’ये लाल रंग कब मुझे छोडेगा?’ फडणवीसांच्या चिंतेचा नवा राजकीय संदर्भ !

काँगेसच्या ‘निर्नायकी’चे फलित : महाराष्ट्राच्या नेत्यांची ‘गँरंटी’ कोण घेणार!?

महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेसाठी सध्या निवडणूक प्रचार अगदी चरमसिमेवर पोहोचला आहे. सत्ताधारी महायुती आणि महाआघाडीचे नेते आपापले मुद्दे घेवून भिडले आहेत. त्यात त्यांच्याकडून दररोज परस्परांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महायुतीसमोर सध्या हरियाणात लोक सोबत असताना काँगेस पक्षाची अवस्था ‘धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले’ अशीच झाल्याचे पहायला मिळाले आहे. याचे कारण राहूल गांधी आणि काँगेस नेत्यांच्या प्रचारसभांना तेथे लोकांचा अलोट प्रतिसाद होता. तर मोदी आणि भाजपच्या सभांना जेमतेम गर्दी दिसत होती. अगदी काहिशी तशीच स्थिती महाराष्ट्रात आहे, अगदी योगी आदित्यनाथ, अमित शहा, नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेलाही अपेक्षीत गर्दी जमलेली दिसत नाही. पण त्यामुळे महाआघाडीत मुख्यमंत्री पदावर डोळा असलेल्या काँगेसच्या नेत्यांच्या मनात ‘पाल चुकचूकली’ आहे. त्यातूनच काँगेसने त्यांच्या यच्चयावत सा-या अगदी निवृत्तीच्या मानसिकेतत असलेल्या अन्य राज्यातील नेत्यांची फौज महाराष्ट्रात गावोगाव कामाला लावल्याचे दिसत आहे.

नेत्यांची गँरंटी घ्यायलाच ‘या’ पक्षात कुणी तयार नाही!

वास्तवात मात्र काँगेस पक्षाची आजची स्थिती निर्नायकी अशीच झाली आहे. याचे कारण जागावाटपाच्या वेळी शिवसेनेकडून नाना पटोले यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यास नकार देण्यात आला तेंव्हा दिल्लीवरून धावपळ करण्यात आली, चेन्नीथला, थोरात अश्या नेत्यांना पुढे करत चर्चा पूर्ण करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत काय किंमत दिली जाते? ते स्पष्ट झाले आहे. राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये वर्षानुवर्षे पक्षासोबत एकनिष्ठ असणारा मोठा वर्ग सध्या बाजुलाच पडल्याचे दिसत आहे. यात जातीगत जनगणना करण्याची आवई देणा-या राहूल गांधी यांना महाराष्ट्रात दलित, आदिवासी, मुस्लिमांपलिकडे मराठी समाजात अल्पसंख्याक समाज असलेल्या असलेल्या अनेक सुशिक्षीत ब्राम्हण, पारसी, गुजराती, महिला इत्यादी समाजघटकांचा विसर पडल्याचे पहायला मिळत आहे, असे सांगण्यात येत आहे. दैवदुर्विलास आणि उदाहरण म्हणून पहायचे झाल्यास, ज्या ‘टिळक’ भवनातून मुंबईत पक्षाचे व्यवहार चालतात, ते ज्या ‘काकासाहेब गाडगीळ’ मार्गावर आहे, त्या काकासाहेबांचे सख्खे नातू असलेल्या आर्किटेक्ट अनंत गाडगीळ यांना या पक्षात, कार्यालयात काहीही स्थान देण्यात आले नाही. अश्या प्रकारे असंख्य लोक, ज्येष्ठ कार्यकर्ते या पक्षात आज दूर फेकले गेले आहेत. अश्याच प्रकारे पारसी, सिकेपी, मारवाडी-गुजराती, अश्या अनेक मुंबईतील जाती जमातीच्या कार्यकर्त्याना या पक्षात आता स्थान राहिले नाही. कोणे एके काळी याच ‘मायनॉरिटी समाजांची’ येथे महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भुमिका होती.


