कायमस्वरूपी सुविधांसाठी रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करावे : उप मुख्यमंत्री

मुंबई :  गणेशोत्सवासाठीचे मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक राज्यात सर्वांसाठी एक सारखे असावे अशी सूचना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह विभागाला केली. लिक्वीड ऑक्सीजन पुरवठ्याकडे मुख्य सचिवांनी लक्ष द्यावे त्याचे दर वाढणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्ह्यातून आलेल्या निधीच्या मागणीवर बोलतांना उप मुख्यमंत्री म्हणाले की, एसडीआरएफ, जिल्हा विकास निधी  (डीपीसी)  वापरावा. सीएसआरचा निधी अधिकाधिक मिळवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी  लक्ष द्यावे. राज्यात  जम्बो सुविधा उभ्या करतच आहोत पण त्याचबरोबर विभागीय आयुक्तांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी आहे त्या रुग्णांलयांमध्ये हा निधी खर्च करून तिथे आयसीयु बेड, ऑक्सीजनची सुविधा निर्माण करून या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन केल्यास कायमस्वरूपी सुविधा म्हणून त्या उपयोगात येतील.
समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चुकीच्या व्हिडिओंवर पोलीसांनी लक्ष ठेवण्याच्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिल्या. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची स्थानिक यंत्रणेने अधिकाधिक निर्मिती करावी जेणेकरून विसर्जनाला गर्दी होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळतील यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी  विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तालुकास्तरावर रुग्णवाहिका उपलब्ध राहतील याकडे जिल्हाधिकऱ्यांनी लक्ष घालावे. लवकर निदानासाठी काही जिल्ह्यांमध्ये कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चाचण्यांची क्षमता पुरेशी असून त्याचा पूर्णपणे वापर करण्याचे आवाहन आरोग्मंत्र्यांनी केले.

टेलीआयसीयु सुविधा राज्यात सुरू झाली असून भिवंडी मध्ये त्याच्या वापराने फायदा होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. जेथे विशेषज्ञ उपलब्ध नाही तेथे ही सुविधा फायदेशीर ठरत असल्याचे सांगतानाच सध्या सीएसआरच्या माध्यमातून ही योजना सुरू असून राज्यात तिचा विस्तार करण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Social Media