निकालाच्या तेवीस तारखेला दुपारनंतर महाराष्ट्राचा ‘हरियाणा’ (हारा दिया ना?) झाल्यास नवल वाटायला नको!?

मतदार राजा सावध रहा, ‘ बंडखोरीचा ‘धुरळा’ आता ‘दाट धुक्यात’ परिवर्तीत झाला आहे!

महाराष्ट्रात(maharashtra) सध्या चार जून लोकसभा निकालानंतरची ४नोव्हेंबर ही तारीखही महत्वाची आणि निर्णायक ठरली आहे. चार जूनला महायुतीने जोरदार घसरगुंडी अनुभवली होती, आणि तीनही पक्षांनी ‘एकी’ केली तरी नेत्यांची ‘हवा गुल’ होण्याची स्थिती आली होती. त्याचवेळी महाआघाडीमध्ये मात्र तिघेजण एकत्र आले तर काय घडते? हे पहायला मिळाले,पण या ‘विजयाची हवा कॉंग्रेसच्या आणि शिवसेना ठाकरेंच्या डोक्यात’ गेल्याचे चार नोव्हेंबरच्या दिवशी पहायला मिळाले.

विधानसभेच्या(vidhansabha) जागावाटपाच्या महत्वाकांक्षा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या (३०ऑक्टो.) शेवटच्या दिवसांच्या शेवटच्या मिनीटांपर्यत कायम राहिल्याच. त्यानंतरही उमेदवार माघारीच्या अंतिम क्षणापर्यंत युती आणि आघाडीतल्या बंडांचे झेंडे फडकवणारे फारच थोडे बंडोबा शांत झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा(marathwada) असो किंवा कोकण, मुंबई उत्तर महाराष्ट्र असो. सगळ्या पक्षांमध्ये आघाड्यांमध्ये बंडाचे झेंडे मोठ्या प्रमाणात फडकताना दिसत आहे. २८८ पैकी किमान शंभर मतदारसंघात या ना त्या प्रकारे हे बंडोबा आपला प्रभाव दाखवून स्वपक्षाच्या किंवा आघाडीच्या पराभवासाठी शिकस्त करताना दिसणार आहेत. त्यामुळे जसे महायुतीचे नुकसान होणार आहे त्यापेक्षा जास्त ते महाआघाडीचे होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे एका वाक्यात सांगायचे झाले तर जे कर्मदारिद्र्य हरियाणात कॉंग्रेसने दाखवले तेच आता महाआघाडीमध्ये लहान मोठा प्रत्येक पक्ष दाखवत आहे. त्यामुळे निकालाच्या तेवीस तारखेला दुपारनंतर महाराष्ट्राचा हरियाणा(haryana) झाल्यास नवल वाटायला नको!

याचे कारण सांगताना एका मित्राने फिल्मी ईस्टाईलमध्ये सांगितले की, कितीही मतभेद असले, बंडखोरी असली तरी दोन्ही महत्वाच्या आघाड्यांमध्ये दिवार सिनेमा सारखा संवाद झाला तर काय दिेसेल ? महाआघाडीचा अमिताभ बच्चन जेंव्हा म्हणेल की ‘मी लोकसभा जिंकलो, तुमच्याकडे मोदी, शहा, यंत्रणा असतानाही तुम्हाला हरवले आहे. आता तर मीच विधानसभा जिंकल्यात जमा आहे. सगळकाही माझ्याकडे आहे, तुमच्याकडे काय आहे? तेंव्हा महायुतीचे शशि कपूर ठेक्यात ठासून म्हणेल, ‘ हमारे पास चुनाव आयोग, और बाकी सारी यंत्रणा है!’ म्हणजे काय? साम, दाम, दंड, भेद! हे लक्षात ठेवले असते तर आता बंडखोरीच्या बांडगुळांच्या पताका घेवून अधिकृत राजकीय पक्ष ‘आमची महाआघाडी कायमच’ असल्याचे जे सांगत आहेत तो केवळ देखावा आहे, हे सांगायला जागाच राहिली नसती. मात्र त्यांच्या आणि कदाचित महाराष्ट्राच्या दुर्दैवाने हे खरे आहे असेच आता चित्र दिसू लागले आहे.