दुसरी महत्वाची बाब सांगण्यात येत आहे की, काँगेस नेत्यांना, कार्यकर्त्याना एखादा महत्वाचा मुद्दा, चुकीची दुरूस्ती करण्यासाठी ऐन निवडणूक काळात पक्षाला सांगायचा असेल तर, त्यांनी ‘नेमके कुणाला सांगायचे?’ हा प्रश्नच आहे, इतकी निर्नायकी या पक्षात आहे. खालच्या कार्यकर्तांचा आवाज, तक्रारी, सूचनांना काहीच किंमत नाही किंबहूना त्यांना त्या मांडायची काहीच व्यवस्था नाही, असे त्याच पक्षातले लोक सांगत असतात. कारण खर्गे यांच्याकडे पक्षाची सूत्रे असली तरी राहूल गांधी त्यांच्या कामकाजावर फारसे खूश नाहीत, असे सांगण्यात येत आहे. तर राहूल गांधी जो अजेंडा घेवून जात आहेत, त्यात त्यांच्या पक्षातच ते ‘न्याय देताना दिसत नाहीत’ अशी देखील चर्चा ऐकायला येत आहे. सोलापूरातील ज्येष्ठ कॉम्रेड नरसय्या आडाम मास्तर यांनी तर हेच बोलून दाखवले आहे. अगदी जागावाटपात जेंव्हा वाद झाले तेंव्हा सहकारी पक्षांना नाना पटोले यांना बाजुला केले तर कुणाशी बोलायचे? कोण निर्णय घेणार? ते माहिती नसल्याने अनेक वाद बाहरे आल्याचे आता सांगण्यात येत आहे.


महत्वाचे आणि गंभीर हे आहे की, भाजपच्या काही संभाव्य उमेदवारांशी चर्चा करून काँगेसच्या वरिष्ठापासून प्रदेश पातळीपर्यतच्या नेत्यानी जागावाटपात व्यवहार केल्याच्या चर्चा आजच होताना दिसत आहेत, त्यामुळे भाजपच्या किमान २५ ते ३० जागा सोप्या करून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ‘जनतेला गँरंटी देत फिरणा-या’ अश्या ‘नेत्यांची गँरंटी घ्यायलाच या पक्षात कुणी तयार नसल्याचे’ चित्र आहे. त्यामुळे निकालात जनसमर्थनाचा परिणाम हरियाणात दिसला नाही, मग इवीएमच्या बँटरीसारखे मुद्दे सांगण्यात आले, तसाच काहीसा प्रकार येथेही होताना दिसल्यास नवल वाटालया नको असे एका वरिष्ठ माजी मंत्री असलेल्या काँगेस नेत्यानेच सांगितले.

सर्वच घटकांचा भविष्याची चिंता, आणि अस्तित्वाचा विषय

तसे पाहिले तर यावेळी निवडणूक म्हणजे सर्वच घटकांचा भविष्याची चिंता, आणि अस्तित्वाचा विषय ठरला आहे. ही निवडणूक सर्वार्थाने म्हणूनच वेगळीच म्हणायला हवी! या संदर्भात विशयांतर करून सांगायला हवे की, समर्थ रामदास एकदा लहानपणी अंधारात खूप वेळ एकटेच बसून होते, त्यांच्या घरच्यांनी खूप शोधूनही ते सापडले नाहीत. अखेर त्यांच्या आईला ते अंधारात दिसले. तेंव्हा त्या माऊलीने विचारले, ‘नारायणा कुठे हरवला आहेस, अंधारात एकटाच बसून काय करत आहेस?’ तेंव्हा रामदास म्हणाले होते, “ आई चिंता करतो या विश्वाची!” तशीच सध्या या निवडणूकीचे सारे विश्व आणि त्यातील सारेच चिंताग्रस्त झाले आहेत. कसे ते पाहूया!
या निवडणूकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्याना तिकीटांची चिंता होती, आहे. आता तिकीट नसले तरी बंडाच्या रूपाने रिंगणात आलेल्यांनी स्वत: सोबत समोरचा तरी निवडून येईल की नाही? अशी चिंता त्यांच्या जुना पक्ष आणि नेत्यांची सुध्दा वाढवली आहे.
दुसरे आघाडी असो की युती सर्वच पक्षांच्या शिर्षस्थ नेत्यांना आपले किती आमदार येणार? आणि मुख्यमंत्री पद मिळणार की नाही? सत्तेवर येणार की नाही याची चिंता आहे.


या नेत्यांच्या भरवश्यावर त्रीगुणी आघाडी आणि युती केलेल्या दिल्लीच्या दोन्ही कडच्या नेत्यांना महाराष्ट्रात सत्ता येणार की हातून जाणार? याची चिंता आहे. कारण सत्ता गेली तर केंद्राच्या सत्तेवर त्यांचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. आणि महायुती पुन्हा आलीच तरी या विरोधकांचे काही खरे नाही, त्यांच्या चिंता वाढणारच आहेत. दुसरीकडे सत्ता गेली तरी रा स्व संघाला चिंता आहे आणि पुन्हा आली तरी हीच चिंता राहणार आहे की, ‘आपल्या मनाजोगता राष्ट्रीय अध्यक्ष किंवा महामंत्री भाजपमध्ये बसविता येणार किंवा नाही?’ तर मोदी – शहा यांना देखील सत्ता गेली तर ‘आपले पद सरकार टिकेल की नाही’ याची चिंता आहे.सगळ्यात मोठी चिंता सर्वच राजकीय पक्षांना आपल्या राजकीय अस्तित्वाचे काय? याची आहे. मग ते शरद पवार असोत, उध्दव ठाकरे असोत, देवेंद्र फडणवीस असोत, अजित पवार असोत, किंवा मुख्यमंत्री शिंदे असोत. अगदी राहूल गांधी आणि नरेंद्र मोदी असोत! सा-याना या निकालात आपला ‘निक्काल लागतो की वाचतो’ याची चिंता आहेच!

