाऱ्या आहेत, त्यामुळे कदाचित आजारपणामुळे ठाकरे रूग्णालयात गेले तरी त्यांच्या चिंता मात्र कमी होताना दिसत नाहीत. शिंदे यांच्या मुळावर घाव घातला तरच आपला निभाव लागेल हे कळून चुकल्याने आता सावंतवाडीमध्ये त्यांनी थेट जुना सैनिक आणि सध्याचा भाजपचा जिल्हाध्यक्षच आपल्यासोबत घेतला राजन तेली आता दिपक केसरकरांसमोर आव्हान देणार असल्याने कोकणात वातावरण तापायला सुरूवात होणार आहे. मात्र एकनाथ शिंदे, शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे तीन नेते येत्या काळात भाजप कॉंग्रेस आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवतील का ते पाहता येईल! सध्या मात्र या शिंदेचे करायचे काय? हाच परवलीचा प्रश्न आहे आणि गंमत म्हणजे तो ठाकरेंना(दोन्ही) पडला आहे त्यापेक्षा जास्त प्रकर्षाने काकांना आणि त्याहून तिव्रतेने भाजपच्या गुजराती चाणक्यांना पडला आहे. याचे उत्तर मात्र सामान्य मतदार काय करिश्मा करणार यावर अवलंबून आहे हेच लोकशाहीचे मर्म आहे! तूर्तास इतुकेच.
किशोर आपटे
लेखक व राजकीय विस्लेषक
जाती जमातींच्या आर्थिक विकासाची महामंडळे की निवडणुकांचे जुमले!?
ठाण्याच्या या धर्मवीर-२ मुळे मोदी आणि शहांच्या गोंधळलेल्या इमेजला दिसला आशेचा नवा तारा?