येथे असे सारे विवेचन करण्याचे कारण काय आहे? तर महाराष्ट्राच्या जनमानसाचा कौल काय? ते लोकसभेलाच दिसले होते. ‘सांगली पँटर्न’मुळे शिवसेनेला नाम घासून घेत विशाल पाटील यांचा अखेर स्विकार करावा लागला होता. पण त्याचवेळी कॉंग्रेसच्या डोक्यात इतकी हवा गेली की, आमचे १वरून १३+१ = १४ झाले आहे, आता आम्हाला कुणाचीच गरज राहिली नाही. आणि मग त्यांच्या ‘सांगली पँटर्न’च्या कक्षा रूंदावल्या असून सोलापूर, कोल्हापूर, पासून अगदी हक्काच्या विदर्भात देखील त्यांच्याकडून जे काही अति महत्वाकांक्षा दाखवत जागावाटपाचे ‘त्रांगडे’ झाले आहे. ते त्यातून त्यांच्या किमान दहा ते वीस जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याच गणिताचा व्यापक विचार केला तर महाविकास आघाडीच्या सर्वच घटकपक्षांच्या बालिश राजकारणाचा फटका त्यांना बसेल आणि किमान तीस ते पस्तीस निवडून येवू शकतील अश्या जागा ते गमाविण्याची शक्यता आहे. आता सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही त्रांगड्या गटांना म्हणजे महायुती आणि महा आघाडीला आता केवळ दहा टक्के जागांचे अंतर आहे, म्हणजे २८ ते ३० जागा, असे ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. इथेच आघाडीचे घोडे पेंड खात आहे.

मग महाशक्तीचा सुरत गुवाहाटी पँटर्न, पुन्हा ‘यु टर्न’ घेत सुरू होण्यास मदत मिळणार आहे. आणि आता तर तो जास्तच सोपा होणार आहे. कारण मोठ्या प्रमाणात ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशी अपक्षांची कुमक उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नेमके तेवढेच हे अपक्ष किंवा बंडखोरांचे संख्याबळ असण्याची शक्यता आहे. म्हणजे २० ते चाळीस च्या दरम्यान असे सेफॉलॉजी आणि राजकीय विश्लेषणांच्या आधारे सांगता येणे शक्य आहे.

Political-parties

सर्वात महत्वाचे म्हणजे महाआघाडीचे चाणाक्य शरद पवार यांच्यासाठी बारामती लोकसभेपेक्षा विधानसभा जास्त प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे मोठ्या साहेबांना आता जास्तीत जास्त वेळ बारामतीमध्ये देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण अजित पवारांना सक्रिय करण्यात आले आहे. ते जुन्या कढीला ऊत देत जुनी वक्तव्ये आणि जुन्या कलागती काढून पवार साहेबांना एग्जेंड ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत? त्याचा परिणाम ‘मोठे साहेब’ महाराष्ट्रात जास्त वेळ देवू शकणार नाहीत. तर त्यांचे मोठे नेते असलेल्या अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, अश्या सा-याच नेत्यांच्या स्वत:च्या मतदारसंघात आता त्या त्या नेत्यांनाही जास्त लक्ष घालण्याची गरज आहे, त्यामुळे निवडणूका जाहिर होण्यापूर्वीचा ‘धुरळा आता दाट धुक्यात परिवर्तीत झाला आहे.

