फडणवीस-नार्वेकर ‘पुन्हा आले’, नवे आर आरही ‘गवसले’, तरी. . . नव्या डावातही ‘टांगा पलटी घोडे फरार’ होण्याची भिती?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकाल २३नोव्हे.रोजी लागला. त्यानंतर ५डिसेंबरला नवे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर ९डिसेंबरला नवे विधानसभा अध्यक्ष म्हणून पुन्हा राहूल नार्वेकर यांनाच निवडण्यात आल्याने हे ही ‘पु्न्हा आले’ तर नव्याने कोणाचा निकाल-निवाडा करणार? अश्या राजकीय वर्तुळात नव्याने जुन्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. याचे कारणही गमतीने सत्ताधारी पक्षांच्या एका सदस्यांने अनौपचारीक गप्पांमध्ये अध्यक्षांच्या आसनामागे ‘धर्मचक्र प्रवर्तनाय’ असे लिहिल्याचे सांगितले. तर आता नवे अध्यक्ष ‘टांगा पलटी घोडे फरार’ करत ‘घोडेबाजार’ करणाऱ्या जुन्या काही सदस्यांच्या नव्या प्रकरणात मुख्य भुमिका करणार का? अशी राजकीय शंका उपस्थित केली! दुसरीकडे अध्यक्ष ‘पुन्हा आले’ त्यावरची तातडीची प्रतिक्रिया उध्दव ठाकरे यांच्या पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या निवडीच्या कामकाजात गैरहजर राहून दिली आहे. म्हणजे हे पुन्हा आले म्हणून ते सभागृहात आले नाहीत. !
विश्वासदर्शक ‘अळीमिळी गुपचिळी’
अगदीच ‘चटावरचे श्राध्द’ उरकावे (खरेतर हे विशेषण अश्या प्रसंगी अनुचित वाटेलही!) तसे किंवा अधिक सौम्य शब्दात सांगायचे तसे ‘झट मंगनी पट ब्याह’ या धर्तीवर विश्वासदर्शक ठरावाचे कामकाज गुंडाळण्यात आले. मात्र हल्ली बहुदा यावर संपादकीय किंवा माध्यमांतून फारश्या चर्चा होत नाहीत किंवा करावे असे माध्यमांच्या मालक-चालकांना मनात असले तरी करता येत नाही म्हणे! असो बापुडे आपण निरपेक्षपणे जे घडते-बिघडते त्याचे सारे पैलू मांडायला हवेत. ते मांडताना पत्रकारितेचा वसा, लोकशाही मूल्यांची चाड ठेवली की झाले. असो.
तर अगदी ‘अळीमिळी गुपचिळी’ अश्याप्रकारे हा विश्वास दर्शक ठराव मंजूर होण्यापूर्वी विधिमंडळाचे वार्तांकन करणारा एक मित्र आदल्या दिवशी भेटला. त्याने सहज विचारणा केली की, आता या विशेष सत्राच्या शेवटच्या दिवशी काय काय कामकाज होणार? मागील तीन दशकांचा प्रत्यक्ष अनुभव आणि माहितीच्या आधारे मी त्याला म्हटले की सर्व सदस्याच्या शपथग्रहणानंतर अध्यक्षांची निवड आणि नव्या सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाची कार्यवाही होत असते. पण त्याच्या गावी ही खबरच नव्हती! त्याने म्हटले की, पण राज्यपालांनी सत्तास्थापनेच्या वेळी अशी काहीच अट घातल्याचे सांगितले नाही. मग त्याला नियम आणि प्रथा परंपरा याबद्दल माहिती देत अन्य एका ज्येष्ठ मित्राने समजाविले की, हे वैधानिक कामकाज आहे. ते या सरकारचे संख्याबळ पाहता सोपस्कार असले तरी करावे लागतात! आणि खरेच हा शब्द ‘अगदी सोपस्कार’ शब्दश: खरा ठरवत ते पार पडावे असेच हा विश्वासदर्शक ठरावाचा कार्यक्रम केवळ तीन मिनीटांत आटोपला. त्यानंतर कामकाज राज्यपालांच्या अभिभाषणानंतरच्या कार्यवाहीपर्यंत तहकूब करण्याची घोषणा करण्यात आली.
अधिवेशनापूर्वी खातेवाटपाचा मोठा ‘टास्क’!
यातून मार्ग काढण्यासाठी शिंदे यांना पर्यायी मंत्रालयांचा मार्ग देखील मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे, त्यांच्यामते ‘हवी ती’ खाती मिळत नसतील तर ‘जास्तीची ३-४ मंत्रीपदे’ मिळायला हवीत पण त्यासाठी देखील ‘नकारघंटाच’ मिळत असल्याने आता शपथविधी प्रकरण दोन दिवस ‘लांबण्याची शक्यता’ आहे. आता यावर दिल्लीच्या श्रेष्ठींकडून ‘निवाडा’ केला जाण्याची चर्चा आहे. मात्र राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. शिंदे-पवार यांच्याशिवाय नव्या सरकारसोबत अजूनही ‘कुणीतरी येणार येणार गं’ ची प्रतिक्षा आहे म्हणे!?
कुणाच्या मते महाविकास आघाडीत बिघाडीची जी प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यात महायुतीसोबत मनसेला घेण्याची चर्चा तर स्वत: मुख्यमंत्र्यानी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीव्दारे सुरू करण्यात आली आहेच. पण त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील कुणाच्या तरी ‘योग्यवेळी योग्य निर्णयाची’ चर्चा सुरू आहे. आता हा ‘करेक्ट कार्यक्रम’ कुणाचा आणि ‘कधीपर्यत होणार’ हे देखील गुलदस्त्यात राहणार आहे. पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने ‘विधानसभा गटनेता’ आणि ‘प्रतोद’ निवडला तरी अद्याप ‘विधीमंडळनेता’ (का बरे) निवडला नाही? यावर देखील राजकीय निरिक्षकांचे लक्ष आहे, तर कॉंग्रेस पक्षात सगळाच अजूनही आनंदच आहे. ‘मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उशीर होत आहे’ म्हणून टिका करणाऱ्या पटोले यांच्या पक्षात तर ‘अजून विधीमंडळ पक्षाची बैठक’ घेवून ‘प्रतोद, गटनेता आणि विधिमंडळ नेता’ निवडण्याचे ‘राहून गेले’ आहे. त्यांच्या पक्षाचे नेते म्हणे संसदेत ‘व्यस्त’ असल्याने यावर निर्णय ‘प्रलंबित’ आहेत. पण मग या पक्षातही पुन्हा नव्या कुठल्या ‘संसर्गाची लागण होण्याची वाट तर पाहिली’ जात नाही ना? अश्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
विशेष सत्रामध्ये तर विरोधीबाकांवरून बोलताना जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक जुगलबंदी झाली. त्यात पाटील यांनी आपण ‘योग्यवेळी निर्णय घेणार’ असल्याचे संकेत दिल्याचे आता मानले जावू लागले आहे. त्यानंतर ९ तारखेला सायंकाळी सभागृहाबाहेर लोकांमध्ये दोन भाषणांची चांगलीच चर्चा होती, एक म्हणजे नव्या आर आर पाटलांच्या भाषणाची आणि दुसरी जुन्या जयंत पाटलांच्या नव्या भाषणाची!