नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर(Nagpur Railway Station) काल रात्री जिवंत स्फोटके भरलेली बॅग आढळून आल्याने खळबळ माजली आहे. रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे बूथच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या एका काळ्या रंगाच्या बॅग मध्ये ही स्फोटके आढळून आली आहेत. यामध्ये 54 डिटोनेटर हे एकमेकांशी जोडलेले होते. जप्त करण्यात आलेले स्फोटके अत्यंत कमी क्षमतेची आहेत. एकाद्या फाटक्या इतकीच त्याची क्षमता आहे.
प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने या प्रकरणाचा तपास रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस संयुक्तपणे करीत असून ती बॅग कुणाची होती , ती तेथे कशी आली, कुणी ठेवली याचा तपास सुरू असल्याची माहिती नागपूरचे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅग मध्ये असलेल्या बॉम्ब सदृश्य वास्तूमध्ये डिटोनेटर आणि लो इंटेनसिटीच्या स्फोटकाच्या 54 कांड्या एकमेकांशी जोडलेल्या स्थिती होत्या.
बिडीडीएस च्या पथकाने हे जिवंत स्फोटके ताब्यात घेतल्या नंतर शहर पोलिसांचा मदतीने आज पहाटे 3 वाजेपर्यंत नागपूर रेल्वे स्थानक आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. रेल्वे स्थानकावरील संशयित प्रवाशांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.