काहींच्या मते महाआघाडीच्या याच सा-या कर्मदरिद्रीपणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्फत मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात जो राजकीय प्रयोग केला जाणार होता त्याला तुर्तास पूर्ण विराम देत गनिमी काव्याने राज्यभर पाडापाडीचा निर्णय घेण्यात आला आहे, आता जरांगेंच्या मागच्या महाशक्तीने (?) जागोजागच्या अपक्षांच्या जागांवरील निवडून येण्याची क्षमता असलेल्या किमान १२० ते १५० जागांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना रसद पुरविता येते का? याची चाचपणी सुरू केली आहे म्हणे. यातूनच हे मोठ्या प्रमाणात अपक्ष/ बंडखोरांचे पिक निकालातून उगविण्याची शक्यता आहे. कुणाच्या मते या पिकाला गांधीसत्वाचे खतपाणी राज्याच्या दोन प्रमुख नेत्यांकडून घातले जात आहे. त्यातील एक सध्या राज्याचे नेतृत्व करत आहेत. तर दुसरे राजकारणाचे नेतृत्व गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत म्हणे!
ज्या कोल्हापूरातून दोन्ही प्रमुख राजकीय आघाड्यांच्या प्रचाराचा शुभारंभ होत आहे. तेथे तर महाविकास आघाडीच्या उन्मादी नेत्यांच्या वागण्याची परिसीमा झाल्याचे पहायला मिळाले आहे. इतके की, चार महिन्यांपूर्वी ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजाचे गोडवे कॉंग्रेस आणि महाआघाडीकडून गायले जात होते. त्याच छत्रपतींच्या राजकीय वारश्याला शेलक्या भाषेत चारचौंघासमोर अपमानित करण्याचे काम कॉंग्रेसच्या तथाकथित किंगमेकर समजल्या जाणा-या नेत्याने केल्याने आता कोल्हापूर जिल्हयातील किमान पाच जागांवर महा आघाडीला फटलका बसण्याची शक्यता आहे.

तीच गोष्ट सोलापूरात झाली आहे, नरसय्या आडाम मास्तर हे साम्यवादी चळवळीतील मोठे नाव आहे, अगदी मोदीबाबांच्या हस्ते त्यांच्या हजारो विडी कामगारांच्या घरांचे उद्घाटन असो किंवा अलिकडेच त्यांनी साथ देत कॉंग्रेसच्या प्रणती शिंदे यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलण्यापर्यतचे राजकारण असो. पण याच आडाम मास्तर यांना एक जागा सोडण्याची कबुली, आदेश देवूनही प्रत्यक्षात आज मास्तरांना आघाडीविरोधात बंडखोरी करून उमेदवारी करावी लागत आहे. ऐरवी श्रमिकांसोबत कामाचा अनुभव घेण्यासाठी सगळी ताकद लावणा-या भारत जोडणा-या राहूल गांधीना सोलापूरच्या स्थानिक खासदार बाईंच्या आग्रहाखातर आपले सगळे राजकीय तत्वज्ञान विसरावे लागल्याचे पहायला मिळत आहे. या खासदार बाईंच्या विजयानंतर राहूल गांधी यांच्याशी त्यांचा विवाह होण्याच्या बातम्या देखील समुह्ममाध्यमांवर जोरदार चालविण्यात आल्या होत्या. त्यावर खुलासे आणि इन्कारही झाले. पण विधानसभेत एका कष्टकरी समाजाचे प्रतिनीधीत्व करणा-या ज्येष्ठ नेत्याला संधी देताना एरवी कष्टक-यांना गँरंटी वाटत फिरणा-या राहूलबाबांच्या गँरंटीचे काय झाले? असे आता राज्यभरातील जनता विचारत आहे. अगदी असाच प्रकार रायगड जिल्ह्यात शेकाप आणि शिवसेना ठाकरेंच्या पक्षात झाला. जागावाटपांत फाटले म्हणून बंडखो-या झाल्या. त्यानंतर जाग आली म्हणत चर्चा, समझोते, आणि अगदी शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर बैठकाही झाल्या. पण उरणमध्ये ना शेकाप हटली ना पेण अलिबागला शिवसेना आता नतिजा ठणठणगोपाळ ठरलेच आहे.


ज्या विदर्भात कॉंग्रेस विरूध्द भाजपा असा थेट सामना आहे तेथे देखील रामटेकसह सावनेर, उमरेड, अर्जुनी मोरगाव पासून भंडारा गोंदिया पर्यंत मोक्याच्या जांगावर बंडखोरीचे ग्रहण कायम आहे. गंमत म्हणजे महाविकास आघाडीचा मोठा भाऊ असलेल्या कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याचे जावई राजेंद्र मुळक बंडखोर आहेत. एकेकाळी (२०१२पर्यंत) कॉंग्रेसच्या राज्यात ज्यांना मुख्यमंत्र्यांचे बंटी-बबली समजले जात त्याच या मुळक आणि कोल्हापूरच्या सतेज पाटलांचे सत्ता येण्या आधीचे कॉंग्रेस पक्षातील चित्र असे आहे. अगदी नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यातही बंडखोरी मागे होवू शकली नाही, त्यामुळे कॉंग्रेस प्रभारी चेन्नीथला यांच्या ‘मैत्रिपूर्ण लढती होणार नाहीत’ या शब्दांना समस्त कॉंग्रेस बंडखोरांनी खरे करून दाखवले आहे आणि ते आपल्याच ‘कुनब्या’ विरोधात लढणार आहेत.


