मुंबई, दि. 29 जुलै : मागील आठवडा वाढदिवसांचा होता असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही! तसे तर दररोजच कुणाचे न कुणाचे वाढदिवस साजरे होताना आपण बघत असतो. पण या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस होते ते कुणी साधेसुधे नाहीत बरे का? सा-या जनता जनार्दनाला सध्या याच तीन जणांच्या कार्य कर्तृत्वाचा आधार आहे. यांच्या हाती सा-या राज्याच्या जनतेच्या कल्याणाचे सुकाणू आहेत बरे! असे कोड्यात पडू नका! आहो, मागच्या सप्ताहात आपल्या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढ दिवस होता आणि दुग्ध शर्करा योग पहा त्याच दिवशी राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचाही वाढदिवस होता. (मेड फॉर इच अदर सारखे वाटते नाही का?)
महाराष्ट्रात मागील काळात अनेक दिग्गज नेत्यांचे वाढदिवस एकाच दिवशी साजरे करण्याची प्रथा होती. जसे की १२ डिसेंबरला माननीय जाणते राजे शरद पवार साहेब आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस साजरा केला जात होता. दुर्दैवाने मुंडे साहेब अकाली आपल्यातून गेले. पण त्यांच्या परंपरेतील त्यांचे मानस पूत्र भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि पवार साहेबांचे राजकीय कार्य नेटाने पुढे घेवून जाणारे अजितदादा पवार यांचा दोघांचा वाढदिवस एकत्र येण्याला तसा गेल्या वर्षभरातल्या राजकारणाचा संदर्भ देखील आहे. आठ नोव्हेंबर२० च्या भल्या पहाटे या दोघांनी एकत्र येत सा-या राज्यातील जनतेची झोप उडवली होती. त्यावरून आता ‘होळी सरली तरी बरेच कवित्व उरले’ आहे. सहा महिन्यांनंतरही फडणवीस यांनी नुकतेच त्या प्रसंगाचे शल्य सांगताना ते कसे खूप आधीपासून घडले याचा गौप्यस्फोट मुलाखतीमध्ये केला आणि त्याला गारद करण्यासाठी मग दै सामना मधून (सकाळ असतानाही) पवार साहेबांनी दिलेले उत्तर हा नुकताच ताजा इतिहास आहे. असो.
दुसरा महत्वाचा वाढ दिवस २७ जुलै रोजी आपल्या लाडक्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा होता. वाढदिवस साजरा करायचा नाही असे प्रेमपूर्वक आदेश साठीत मुख्यमंत्री झालेल्या उध्दवजींनी आपल्या चाहत्यांना आणि कार्यकर्त्याना दिले होतेच तरी या वाढ दिवसाचे औचित्य साधून त्यांनी दै सामना मधून दोन दिवस लाईव्ह अनलऔक मुलाखत दिली. त्यातून त्यांनी गेल्या सहा महिन्यांचा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा प्रवास आणि राजकीय टिकाकारांच्या शंका आणि टिकांना सडेतोड,पारदर्शक आणि हातचे काही न राखता उत्तरे दिली. या मुलाखतीतून त्यानी आपण स्वत:च कसे ‘वर्क फ्रॉम होम’ करून सरकारचे नियम पाळतो आहोत किंवा कोरोनाच्या चाचण्या कश्या काहीही न लपवता केल्या आणि इतक्या मोठ्या संकटाच्या मालिकांमध्येही काही अनुभव गाठीशी नसताना राज्याचे स्टेअरिंग (सुकाणू) कसे आपल्याच हाती आहे अश्या मौलिक प्रश्नांची उत्तरे दिली. म्हणजे सांगायचे तात्पर्य काय तर जनता जरी कोरोना आणि त्यापेक्षा भयानक टाळेबंदीत जायबंदी होवून ‘काढ दिवस’ करत असली तरी राज्याच्या दिग्गज नेत्यांचे वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने साजरे झाले आहेत. आता मुख्यमंत्र्यानी या अनलॉक मुलाखती दरम्यान स्पष्ट सांगितले आहे. हे सरकार मजबूत आहे कुणाला पाडायचे असेल तर आताच पाडा मुहूर्त कश्याला पाहताय? आणि टाळेबंदी उठवून वाटेल ती किंमत द्यायची तयारी असेल तर तसे एकदा ठरवा नाहीतर सध्या जशी अनलॉक सांगून लॉकडाऊनची स्थिती आहे तिला मान्य करा. ते म्हणाले की गेल्या चार महिन्यात राज्यात जे काही कोरोनाच्या विरोधात सरकारने काम केले आहे त्यावर टिका होत आहे.
पण जागतिक पातळीवर आता त्याच कामाची दखल घेतली गेल्याने मला टिका करणा-यांची पर्वा नाही. म्हणजे तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा मी पर्वा करत नाही असे त्यांनी सांगितले ते देखील बरेच झाले. मुंबईची लाईफ लाईन रेल्वे कधी धावणार वडापाव केंव्हा मिळणार अश्या ठराविक प्रश्नांची उत्तरे त्यानी तुम्हीच सांगा म्हणत जनता आणि सहयोगी पक्षांवर सोडली आहेत. साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो तरी ‘त्या साठी’ आपण काही केले नाही अशी शाब्दिक कोटी त्यानी केली ! एकंदरीत हा सारा आठवडा सततच्या कोरोनाच्या भयानक बातम्या आणि कंटाळवाण्या काढ दिवस दिनचर्येतून या वाढ दिवस आणि मुलाखत प्रकारांमुळे अंमळ चांगला गेला. जनतेच्या ज्ञानातही त्याने बरीच भर पडली आणि पुढच्या कित्येक महिन्यांसाठी मानसिक तयारी करण्याचे बळ त्यातील सुज्ञांना आले आहे. आता कोरोना सोबत जगायचे आहे असे सगळे सांगत आहेत पण कोरोनाची ती तयारी आहे का? असे विचारण्याची सध्या सोय नाही? (कारण तसे आधीच लाईव्ह विचारून झाले आहे.)
कोरोना नंतर आर्थिक आव्हान आहे आणि त्यासाठी टाळेबंदी बाजुला सारणे हा काही उपाय नाही कारण मला आरोग्य आणि अर्थकारण दोन्ही हवे आहे असे खुद्द माननीय मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे ‘याच साठी’ त्यांनी मुलाखत दिली नसली तरी त्यांचा वाढदिवस नेमका सहयोगी (विरोधकांचे आणि त्यांचेही) अजीत दादांच्या वाढदिवसानंतर लगेच झाला हा देखील केवढा समसमासंयोग नाही का? राजस्थानात राजेश पायलट या उपमुख्यमंत्र्यानी मुख्यमंत्र्याच्या तोंडाला फेस आणला असताना राज्यात मात्र स्टेअरिंग (सुकाणू) उध्दवजींच्या हातीच आहे ते त्यामुळे समजले हे ही नसे थोडके. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून समूह माध्यमात टवाळखोर संदेश फिरवून अदृश्य,दृश्य आणि प्रत्यक्ष असे तीन मुख्यमंत्री नसून एकच आहेत हे देखील सर्वाना माहित झाले आहे.
किशोर आपटे