बॅलेट पेपरवर मतदानाच्या जनतेच्या मागणीची दखल निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी : नाना पटोले

मुंबई :  राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व मा. सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, माझे मत मी दिलेल्या उमेदवारालाच जाते का, यावर जर मतदारांना शंका असेल तर त्याचे समाधान झाले पाहिजे. मारकडवाडीतील लोकांनी बॅलेटपेपरवरील मतदानासाठी मॉक पोलिंग घेण्याचा निर्धार केला होता पण निवडणूक आयोग, पोलीस प्रशासनाच्या मदतीने सरकारने त्यांची मुस्कटदाबी केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ७६ लाख मते कशी वाढली, याचे उत्तर निवडणूक आयोगाला द्यावे लागेल पण ते समाधानकारक उत्तर देत नाहीत. मतांची चोरी करणे हा लोकशाहीचा दिवसाढवळ्या केलेला खून आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारे असंतोष निर्माण झाला असेल तर त्याची दखल घ्यावीच लागले. विरोधी पक्ष या नात्याने आम्ही सभागृहात व रस्त्यावर जनतेच्या या मागणीसाठी लढू, असे पटोले म्हणाले.

 

सरकारने विधिमंडळाची परंपरा पाळावी…

विधानसभा अध्यक्षपद बिनविरोध करणे तसेच उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देणे ही महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परंपरा आहे. दिल्ली विधान सभेत भाजपाचे फक्त तीन सदस्य असतानाही आम आदमी पक्षाने भाजपाला विरोधी पक्षनेतेपद दिले. मविआच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेते पद देण्यासंदर्भात चर्चा केली. सरकार त्यावर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *