अगदी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मैत्री(friendship) बऱ्याच दिवसापासून या विषयावर बोलावं, लिहावं असं मनोमन वाटत होतं पण कधी वेळच मिळालं नाही आज असं अचानक वाटलं की यावर काहीतरी लिहावं आणि लगेच मनात येईल तसं उतरवायला लागले. मैत्रीत जात, वय, लिंग याचा अजिबात विचार केला जात नाही प्रत्येकाला वाटते की आपला सुद्धा मित्र असावा मग ती मुलगी असो वा मुलगा पण चांगला, मनमोकळा, नि:स्वार्थ असावा मैत्रीत एकमेकांविषयी आपुलकी जिव्हाळा निर्माण होते. मैत्री म्हणजे फक्त दोनच अक्षरे पण किती अर्थपूर्ण! खरं प्रेम, नि:स्वार्थ मैत्री कशी असावी…
धरती सारखी क्षमाशील
आकाशासारखी विशाल
मैत्रीत जितकी घनिष्ठता तितकीच पवित्रताही असते मैत्रीला खोल अर्थ असतो त्यात मनाची गुंतवणूक असते त्यामुळे त्याला भावनिक आधार असतो… हाक मारताच धावत येईल तो मित्र, अडचणीत हात देईल तो मित्र…, सुखाचे सोबती खूप भेटतात पण अश्रू पुसणारा मात्र एकदाच भेटतो.. मैत्री हे वरदान फार कमी लोकांना मिळते खरी मैत्री कधी आणि कशी येईल आपल्या आयुष्यात काही सांगता येत नाही मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण मैत्री माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे.. सुखदुःखात सुद्धा माझ्या मित्रांनी मला दूर ठेवले नाही. नेहमी मित्र हा फुलाप्रमाणे निवडावा असे म्हणतात. मोजके मित्र असतील तरी चालेल पण निवडक असावे निवडक मित्राची यादी केल्यास कोणाचे नाव प्रथम लिहावे हेच कळत नाही. प्रत्येकाच्या जीवनात नवीन मैत्री होत असते पण ती टिकविण्याची जबाबदारी आपलीच असते. एखादी व्यक्ती आपल्याला काही कारणाने आवडते.. विचार, आवडीनिवडी, एकमेकांच्या भावना जाणू शकणारी कोणी व्यक्ती भेटली की आयुष्यात मैत्रीचं ‘बी’ रुजतं.. सुरुवातीला मैत्री नाजूक पुष्पाप्रमाणे जपावी लागते आणि मगच मैत्री वाढते.. खरं तर मैत्री दोन्ही बाजूने टिकवायला पाहिजे जवळीक वाढल्यानंतर लक्ष ठेवले नाही तर लहान सहान चुकांमुळे सुद्धा चांगले मित्र दुरावतात… खरं पाहता मैत्री दोन चांगल्या विचारात होते मुला मुलीच्या मैत्रीला काही लोकं नावं ठेवतात परंतु मैत्री ही मैत्रीच असते… काचेचा ग्लास फुटल्यावर त्याला जोडण्याचे काम फारच कठीण असते त्याचप्रमाणे मैत्री विचार न करता जुळते पण मैत्री तोडायची म्हणजे महाकठीण काम.. म्हणतात ना…
एक बार हुई दोस्ती
तोडी नहीं जाती…
वरील वाक्याप्रमाणे वागणाऱ्या व्यक्ती आजच्या युगात फार कमी आहेत आणि जे आहेत ते उद्या मित्र राहतीलच हेही सांगता येत नाही.. प्रत्येकामध्ये आज स्वतःचाच स्वार्थ दिसतोय मित्रासाठी काय पण वगैरे गोष्टी फक्त वाचायला आणि ऐकायलाच मिळतात… प्रत्येकजण पैशामागे धावत आहे.. पैसा कमावणे हाच त्याचा उद्देश्य होऊन बसला आहे. मैत्रीचा उल्लेख सहज कुठेही केलेला आढळतो कारण खऱ्या मैत्रीचा खरा अर्थ समजलेलाच नसतो.