महायुतीमध्येही काही वेगळे चित्र नाही. मुंबईत दाऊद इब्राहिमचे हस्तक समजल्या गेलेल्या नबाब मलिक यांना त्यांच्यामुलीसह एक नाही दोन जागांवर राष्ट्रवादीकडून संधी दिली जाते. आणि भाजपच्या नाकावर टिच्चून मलिक महायुती विरोधात निवडणूक लढवताना दिसतात. राष्ट्रीय राजकारणात अखिलेश यादव यांना मुंबईतून रसद पुरविणा-या अबु आझमींच्या गढात हे होत आहे. बाबा सिद्धिकी यांच्या खूनानंतर त्याची चौकशी सुरू आहे. मात्र महायुतीमध्ये निर्माण झालेल्या पोकळीतून हे नवे राजकारण निर्माण झाले आहे म्हणे? दुसरीकडे महायुतीमध्ये मनसेच्या मागील दारातून प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर राग असल्याचे सांगण्यात येत आहे. जागा वाटपात अन्याय झाल्याच्या भावनेने त्यांनी देखील मुंबईसह अनेक ठिकाणी बंडखोर कायम ठेवले आहेत, शिवाय त्यांच्या खतपाण्याची व्यवस्थाही केली आहे म्हणे! या शिवाय अनेक ठिकाणी अपक्षांच्या मागे त्याची ताकद असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा फटका महायुतीला बसणार की नाही? ते समजेलच. पण खुद्द ठाणे जिल्ह्यात शिंदे यांचे राजकीय विरोधक असलेल्या गणेश नाईकांपासून कपिल पाटलांपर्यंत, रविंद्र चव्हाणांपासून मनसे पर्यंतच्या बंडखोरांमुळे मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच जिल्ह्यात महायुतीमधून फारसे चांगले संदेश दिले न गेल्याने मग महायुती विरुध्द अविनाश जाधव या मनसेच्या, तर नाहटा, चौंगुलेंसारख्या शिंदेसेनेच्या बंडखोरांचे देखील फावल्याचे पहायला मिळत आहे. या सा-या खेळात भिवंडी कल्याण मध्ये देखील शिंदेच्या सहका-यांच्या जागा संकटात आहेत. तर ठाणे शहर मध्ये स्वत: शिंदे धर्मसंकटात आहेत. कारण ज्या धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा ते सांगतात त्याच दिघेंच्या वारसदारांने त्यांना कोपरीत आव्हान दिले आहे. तर संजय केळकर ज्यांच्याशी त्यांची हयात राजकीय वैर आणि लढण्यात गेली आहे त्यांच्यासाठी त्यांना महायुतीचा उमेदवार म्हणून महाशक्तीच्या मर्जीसाठी का होईना? प्रचार करावा लागणार आहे, नव्हे ‘ही जागा गमावली तर भाग्यच गमावले’ अशी धर्मसंकटाची स्थिती शिंदेची झाली आहे म्हणे! कारण समोर उध्दव ठाकरेंचे उमेदवार राजन विचारे आहेत ज्यांची जुनी मैत्री आज जुन्या शत्रुत्वासारखी झाली आहे, त्यामुळे दोन शत्रूमध्ये सध्या चांगला कोण ते ठरवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. एकूण काय बंडखोरीच्या तीन तिगाड्यामुळे महाराष्ट्रात राजकारणाचे त्रांगडे होणार आहे हे नक्की. आता मतदारांकडून कसे मतदान होणार यावर ब-याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत. जागते रहो!

 

 

 

   किशोरआपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

 

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *