‘फ्लावर पार्क’ सारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांमुळे नाशिकच्या पर्यटन वाढीस फायदा : छगन भुजबळ

नाशिक  :  नाशिक जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प साकारले आहे. पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता नाशिकमध्ये ‘फ्लावर पार्क’ सारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे नाशिकमध्ये आलेला पर्यटक हा धार्मिक पर्यटनासोबत अधिक काळ नाशिकमध्ये राहून निसर्ग दर्शनाचा लाभ घेऊ शकतो. त्यामुळे नाशिकच्या पर्यटन वाढीसाठी अधिक फायदा होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक महापलिका सभागृह नेते नगरसेवक शशिकांत जाधव यांनी त्र्यंबकेश्वर येथे सुरु केलेल्या ‘फ्लावर पार्क’ची आज मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करून उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला. यावेळी नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

ते म्हणाले की, नाशिक महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा सभागृह नेते तसेच उद्योजक शशिकांत जाधव यांच्या संकल्पनेतून नाशिकच्या पर्यटनाच्या दृष्टीने ‘नाशिक फ्लावर पार्क’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविली जात आहे. ‘नाशिक फ्लावर पार्क’चे हे दुसरे वर्ष असून पहिल्या वर्षी सुमारे ४.५ एकरात हा प्रोजेक्ट सुरु करण्यात आला. यंदा मात्र जवळपास ९ एकरात हा भव्य ‘नाशिक फ्लावर पार्क’ उभारण्यात आला आहे. या फ्लावर पार्कमध्ये ४२ विविध प्रकारच्या विदेशी फुलांच्या प्रजाती आहे. या सर्व अमेरिका, नेदरलँड्, जपान या देशातील आहे. याठिकाणाहून अत्यंत महागडे बियाणे मागविण्यात येऊन याठिकाणी त्यांचे रोपण करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय प्रजातीच्या फुलांचा देखील समावेश असणार आहे.

यापासून जवळपास ४ लाख रोपे तयार करण्यात आलेली आहे. यातील तयार करण्यात आलेल्या रोपांच्या माध्यमातून २.५ लाखांहून अधिक कुंड्या तयार करण्यात आलेल्या आहेत. तसेच जमिनीवर काही रोपे लागवड करण्यात आली असून एकूण ५ लाखांहून अधिक रोपे लावण्यात आली आहे. याठिकाणी त्र्यंबकेश्वर, हरसूल परिसरातील जवळपास दीडशे आदिवासी बांधवाना रोजगार उपलब्ध झाला असून कोरोना काळापासून याठिकाणी हे लोक काम करत आहे. नाशिकच्या पर्यटन विकासासाठी ‘नाशिक फ्लावर पार्क’ महत्वाचं केंद्रबिंदू बनेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, बोट क्लब सुरू होण्यासाठी कुठलीही अडचण नाही कोविड मुळे अद्याप ते सुरू होऊ शकले नाही. कोरोनाचे प्रादुर्भाव कमी होताच ते लवकरच सुरु करण्यात येईल. तसेच कोरोना प्रादुर्भाव वाढू नये हा एकमेव हेतू असून कुणालाही आंदोलनापासून अडविण्याचा कुठलाही हेतू नसून शेतकरी आंदोलनासाठी शासनाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

रक्तदान शिबिराचा कार्यक्रम कौतुकास्पद
नाशिक फ्लावर पार्कचे आज उद्घाटन झाल्यापासून पुढे ९० दिवस नाशिकमधील अर्पण व जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबीर राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम अतिशय उपयुक्त असा सामाजिक उपक्रम असून या उपक्रमाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक केले.

 

tag-Nashik/Flower Park/Tourism/Chhagan Bhujbal/

Social Media