क्षणात मरणाऱ्या व्यक्तीलाही आशा असते कुणाच्यातरी प्रेमळ दिलासेची, खंबीर धीर देणाऱ्या व्यक्तीची आणि मरणानंतरही टिकून राहणाऱ्या अतूट अशा मैत्रीची.. नकळतच जीवनाच्या प्रवासातील वाटेत अचानक मिळालेल्या मित्राची आठवण त्याच्या प्रतिमेसोबत डोळ्यात तरंगते आणि ती छबी पाहून हर्षाने मरतो.. मानवाला हवा असतो मैत्रीद्वारे प्रेमळ दिलासा सुखदुःखात सहभागी होऊन त्याला ओळखण्याची वृत्ती, मदतीचा हात, खवळलेल्या समुद्रात सापडला असल्यास बाहेर निघण्याची प्रेरणा आणि जोडीला निर्मळ मन ज्याद्वारे एकमेकांना समजून घेतील. पण निव्वळ नावापुरती मैत्री असली तर त्याची अवस्था शुष्क झाडापरी होते. त्या मैत्रीला कामापुरते महत्त्व प्राप्त होते अशीच ओढताण करून ती टिकवली जाते मैत्रीत हवा असतो प्रेमाचा विश्वासाचा सुगंध जो अमृत होऊन इतरांवर आपली छाप तर पाडतोच उलट परस्परांच्या सहवासात एवढा मिसळून जातो की देह,भान, राग, द्वेष लोभही विसरून जातो.. विसरणाऱ्याची स्मरणशक्ती म्हणजे मैत्री, आंधळ्याची काठी म्हणजे मैत्री, जीवनात खरं सुख मिळण्याचे केंद्र म्हणजे मैत्री, प्रगतीची दाखविणारी दिशा म्हणजे मैत्री, चुकलेल्याची पायवाट म्हणजे मैत्री, मैत्री म्हणजे माणूसपणाची ओळख परस्परांच्या भावनांची कदर आणि मैत्री म्हणजे राग-द्वेष गिळून, चुकलेली त्रुटी सुधारण्याची यशस्वी प्रेरणा.. अशी मैत्री ज्याच्या जीवनात नसेल ते जीवन निरर्थकच कारण आपल्याला कुणीतरी जाणून घेणारा असावा आपल्या सुखदुःखात सहभागी होऊन खऱ्या गोष्टीची प्रचिती देणारा आणि वाईट मार्गाला दूर सारणारा असावा… पण यालाही अंत आहेच खऱ्या मित्राची जाण ज्याला होते त्यावेळी त्याच्या विश्वासावर अधिक भर पडून त्याच्या विचारावर अतूट अशा प्रेमाचा, आठवणींचा, नि त्या मित्रांच्या प्रेरणादायी शब्दांचा मारा वेळोवेळी होतो.. गतकाळातील जीर्ण आठवणींच्या वहीचे पान भराभरा उलटून त्यात डोकावून पाहण्याचे सामर्थ्य मैत्रीमुळेच मिळते… आपल्या जीवनातील कमी म्हणजे मैत्री.. ज्याला तेजस्वी, तपस्वी, तल्लख, प्रसंगी तापट असा मित्र मिळतो त्याला नक्कीच सारे काही मिळाल्याचे आत्मसुख प्राप्त होते.. जन्मोजन्मी तप केले तरी मित्र हा आपल्यावर अतूट प्रेम करणारा मिळेलच हे शक्य नाही तो मृगाचा पहिला पाऊस पडून गंध सुटावा तसा विश्वासाचा, आपुलकीचा, सहकार्याचा गंध पसरवून येतो आणि अलगद पानझडी वृक्षापरी निघूनही जातो. तो पुन्हा येईल अशी आशा वाटते कारण त्याची आठवण हृदयाच्या कोपऱ्यात साचेबंद काचेच्या तावदानात बंद झालेली असते..
विचार पटल्यावर मानवाच्या आयुष्यात मिळालेली एक अमोल देणगीच आहे ही मैत्री.. मग सुखदुःखांना जाणणारी अढळ विश्वासात पर्वतालाही चिरडून टाकणारी सहकार्याने काळोखाला भेटून प्रकाशझोतात चकाकणारी, अशक्य गोष्टी शक्य करणारी, डोळ्यातून ओथंबणाऱ्या अश्रूंना पुसणारी मैत्री आपल्याला नको का? त्यासाठी शोध घेऊ नका अचानकच मिळेल आणि झंजावातापरी निघूनही जाईल पण भान मात्र राहणार नाही अशी आयुष्याची कमी पूर्ण करणारी मैत्री प्रत्येकाच्या जीवनात हवीच मैत्रीत जे मिळते ते कायमचे टिकून राहते…
हर्षना रोटकर