मित्रानो, गंमत त्यापलिकडे जावून राज्यात, देशात हजारो कोटींचे प्रकल्प आणायच्या स्वप्नांवर लाखो- करोडो रूपये निवडणूकांसाठी बाजारात आणून त्यातून दुप्पट-तिप्पट नफा कमाविण्याची चिंता असलेल्या कॉर्पोरेट-बांधकाम विकासक, उद्योग जगतातील गुंतवणूकदारांना आहे. ज्याच्या मागे पैसा लावतो आहे तो जिंकतो की आपल्यासोबत स्वत:लाही डुबवतो याची!
सर्वात महत्वाची चिंता राज्यातल्या निवडणूकीत काय होणार? याची शेतीमालाचा भाव नसल्याने हवालदिल शेतक-यांना आहे, लाखो बेरोजगार तरुणांना आहे, महागाईने त्रासलेल्या, अन्यायग्रस्त माय-भगिनींना आहे, शिक्षण-आरोग्याच्या सोयी सुविधांना वंचित समाजाला आहे. आरक्षणाचा हट्ट धरून बसलेल्या कोट्यावधी समाजबांधवाना आहे. या देशात नक्की काय सुरू आहे? हा देश साम्राज्यवादी, भांडवलशहांच्या घश्यात जाणार की राहणार? याची चि्ंता करणा-या समाजवादी, साम्यवादी, पुरोगामी विचारवंताना आहे.
आणखी चिंता आहे ती महाराष्ट्रावर प्रेम करणा-या महाराष्ट्रवादी जनतेला ‘हा महाराष्ट्र, मुंबई गुजरात्यांच्या घश्यात तर जाणार नाही?’ हुतात्म्याचे ‘बलिदान व्यर्थ झाल्याचे’ तर पहावे लागणार नाही? मुंबई भांडवलशहांच्या हाती विकली तर जाणार नाही याची आहे.
त्याहूनही सर्वात जास्त चिंता आहे ती राहूल गांधी आणि त्यांच्या समविचारी पक्ष संघटना आणि नेत्यांना. ती आहे ‘संविधान वाचणार’ की नाही? आरक्षणासाठी जातीगत जनगणना होणार की नाही, त्या माध्यमातून सामाजिक आर्थिक समानता, न्याय मिळणार की नाही? याची आहे.


तर महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना चिंता आहे ती ‘लाल रंगाच्या’ या संविधानाची प्रत दाखवून सामान्य दलित, शोषित वंचित, अल्पसंख्याक इतर मागास वर्गाची मते पुन्हा विधानसभेत दूरावणार तर नाहीत? त्यामुळे मग देवेंद्र फडणवीस म्हणाले तसे ‘अर्बन नक्षलवाद’ या राज्यात फोफावणार तर नाही? ! सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांना याबाबत एका मुलाखती दरम्यान विचारणा झाली. तर ते म्हणाले की २०२४नंतर लोकसभेत पहिल्याच अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्रालयाने एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ‘अर्बन नक्षल’ अशी कोणताही संकल्पना देशात अस्तित्वात नसल्याचे उत्तर दिले आहे! गंमत म्हणजे रामनाथ कोविद राष्ट्रपती झाले त्यावेळी देखील नरेंद्र मोदी यांनीच सर्वप्रथम ही लाल रंगाच्या संविधानाची प्रत त्यांना देवून २६ जुलै २०१७ रोजी त्यांचा सन्मान केला होता! तरीही फडणवीस साहेबांना सध्या ‘लाल रंगाची चिंता’ वाटली आहे.

त्यावर एका फिल्मी समीक्षा करणा-या मि्त्राने सांगितले. बहुदा अलिकडेच त्यांनी कधीतरी राजेश खन्ना यांचा जुना सिनेमा ‘प्रेम नगरी’ पाहिला असावा! त्यात आनंद बक्षी यांचे गाणे आहे. ज्याला एस डी बर्मन साहेबांनी किशोर कुमार यांच्या दर्दभ-या आवाजात अजरामर केले आहे. तो नायक देखील हिच चिंता व्यक्त करताना दिसतो,’ये लाल रंग कब मुझे छोडेगा?’ बहुदा फडणवीस साहेबांच्या चिंतेचा संदर्भ नव्या राजकीय परिस्थितीत असाच काहीसा असावा. असे त्याने म्हटले आहे! तूर्तास इतुकेच!

निवडणूक विशेष
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)

 

शेवटी लोकशाही जिवंत राहिली पाहीजे या उदात्त हेतूने सारेच कामाला लागले आहेत!…

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *